________________
७८
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : असा तर कधी विचारच केला नाही. प्रथमच असा विचार करत आहे.
दादाश्री : हो, असा विचारच केला पाहिजे ना? भगवंत किती विचार करून करून मोक्षाला गेले! मतभेद आवडतात का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : जेव्हा मतभेद होतात तेव्हा भांडणे होतात, चिंता होते. मतभेदामुळे असे होत असेल तर मनभेदामुळे काय होत असेल. मनभेद होतात तेव्हा घटस्फोट घेतात आणि तनभेद झाले की अंत्ययात्रा निघते!
भांडण करा, पण बागेत तुम्हाला भांडण करायचे असेल तर बाहेर जाऊन भांडण करा. भांडायचे असेल त्या दिवशी बागेत जा आणि तिथे खूप भांडून घरी या. पण घरात, 'आपल्या खोलीत भांडायचे नाही.' असा नियम बनवा. एखाद्या दिवशी आपला भांडण करण्याचा मूड झालाच तर बायकोला सांगावे की, चला आज आपण बागेत जाऊ, तिथे खूप खाऊ-पिऊ आणि मग तिथेच खूप भांड्या. लोक आपले भांडण थांबवण्यासाठी येतील असे भांडण करावे. पण घरात भांडू नका. जिथे भांडण-तंटे असतात तिथे भगवंत राहत नाही. तिथून निघून जातात. भगवंतानी काय म्हटले आहे? भक्तांच्या इथे क्लेश नसावे. परोक्ष भक्ती करणाऱ्यांना भक्त म्हटले आणि प्रत्यक्ष भक्ती करणाऱ्यांना भगवंतानी 'ज्ञानी ' म्हटले, तिथे क्लेश होऊच कसा शकतो? तिथे तर समाधी अवस्था असते!
___ म्हणून कधी भांडावेसे वाटले तर पतीदेवाला म्हणा की, 'चला, आपण बागेत जाऊ या.' मुले कोणाला तरी सोपवून द्यावीत. पतीदेवाला आधीच सांगून ठेवा की, मी तुम्हाला भरलोकांमध्ये दोन थोबाडीत मारीन तेव्हा तुम्ही हसा. लोकांना आपली गंमत पाहू द्या! लोक तर अब्रू नोंदणारे, ते समजतील की कधी यांची अब्रू गेली नव्हती ती आज गेली. कोणाचीही अब्रू असते का? हे तर बिचारे झाकून-झाकून अब्रू ठेवतात!