________________
जे घडले तोच न्याय जगात जरूरत चोर आणि सापांची कधीकधी लोक मला विचारतात हे चोर लोक कशाला आले आहेत? ह्या साऱ्या खिसेकापूची काय आवश्यकता आहे? परमेश्वराने त्यांना का बरे जन्म दिला असणार? अरे! ते नसते तर तुमचे खिसे रिकामे कोण करणार? परमेश्वर स्वतः येतील का? तुमचे चोरीचे धन कोण घेवून जाणार? तुमचा पैसा खोटा असेल तर कोण घेवून जाणार? ते निमित्तमात्र आहेत बिचारे. म्हणून ह्या सर्वांची जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : कोणाच्या घामाची कमाई पण निघून जाते.
दादाश्री : ही तर ह्या जन्माची घामाची कमाई पण मागचा सगळा हिशोब बाकी आहे ना! वहीखाते बाकी आहे म्हणून, नाहीतर आपले कोणी कधी घेऊन जाणार नाही! कोणाची अशी शक्तिच नाही कि तो घेऊन जाईल. आणि घेऊन जाणे हा तर कित्येक जन्माचा मागचा हिशोब आहे. ह्या जगात असा कोणी जन्मला नाही कि जे कोणाला काही करू शकेल. इतके सारे नियमबद्ध जग आहे. खूपच नियमबद्ध चालणारे जग आहे. साप पण शिवणार नाही. एवढे मोठे मैदान सापाने भरलेले असेल, पण ते काही करणार नाही. असे नियमबद्ध जग आहे. खूप हिशोबी जग आहे. हे जग खूप सुंदर आहे. न्यायस्वरूप आहे, पण ते लोकांना समजत नाही.
परिणामावरुन कारण कळते हा सारा निकाल आहे. जसा परीक्षेचा निकाल येतो ना, या गणितात शंभर पैकी पंच्यान्नव गुण मिळतात आणि इंग्रजीत शंभर पैकी पंचवीस गुण मिळतात. तर काय आपल्या लक्षात येत नाही कि, आपली कुठे चुक झाली? ह्या परिणामावरुन, कोणत्या, कोणत्या कारणाने चूका झाल्या ते आपल्याला समजते ना? असे हे सर्वांचे परिणाम येतात. हे सर्व संयोग जे एकत्र होतात, ते सारे परिणाम आहेत. आणि त्या परिणामावरुन कारण काय होते ते आपल्याला कळते.