________________
स्मृति-मंजूषा
१७३ तत्त्व महाराजांनी बरोबर ओळखले होते. संसाराचे विषय मोहक असले तरी त्याकडे न झुकता वीतरागता दृष्टीपुढे ठेवून पायरी पायरीने त्यांनी संयमाची अखंड साधना केली. स्वतः निरंतर भावशुद्धिपूर्वक निरतिचार चारित्राची पालना करीत करीत इतर भव्यजीवांनाही त्यांनी लोककल्याणाच्या भावनेने सम्यक्त्वाचा व व्रतधारणाचा उपदेश दिला. अधिकारी पुरुषाने दिलेला उपदेश व सांगितलेल्या गोष्टी लोकांवर प्रभावी परिणाम करू शकतात. स्वतः संयमाची पूर्ण पालना करीत असल्यामुळे आदर्शस्वरूप मार्ग लोकांच्या दृष्टीपुढे असे. त्यांची प्रेरणाही प्रभावी असे. स्वतःबरोबर इतरांनाही त्या मार्गाकडे प्रवृत्त करणे हे त्यांचे जीवितकार्य ( Mission) होते.
शालेय शिक्षण अवघे तिसरीपर्यंत झाले असतानाही धर्मावरील दृढ श्रद्धा, व्रतांचे धारण, सयमाचे पालन, कषायांचा निग्रह, विषयांचा त्याग, इन्द्रियविजय या सर्व मंगल गोष्टींचा अलौकिक संगम आचार्य महाराजांच्या ठिकाणी आपल्याला पहावयास सापडतो. याबरोबरच लोककल्याणाची जिवंत भावनाही अहर्निश त्यांचे ठिकाणी स्पष्टपणे आढळून येत होती. या गुणसमुच्चयाच्या अभिवृद्धीने आपले असामान्य आत्मोत्थान त्यांनी स्वतः करून घेतले, व त्यामुळेच ते सर्वांना अभिवंद्य झाले. समाधिकाळी अशा लोकोत्तर महात्म्याच्या दर्शनाने आपणही पावन व्हावे या भावनांनी अफाट जनसमुदाय कुंथलगिरीवर जमला याचे तरी कारण हेच.
प्रश्न—आचार्य महाराजांना अशा वृद्धपणी शरीर जरा-जीर्ण झाले असता समाधान व शांतिपूर्वक प्रत्यक्ष मृत्यूस आव्हान देण्या-इतपत प्रचंड सामर्थ्य कुठून आले असावे ? .
उत्तर-देह आणि आत्मा हे अलग अलग आहेत. हा जागृत विवेक व संयमाचे वारंवार संस्कार आचार्यश्रींनी वर्षोगणती आपणा स्वतःवर करून घेतले होते हेच तर खरे वैराग्य आहे. 'रसरी आवत जावते सिलपर होत निशान' यःकश्चित् दोराच्या घर्षणाने दगडाला देखील खाचा पडतात. 'निम्मीकरोति वार्बिन्दुः किं नाश्मानं मुहुः पतन्' पाण्याचा थेंब वारंवार जरी पडत राहिला तर दगडासही खळगा पडत नाही काय ? आ० महाराजांना संस्कारांचे महत्त्व पूर्णपणे माहीत होते. ध्यानाला बसल्यानंतर देहभावना कशी विसरावी व जागृत अवस्थेमध्येही शरिरावरील ममत्व कसे विसरावे हे त्यांना चांगले अवगत होते. यासाठी अभ्यास व फार मोठे आत्मबल लागते. आपणावर अनादिकालाचे मिथ्या संस्कार झालेले आहेत. आपण ध्यानी-मनी शरीर व आत्मा हे एकच समजत आलो आहोत. तोंडाने हे भिन्न आहेत असे बोलत असलो तरी मिथ्यात्वाचे संस्कार जबरदस्त असतात. हे संस्कार दूर होण्याकरिता उलट दिशेने अधिक सामर्थ्य एकवटून खरे ज्ञानाचे व संयमाचे संस्कार करणे जरूर असते. साध्या कागदाला एकदा पडलेली घडी बदलावयाची असली तर आपण जोर लावतो. येथे तर अनादिकालचे आत्मसंस्कार बदलावयाचे आहेत. आचार्यांनी हे जीवनपर्यंत केले म्हणूनच साक्षात् मृत्यूला शांति व समाधानपूर्वक आनंदाने कवटाळण्याचे प्रचंड सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले होते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org