________________
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ कसे बरे दिले असते ? असा रोकडा सवालच विचारला आहे. त्यामधला उद्देश गंभीर असला तरी तितकाच महत्त्वाचा आहे.
६. जागृत समयसूचकता व प्रबुद्ध विनोदशीलता त्यागी मनुष्य काहीसा रुक्ष असतो अशी स्वतःची धारणा होती. परंतु आचार्यश्री याला अपवाद होते. आचार्यश्रींचा मुक्काम बारामतीस होता. संध्याकाळी ५॥ ची वेळ असेल. शास्त्र संपले होते. लोक आवतीभोवती जमून सुखचर्चा करीत होते. श्रींनी सहज विचारले, 'किती वाजले ?'
वेळेबाबत श्री अत्यंत दक्ष असत. घड्याळाचा व वेळेचा उपयोग कसा करावा हे त्यांच्या इतके इतरांना क्वचितच जमेल. लोकांनी आपापल्या मनगटांवरची घड्याळे पाहून कुणी ५-१० तर कुणी ५-१५ तर कुणी ५-२५ याप्रमाणे सांगितले. श्रींनी आपले घड्याळ पाहून '५-३५ झाले की!' असे म्हटले.. त्याचवेळी कोणी तरी सभ्य गृहस्थ सहजी बोलला, ' महाराजांचे घड्याळ पुढे आहे.'
लगेच 'श्री' विनोदाने म्हणाले, 'आमचे घड्याळ बरोबर आहे. तुम्हा सगळ्यांचीच घड्याळे मागे आहेत.
श्रींच्या म्हणण्याचा रोख अर्थात् आचारमार्गावर गृहस्थांची असलेली स्वाभाविक उपेक्षाबुद्धी व मागासलेपणा दाखविण्याकडे होता. ते वाक्य ऐकून सर्व मंडळी एकमेकांकडे पाहात महाराजांच्या मार्मिक कोटीवर दिलखुलास हसली.
बार्शीला श्रींचा मुक्काम श्री. जंबूराव आरवाडे यांच्या बागेमध्ये होता. श्री. प्रद्युम्नसाहूजीबरोबर दर्शनाचा योग आला. आग्रहवश श्रींनी उपदेशाच्या दोन गोष्टी सांगितल्या. गाडीची वेळ झालेली. उठताना उपचाराचे दोन शब्द बोलून व्यवहार म्हणून सहजी म्हटले, 'महाराज (मुनि श्री समंतभद्रजी) संस्था गळ्यात बांधून मोकळे झाले !' वाक्य पूर्ण होते न होते तोच आचार्य श्री म्हणाले, 'तुम्हीही कुणाच्या तरी गळ्यात बांधून मोकळे व्हा !' बोलण्याची सोयच नव्हती. ह्या सहज निघालेल्या उद्गारात श्रींचा खोल आशय कोणता होता हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही.
___ बाहुबली येथे प्रतिष्ठेसाठी आचार्यश्रींनी यावे म्हणून प्रार्थना करण्यासाठी गजपंथ येथे जाणे झाले. श्रींचे चरण लागावे अशी सर्वांचीच इच्छा असणे स्वाभाविक होते. प्रार्थना करताच श्री म्हणाले, 'बाबारे ! नागव्या माणसाला कशाला नेता ? नेणे का सुखाचे आहे ? ३५० मैलांचे तरी अंतर असेल ! बरे ! नेणार तरी कशाने ? विमानाने नेणार की मोटारीने नेणार की आगगाडीने ? की डोलीत नेणार ?'
'महाराजांनी संकेत करावा. आज्ञेप्रमाणे सर्व व्यवस्था होईल.' म्हटल्यावर श्रींनी सर्व साधक वाधक गोष्टी सांगून हा वृथा आग्रह व व्यामोह सोडण्यास सांगितले.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org