________________
क्लेश रहित जीवन
आमचे हिराबा बरोबर कधीही मतभेद झाला नाही, कधीच बोलण्यात 'माझे-तुझे' झाले नाही. पण एकदा आमच्यात मतभेद झाला होता. त्यांच्या भावाच्या मोठ्या मुलीचे लग्न होते म्हणून त्यांनी मला विचारले की, 'लग्नात त्यांना काय भेटवस्तू देऊया?' तेव्हा मी त्यांना सांगितले की, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, पण घरात जी चांदीची भांडी आहेत ते द्या ना! नवीन बनवू नका.' हे ऐकून त्या म्हणाल्या की, 'तुमच्या आजोळी मामाच्या मुलींचे लग्न होतात तेव्हा तर चांदीचे मोठमोठे ताट बनवून देता!' त्यांनी जेव्हा 'माझे आणि तुमचे' असे शब्द म्हटले त्याचवेळी मी समजून गेलो की, आज आपली अब्रू गेली! आम्ही दोघे एक, मग माझे आणि तुमचे कशाला? हे माझ्या लक्षात येताच मी लगेच पलटलो. मला जे सांगायचे होते त्यात मी पूर्णतः पलटून गेलो. मी त्यांना म्हणालो, 'माझा सांगण्याचा अर्थ असा नव्हता. तुम्ही ही चांदीची भांडी द्या आणि वरून पाचशे एक रुपये द्या, त्यांना उपयोगी पडतील.' त्या म्हणाल्या, 'हं...एवढे पैसे देतात का? तुम्ही अगदी भोळेचे आहात, ज्याला त्याला देतच राहता.' मी म्हणालो, 'खरोखर, मला काही समजतच नाही.'
बघा, माझ्या घरातही कसा मतभेद पडत होता, पण मी शब्दांना पलटवून कसे मतभेद होताना थांबवले! शेवटी मतभेद होऊ दिला नाही. मागील तीस-पस्तीस वर्षांपासून आमच्यात किंचितही मतभेद झाला नाही. 'बा' सुद्धा देवीसारख्या आहेत! कुठल्याही परिस्थितीत आम्ही मतभेद होऊच दिले नाहीत. मतभेद होण्याआधीच आम्ही समजून जातो की, असे फिरून जायला हवे आणि तुम्हाला तर फक्त डाव्या आणि उजव्या या दोन बाजूनेच फिरवायचे माहित आहे की, एकतर या बाजूने आटे घट्ट बसतील किंवा त्या बाजूने घट्ट बसतील. आम्हाला तर सत्तर लाख प्रकारचे आटे फिरवता येतात. शेवटी गाडी रुळावर आणतो. मतभेद कधीच होऊ देत नाही. आपल्या सत्संगात जवळपास वीस हजार माणसं आणि चार एक हजार महात्मा आहेत पण आमचे कोणाशी एकसुद्धा मतभेद नाही. मी कोणाशीही परकेपणा मानला नाही!