________________
२१. जैनधर्म व शीखधर्म : काही तुलनात्मक निरीक्षणे
(सन्मति-तीर्थ वार्षिक पत्रिका, जून २००९)
(ज्ञान व माहितीचा प्रसार हे एकविसाव्या शतकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व जग झपाट्याने जवळ येत आहे. सर्व धर्म व संप्रदायांच्या माणसांना फक्त आपला धर्म आणि संप्रदायापुरताच संकुचित विचार करून चालणार नाही. जगात शांतता आणि सलोखा नांदायचा असेल तर एकमेकांच्या धर्माचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. जैन धर्मात तर इतरांच्या मतांचा आदर करणे हे तत्त्वत: अनेकान्तवाद आणि स्याद्वादाच्या रूपाने मान्यच केले आहे. याच उद्दिष्टाने प्रेरित होऊन सन्मति-तीर्थ संस्थेत प्रगत अभ्यासक्रमाच्या रूपाने जगातल्या सर्व प्रमुख धर्मांची तोंडओळख विद्यार्थ्यांनी करून घेतली. २००८-२००९ या वर्षात शीखधर्माविषयी जे चिंतन केले त्यातून पुढील तौलनिक निरीक्षणे मांडली आहेत.)
विश्वकोशातील माहितीप्रमाणे शीखधर्म हा जगातील पाचवा मोठा धर्म आहे. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, हिंदू आणि शीख हा त्यांचा क्रम आहे. साहजिकच भारतात सर्वात उशिरा जन्माला आलेला हा धर्म आज संख्येच्या दृष्टीने जैनांपेक्षाही जास्त आहे. इ.स. च्या १५ व्या व १६ व्या शतकात शीखधर्माचा प्रारंभ व क्रमाक्रमाने विकास होऊ लागला. अभ्यासकांचा असा अंदाज आहे की जगभरात २ कोटी ३० लाख लोक शीखधर्मी आहेत.
जैनधर्म परंपरेने अनादि मानला आहे. लेखी पुराव्यानुसार तो ऋग्वेदाहनही नक्की प्राचीन आहे. जैनधर्माचा इतिहास पाहू लागल्यास असे दिसते की स्थानकवासी संप्रदाय ज्या काळात निर्माण झाला साधारणत: त्याच काळात शीखधर्माचाही उदय झाला. उशिरा स्थापन होऊनही शीखधर्मीय संख्येने जास्त असण्याची कारणे नक्कीच त्या धर्माच्या वैशिष्ट्यांमध्ये सामावलेली आहेत. क्लिष्ट तत्त्वज्ञान, अवघड परिभाषा, आचाराचा कडकपणा, खाण्यापिण्यावरील निर्बंध आणि साधुवर्गाला पायीच विहार करून प्रसार करण्याचा असलेला नियम यामुळे जैनधर्माच्या प्रसाराला साहजिकच मर्यादा पडल्या. वरील सर्व बाबतीत शीखधर्म सहजसुलभ व उदारमतवादी दिसतो.
शीख' हा जरी 'धर्म' म्हणून ओळखला जात असला तरी तो वस्तुत: हिंदूधर्माचा एक संप्रदायच आहे. गुरू नानकदेवांनी हिंदूधर्मातील अनिष्ट प्रथा व चालीरीतींमध्ये सुधारणा घडवून हा संप्रदाय स्थापला. शीख तत्त्वज्ञानावर सांख्य आणि वेदान्त तत्त्वज्ञानाची असलेली छाप तसेच ब्रह्म, परमात्मा, जगत्, ईश्वर, प्रकृति, पुरुष, माया इ. परिभाषाही शिखांनी हिंदू धर्मातूनच घेतलेली दिसते.
जैनधर्म हा वैदिक, ब्राह्मण अथवा हिंदू धर्माची शाखा अगर संप्रदाय नसून तो एक स्वतंत्र श्रमणधर्म आहे. त्याची मूळ तत्त्वे, सिद्धान्त, ईश्वराविषयीची मान्यता, अहिंसा-संयम-तप-वैराग्य यांना असलेले प्राधान्य, हे सर्व त्या धर्माची स्वतंत्रता सिद्ध करण्यास पुरेसे आहे. काळानुसार बाह्य परिवर्तने येऊनही जैन धर्माचा गाभा तोच राहिला.
___ दोन्ही धर्मांच्या धार्मिक ग्रंथांच्या स्वरूपातही मूलगामी भेद आढळतात. दोन्ही धर्मांचे ग्रंथ त्या-त्या काळात बोलीभाषेत असणे' हे साम्य मात्र त्यात दिसते. गरुग्रंथसाहिब या एकाच ग्रंथाला शीखधर्माने मळ आगमग्रंथाचा दर्जा दिला आहे. जैनांमध्ये श्वेतांबर संप्रदायाने ४५ अथवा ३२ अर्धमागधी आगमग्रंथ मानले आहेत. दिगंबरीय लोक शौरसेनी भाषेतील प्राचीन ग्रंथांना आगमग्रंथ मानतात. याचा अर्थ असा की जैन आगमग्रंथ विस्ताराने व संख्येने कितीतरी अधिक आहेत.
ग्रंथसाहिबातील पद्यांच्या विभागणीचा मुख्य आधार ‘रागानुसारी रचना' हा आहे. शीखधर्मात एकंदरीतच गायन आणि वादनाला महत्त्व असल्यामुळे ग्रंथसाहिबातील पद्ये रागांवर आधारित, गेय, रसाळ व भक्तिरसपूर्ण आहेत. याउलट गायनवादन इ. सर्व कलाविष्कार जैन साधूंसाठी पापश्रुत व वर्जनीय मानले आहेत. त्यामुळे काही जैन आगम छंदोबद्ध असले तरी गायनवादनाला त्यात स्थान नाही. शिवाय 'गुरु मानियो ग्रंथ' असे म्हणून शिखांच्या