________________
कर्माचे विज्ञान
दादाश्री : देहाने तर त्याचे स्वत:चे फळ भोगले ना! दोन थोबाडीत मारल्या म्हणजे देहाला फळ मिळूनच जाते. पण जे त्याच्या योजनेत होते तेच आता रूपकमध्ये आले.
प्रश्नकर्ता : हो, पण योजना कोणी केली? त्या देहाने योजना केली
ना?
दादाश्री : देहाला तर काही घेणे-देणे नाही! बस, फक्त अहंकारच करतो हे सर्व.
ह्या जन्माचे ह्या जन्मात? प्रश्नकर्ता : ह्या सर्व कर्मांची फळं आपल्याला ह्या जन्मातच भोगायची की मग पुढील जन्मातही भोगावी लागतात?
दादाश्री : मागच्या जन्मात जे कर्म केले होते, ते योजनेत होते म्हणजे कागदावर लिहिलेली योजना. ते आता रूपक रूपाने येते, फळ देण्यासाठी सन्मुख होते, तेव्हा त्यास प्रारब्ध म्हणतात. किती काळाने परिपक्व होते? तर पन्नास, पंचाहत्तर, शंभर वर्षांनी परिपक्व होत असते, तेव्हा फळ देण्यासाठी सन्मुख होते.
अर्थात मागील जन्मी कर्म बांधले, ते कित्येक वर्षांनी परिपक्व होतात, तेव्हा मग ह्या जन्मात फळ देतात आणि ते फळ देते वेळी जगातील लोक काय म्हणतात की यांनी कर्म बांधले. एका माणसाने एखाद्या व्यक्तीला दोन थोबाडीत मारल्या, त्यावर जगातील लोक काय म्हणतात, की ह्याने कर्म बांधले. कोणते कर्म बांधले? तेव्हा म्हणतात, 'दोन थोबाडीत मारल्या.' त्याला त्याचे फळ भोगावे लागेल. ते (फळ) येथे परत मिळतेच, कारण की थोबाडीत मारल्या, परंतू थोबाडीत खाणारा आज ढिला पडला, पण त्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो वैर वसूल केल्याशिवाय राहणार नाही ना! यालाच लोक म्हणतील की पहा कर्माचे फळ भोगले ना शेवटी! यालाच म्हणतात इथल्या इथे फळ भोगले.' पण आपण त्याला सांगायचे की तुझी गोष्ट खरी आहे. याचे फळ भोगायचे आहे, परंतु त्याने दोन थोबाडीत का मारल्या? ते कोणत्या आधारावर?