________________
५२६ । आराधना-कथाकोष
यानंतरे अवंती देशात । उज्जनी नगरी पुण्यवंत । इंद्रदत्त श्रावक संत । जिनभक्त धर्ममार्गी तो ।।१६०।। गुणवंती तयाची राणी । रूपसौभाग्याची ते खानी । तिच्या उदरी स्वर्गाहुनी । देव च्यवोनी पुत्रजन्म ॥१६१॥ नागचर सुरेंद्र देव । पूर्वपुण्याचे वैभव । सुरेंद्रदत्त ठेविले नाव । करी उद्भव चंद्रासमान ।।१६२॥ सुभद्र श्रेष्ठी त्या नगरी । सुभद्रा नारीचे उदरी । यशोभद्रा सुंदरपुत्री । सुरेंद्रदत्त स्त्री पणिली ते ॥१६३।। नाना भोग मनइच्छित । पूर्वपुण्य सर्वही प्राप्त । जैन धर्म सदैव रत । देवगुरूभक्त सदाचारी ॥१६४।। एकदा यशोभद्रा नारी । अवधी मुनी आले भावरी । नवविधा पुण्य निरंतरी । पृच्छा वैखरी स्वामिराया ॥१६५।। मज पुत्र केव्हा होईल । ते सांगाव जी सत्यबोल । मम मनशा पुरेल । हर्ष होईल ममांतरी ॥१६६।। ऐकोन तयेचे वचन । मुनी सांगे अवधीज्ञान । पुत्र होईल पुण्यवान । रूप सद्गुण मंडित तो ।।१६७।। तुझा भर्ता सुरेंद्रदत्त । पाहोनिया पुत्रमुखात । दीक्षा घेईल पुण्यवंत । मोक्षमार्गात साधील ॥१६८॥ तुझा पुत्र पुण्यवान । होताचि मुनीचे दर्शन । भोग त्याग सर्व करोन । दीक्षाग्रहण करील तो ॥१६९।। ऐसे ऐकता ते सुंदरी । हर्ष पुत्रार्थी बहुअंतरी । एके दिनी गर्भ उदरी । यशोभद्रा नारी हर्षली ॥१७०।। नागश्रीचर देव च्यवोनी । पुत्र जालासे शुभदिनी । महामहोत्सव करोनी । नामाभिधानी सकुमाळ तो ॥१७१॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org