________________
त्रिमंत्र
प्रश्नकर्ता : तर हे 'सिद्ध' देहधारी नाहीत का?
दादाश्री : सिद्ध भगवंत देहधारी नसतात, त्यांना तर परमात्माच म्हटले जाते आणि हे जे सिद्ध पुरुष आहेत ना, त्यांना तर मनुष्यच म्हटले जाते. त्यांना तुम्ही शिवी घालाल तर ते सिद्ध पुरुष तुमच्यावर चिडतील, नाहीतर तुम्हाला शाप तरी देतील.
प्रश्नकर्ता : अरिहंत आणि सिद्धांमध्ये काय फरक?
दादाश्री : सिद्ध भगवानांस शरीराचे ओझे उचलावे लागत नाही. अरिहंतांना शरीराचे ओझे उचलून चालावे लागते. त्यांना स्वत:च्या शरीराचे ओझे वाटते. जसे काही मोठा हांडा डोक्यावर घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत. काही कर्म शिल्लक आहेत, त्यांची पूर्ती केल्याशिवाय ते सिद्धगतीला जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांना तेवढे कर्म भोगण्याचे शिल्लक आहेत.
__ नमो आयरियाणं... हे दोन झाले, आता? प्रश्नकर्ता : 'नमो आयरियाणं'...
दादाश्री : अरिहंत भगवंतांनी सांगितलेल्या आचारांचे जे स्वतः पालन करतात, आणि त्या आचारांचे पालन करवून घेतात अशा आचार्य भगवंतांना मी नमस्कार करीत आहे. त्यांनी स्वतः आत्मप्राप्ती केली आहे, आत्मदशा प्रकट झाली आहे. संयमसहित आहेत. परंतु आजकाल येथे जे आचार्य आहेत ते (खरे खरे) आचार्य नाहीत. ते तर असे आहेत की त्यांचा जरासा अपमान झाला की तर लगेच फणा काढतात. अर्थात असे आचार्य असता कामा नयेत, अशांच्या दृष्टीत परिवर्तन झालेले नाही, दृष्टीत परिवर्तन झाल्यानंतर काम होईल. जे मिथ्या दृष्टीवाले आहेत, त्यांना आचार्य म्हणता येणार नाही. समकित (आत्मदृष्टी) प्राप्त झाल्यावर जे आचार्य होतात. त्यांना आचार्य म्हटले जाते.