________________
अन्मति-तीर्थ (५) वादविवाद-संगम : एक समीक्षा
- शकुंतला चोरडिया
अन्मति-तीर्थ समस्त भूतलावर राजहंसाचे चालणे डौलदार आणि सुंदर आहे. म्हणून काय इतरांनी चालूच नये?
मनात हा विचार आला आणि अस्वस्थ झालो. तसाच तडक महावीरांच्या धर्मसभेत जाऊन बसलो. सभा संपल्यावर महावीरांना मनातली शंका विचारली. महावीर हसले व म्हणाले, 'हे भद्र, तुझ्या मनातली शंका रास्त आहे. पण माझ्या गाथेचा व माझ्या म्हणण्याचा तो अन्वयार्थ नव्हता. मला सर्वांना एवढेच सांगायचे होते की, सुरळीत आयुष्य जगणारी डरपोक माणसेच स्वत:ला शूर समजतात व शेखी मिरवितात. पण एकदा का अडचणी आल्या की ती विचलित होतात. आपल्या ध्येयापासून, कर्तव्यापासून पळ काढायचा प्रयत्न करतात. तेव्हा तसे करू नका. या गाथेतला 'सूर' हा शब्द 'अहं' भावनेचे प्रतीक आहे. त्याला अंगिकारू नका. इतरांना तुच्छ लेखू नका. मोहावर विजय मिळविणे हे एक आव्हान असते. ते स्वीकारा, अडचणींचा सामना करा. त्यात तुमचे शूरत्व आहे. त्यात तुमचा पुरुषार्थ आहे. ध्येयाच्या शिखराकडे लक्ष असू द्या. छोट्या-मोठ्या यशावर समाधान मानू नका आणि हे सर्व करता करता, परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा, ते तादात्म्यच तुमच्या प्रगतीला पूरक ठरेल.'
महावीरांचे हे बोलणे ऐकले व मनातली खळबळ नाहिशी झाली. त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होणारी तळमळ, लोकांच्या कल्याणाची काळजी पाहून त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. शांत व तृप्त मनाने मी घराकडे वळलो.
स्वसमय-परसमय या जीवनाच्या दोन मुख्य सिद्धांतांवर सूत्रकृतांगाची रचना झाली. लोकांची मती, नीती, प्रवृत्ती बघून भगवंतांनी तत्त्वांची विखुरणी केली. विचारांच्या झऱ्यात प्रवाहित होऊन चिंतनाच्या खळखळाटाने मनाची दारे उघडली. समवसरणाच्या नव्या अर्थाची गवसणी झाली आणि ३६३ पाखंडींची मते नोंदविली गेली. वादविवाद सभा रंगत गेली. वेगवेगळ्या वादींचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. वादविवाद संगमाच्या सभेची समालोचना करून यथार्थाची मात्र दृष्टी मिळाली.
इहलोक, परलोक कोणी पाहिले, प्राप्त वर्तमान स्थितीत मनसोक्त रमले, पुण्य-पाप, शुभ-अशुभ, सदाचार-दुराचाराच्या व्याख्याच विसरले, पंचमहाभूतांनी वेष्टित अशी चेतना गेल्यावर, आत्माराम मातीतच विरले, अशी भ्रांती ठेवणारे बृहस्पतीमतानुयायी चार्वाक अज्ञानवादीत गणले गेले. एकाच आत्म्याने भिन्न-भिन्न रूप धारण केले, मती सुधारली त्याने पुण्य केले, मती बिघडली त्याने पाप केले, सुख-दुःखाचे मूल्यमापन तुमच्या कर्तृत्वावर गेले, केवळ आत्मा हेच अंतिम सत्य मानले आणि पुद्गलांना गौण केले, ते आत्मद्वैतवादी एकात्मवादी ठरले. पंच महाभूतांचा समुदाय म्हणजे शरीर त्यात आत्म्याचे अवतरण झाले, प्रत्येक शरीराचा आत्मा वेगळा, म्हणून ज्ञान अज्ञानाचे गट झाले,