________________
सेवा-परोपकार
मनुष्य जन्माची विशेषता प्रश्नकर्ता : हा मनुष्य जन्म व्यर्थ न जावो यासाठी काय करावे?
दादाश्री : ‘हा मनुष्य जन्म व्यर्थ न जावो' याचेच संपूर्ण दिवस चिंतन केले तर ते सफळ होईल. या मनुष्य जन्माची चिंता करायला हवी तिथे लोक लक्ष्मीची (पैश्यांची) चिंता करतात! प्रयत्न करणे हे तुमच्या हातात नाही परंतु भाव हे तुमच्या हातात आहे. प्रयत्न करणे हे दुसऱ्याच्या सत्तेत आहे. भावाचे फळ येते. खरे पाहिले तर भाव सुद्धा परसत्ताच आहे, पण भाव केला तर त्याचे फळ येतेच.
प्रश्नकर्ता : मनुष्य जन्माची विशेषता काय आहे?
दादाश्री : मनुष्य जीवन परोपकारासाठी आहे आणि हिन्दुस्तानातील मनुष्याचे जीवन अॅब्सॉल्युटिझम' साठी आहे, मुक्ती साठी आहे. हिन्दुस्ताना शिवाय बाहेर अन्य देशांमधील जे जीवन आहे ते परोपकारासाठी आहे. परोपकार म्हणजे मनाचा वापर दुसऱ्यांसाठी करणे, वाणी सुद्धा दुसऱ्यांसाठीच वापरणे आणि वर्तन हे सुद्धा दुसऱ्यांसाठीच वापरणे! मन-वचन-कायेने परोपकार करावे. तेव्हा म्हणाल की, मग माझे काय होणार? त्याने परोपकार केला तर त्याच्या घरात काय राहील?
प्रश्नकर्ता : लाभ तर मिळेलच ना!
दादाश्री : हो, पण लोकं तर हेच मानतात ना की, मी दिले तर माझे जात राहील.