________________
२१४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ आचार्यांनी मंत्रसाधनेचा ध्यानसाधनेत अंतर्भाव करून घेतला. पदस्थ ध्यानात अनेक विविध बीजाक्षराने, मंत्राने, उत्तम व परमात्म पदाचेच ध्यान आहे. लौकिक दृष्टी वा सिद्धीसाठी किंवा दुर्ध्यानासाठी मंत्र नाहीत. रूपस्थ ध्यानात सगुण साकार उपासना, तर रूपातीत ध्यानात निराकार गुणोपासनेने ध्येयोपासना आहे. वीतरागता व विज्ञानता ह्या मूल बीजाला न सोडता इष्ट ध्येय बिंदू वा केंद्र बिंदू धरून साऱ्या योगसाधनेचा प्रपंच आहे. बाह्य जगाला भूल पाडणारी ही अगणित साधने त्यांनी ध्येय बिंदूशी केंद्रित करून तिळभरही विचलित न होण्याची क्षमता आम्हाला नवे ध्यान-सामर्थ्य प्रदान करतो.
आचार्यांना कोणत्याही जैन सिद्धांताचे विषय अज्ञात नव्हते तर सर्व विषय संक्षिप्त रूपांत सर्व प्रकरणवश आलेच आहेत. आचार्य शेकडो विषयांवरून उड्डाण करीत करीत गेले तरी आपल्या ध्येयाशिवाय ते कोठेही विसावले नाहीत. कोठे घसरले वा पडले नाहीत. ध्यानी आत्म्याशिवाय का हे शक्य आहे ? आपणाला ओढ्याच्या रूपांत परिचित असणाऱ्या ध्यानाला त्यांनी सागराच्या रूपात आपणासमोर मांडले आहे. व शेवटी सूर्यचंद्र व मेरु जोवर पृथ्वीवर प्रकाशमान व विद्यमान आहेत तोवर हा ग्रंथही ज्ञानाच्या भरतीसाठी चंद्राप्रमाणे प्रकाशमान व ज्ञानाच्या स्थैर्यासाठी मेरूप्रमाणे स्थिर राहो ही सद्भावना पण केवढ्या आत्मविश्वासाने मांडली आहे.
ग्रंथकारांची शैली कवी भर्तृहरीचे अनुसरण करते. कवींनी ध्याताच्या रूपांत वीर रस, विशुद्धीच्या रूपांत शांत रस, स्त्रीवर्णनाने बीभत्स व शृंगार रस, आर्तध्यानाने व अहिंसा महाव्रताने करुण रस, ध्यानाच्या अद्भुत विधीने व फलाने अद्भुत रस, रौद्र ध्यानाने व संसार भावनेने रौद्र रसाचे पोषण केले आहे.
___ह्याप्रमाणे नवरसाने रसरसलेला, काव्यगुणाने भरलेला, मुमुक्षु रसिकांना तन्मय करणारा लयी ध्यानी बनविण्याची प्रेरणा देणारा. असा हा जैन योगसाधनेचा ग्रंथराज आहे.
___ जैन बंधूंच्या निष्ठा वाढविणारे, जैन सिद्धांताचे रहस्य साठविणारे, सुप्त शक्तींचा विकास घडविणारे विशाल व विस्तृत दृष्टिकोन ठेवणारे आचार्य शुभचंद्र व त्यांचा योगग्रंथराज 'ज्ञानार्णव' अत्यंत अगाध गंभीर स्थिर आहे. त्यात माझ्यासारख्या क्षिप्त अज्ञानी पामराने वरून पाहूनही घाबरून जावे. पण न घाबरता डुबकी घेण्याचे हे धाडस, धैर्य, त्यांच्याच महान भक्तिप्रभावाने मी केले. हा माझा व्यर्थ खटाटोप आहे. पण घरोघरी जनमनात ह्या ग्रंथाची आवड, आकर्षण निर्माण होऊन अध्ययनाचा विषय व्हावा, व त्यांच्याप्रमाणे आम्हीही परंपरेने मोक्षाचे भागीदार व्हावे ह्याच सद्भावनेतून हा अल्पसा प्रयत्न वाचकांनी गोड करून घ्यावा. ह्यातील सदाशयाला दिगंबर जैन मुनींची अखंड ज्ञानसाधना कारणीभूत आहे. ह्यातील दोषाला सर्वस्वी मी. जबाबदार आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org