________________
१४६
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ येण्यासंबंधी प्रार्थनाही केली होती, परंतु निर्णय घेतलेला नव्हता. उत्सवाचे आदले दिवशीच अंतःप्रेरणेने निर्णय घेऊन सकाळच्या सामायिकानंतर १६।१७ मैलांची मजल तरुणालाही लाजवील अशा उत्साहाने एका दौडीमध्ये मारून संध्याकाळीच श्री बाहुबलीच्या परिसरात आले. दुसरे दिवशी श्रींनी आपला संकल्प व येण्याचा प्रधान हेतु प्रगट केला. सर्वांनाच आश्चर्य वाटले. बाहुबलीचे बृहज्जिनबिम्ब येथे क्षेत्रावर विराजमान व्हावयास पाहिजे व त्यासाठी सर्वांनी कृतसंकल्प असावे ही प्रेरणा होती. यात उभयपक्षी अन्यायाचे काही नव्हतेच. श्रींनी संस्था सर्व भागामध्ये फिरून पाहिली. विभागांची माहिती घेतली. उत्पन्नखर्चाची विचारणा केली. शिक्षण व इतर कामांची चौकशी केली व अत्यंत आस्थेवाईकपणे सर्व बाबी विचारून झाल्यावर मनःपूत संतोष व समाधान प्रगट करून अनंत आशीर्वाद दिले. संस्थेचे मंत्री श्री. वालचंद देवचंद व प्रमुख श्री. भीसीकर यांचेशी सर्व चर्चा झाल्यावर श्रीसमंतभद्र महाराजांना बोलवा म्हणाले. सर्वजण जमा झाल्यावर श्रीसमंतभद्रांना उद्देशून श्री म्हणाले, 'बाबारे ! तुझी प्रकृती ओळखतो. वृत्तिप्रवृत्ती
ओळखतो. मुनी झालात, आनंद आहे. सर्वसामान्य मुनिजनांसाठी एके ठिकाणी राहू नये, त्यांनी विहार करावा असे विधान आहे. तथापि हे तीर्थक्षेत्र आहे. धर्मप्रभावनेचे काम सुरू आहे. तुम्ही एके ठिकाणी राहिला तरी चालेल ! शिकविले तरी चालेल ! संस्था पाहिली तरी चालेल ! परंतु आत्म्याला विसरू नका. तुम्हास उदंड आयुष्य प्राप्त होवो व धर्माची खूप प्रभावना होवो असा तुम्हाला व संस्थेला आमचा आशीर्वाद आहे.' संस्थेची प्रमुख कार्यकर्ती मंडळी उपस्थित होतीच. सर्वांनाच ही 'खात् पतिता नो रत्नवृष्टि' असेच वाटले.
१२. सार्वजनिक व खाजगी हितोपदेश श्रींची उपदेश-पद्धती सहज स्वाभाविक अशीच होती. त्यामध्ये भाषेचे अवडंबर एक गुंजभरही नसे. लोककल्याणाची भावना मात्र पूर्णपणे भरलेली असे. 'श्रद्धा पूर्ण समीचीन बनावी, ज्ञान परिपक्व व्हावे, आचार शुद्ध परिशुद्ध व्हावा, यासाठी प्रथमानुयोगाच्या कथा प्रसंगोपात्त सांगून धर्मप्रेरणा करीत असत. श्री क्षेत्र मांगीतुंगी येथील प्रतिष्ठोत्सवप्रसंगी प्रवचन सुरू असता सत्य, शांतीचे महत्त्व हे जगामधील कोणत्याही विध्वंसक शस्त्रास्त्रापेक्षा फार अधिक आहे हे निरूपण सुरू होते. 'क्रोध किंवा कषाय अग्निप्रमाणे आहे. तो जाळपोळ करू शकतो; परंतु शांती ही हिमवृष्टीप्रमाणे आहे. ती सुद्धा एका रात्रीतून अरण्येच्या अरण्ये नष्ट करू शकते. एक पान सुद्धा जिवंत सापडणार नाही' वगैरे प्रासंगिक वर्णन श्रींनी अत्यंत बहारीने केले.
१३. गुरुकृपा : अपूर्व प्रसंग गजपंथाच्या मुक्कामात दुपारचे शास्त्रवाचन आज्ञेप्रमाणे सुरू होते. ज्ञानार्णव ग्रंथ होता. ब्रह्मचर्याचे प्रकरण होते. काही श्लोक वाचून झाल्यावर शास्त्र थांबविण्यास व सर्व लोकांना जाण्यास सांगितले. सर्व गेल्यावर खोलीची कडी लावून बसण्यास आदेशिले. हा प्रसंग अपूर्वच होता. ही गुरुकृपाच म्हणावी लागेल. व्रत-विशेषतः ब्रह्मचर्यव्रत-विशुद्धीसाठी अनुकूल निमित्त मिळविणे किंवा प्रतिकूल निमित्त विशेषतः
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org