________________
(७) सरगय-या शब्दाची संस्कृत छाया ‘स्वरगत' अशी घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- मौखिक संगीत १६ (वै), आवाजाने संगीत करणे (बा), संगीतातील स्वर ओळखणे (उ.गु.)-सरगय शब्दाची संस्कृत छाया 'शरगत’ आणि ‘स्मरगत' अशीही होते. शरगत म्हणजे बाणविद्या ही पुढे धनुर्वेद या नावाने येते. स्मर म्हणजे मदन, काम. तेव्हा स्मरगत म्हणजे कामकला, प्रेमकला, कामशास्त्र असा अर्थ होतो (आ).
(८) पोक्खरगय (पुष्करगत) :- ड्रमने संगीत करणे (बा), ड्रम वाजविणे (वै), पुष्कर हे संगीताचे वाद्य वाजविणे (उ), वाजिव समारवानी कळा (गु). वाद्य ही कला मागे येऊन गेली आहे. तेव्हा पुष्कर वाद्याचे वादन असा अर्थ घेण्यात औचित्य वाटत नाही. म्हणून पुढील अर्थ योग्य वाटतो. पुष्कर म्हणजे पाणी (गीलको), मग पुष्करगत म्हणजे जलतरण, पोहण्याची कला (आ).
(९) समताल (समताल) :- झांज/टाळ' यांचे संगीत (वै), झांज/टाळ८ वाजविणे (बा), संगीतातील१८ कालाचे नियमन (उ), समान ताल जाणण्याची कला (गु). मागे वाइय येऊन गेल्याने, झांज/टाळ वाजविणे ही कला स्वतंत्र सांगण्याची जरूरी दिसत नाही. त्यामुळे हाताच्या टाळीने ठेका देणे, अनेक वाद्यांचा समताल९ साधणे/ ओळखणे हा अर्थ बरा वाटतो.
(१०) जूय (द्यूत) :- द्यूत (बा,वै,उ,गु) जुगार.
(११) जणवाय :- या शब्दाची ‘जनवाद' अशी संस्कृत छाया घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- लोकांशी वा लोकांना आवडेल असे संभाषण (बा), समाजातील वक्तृत्व (वे), संभाषण (उ), लोकांबरोबर वादविवाद (गु).
ही कला नाम, सम, औप आणि वैप/उपमध्ये आहे, पण राज/राय यांत ‘जणवय' असे आहे. शक्यता अशी वाटते की 'जणवय' हा मुद्रणदोष असावा. तथापि जणवय ही स्वतंत्र कला घेतल्यास काय अर्थ होईल हे पुढे सांगितले आहे.
येथे जणवाय शब्दाची ‘जनव्रात' अशी संस्कृत छाया होऊ शकते ; त्याचा अर्थ जनसमूह. तेव्हा लोकसमूहावर नियंत्रण ठेवण्याची कला, लोकांचे नेतृत्व करण्याची कला असा अर्थ होतो (आ).
(१२) अट्ठावय: - या शब्दाची ‘अष्टापद' अशी संस्कृत छाया घेऊन पुढील अर्थ दिले जातात :- आठ चौरस२१ असणाऱ्या पटाचा खेळ (बा), आठ चौरसांचा खेळ१ (वै), बुद्धिबळाचा खेळ२९ (वै), आठ चौरस२१ असणारा फाशांचा पट (उ), सोंगट्यांचा पट२२ (चोपाट) (गु) - अट्ठावय शब्दाची संस्कृत छाया ‘अर्थपद' अशी होऊ शकते. त्या शब्दाचा अर्थ 'अर्थशास्त्र' होऊ शकतो. तेव्हा कौटिलीय अर्थशास्त्र सारख्या शब्दांत अर्थशास्त्र शब्दाचा जो अर्थ तोच अर्थ येथे आहे (आ).
(१३) पोरेकच्च, पोक्खच्च :- पोरेकच्च हा शब्द नाया, वैप/उप, आणि औप यांत आहे. वैपमधील टीपांत 'पोरेकत्त' असाही शब्द दिलेला आहे. राज/रायच्या दोन पोथ्यांत पारेकव्व' असा शब्द आहे. सम.मध्ये पोक्खच्च असा शब्द आहे. आता, पारेकव्व आणि पोक्खच्च हे दोन्हीही शब्द पासममध्ये आढळत नाहीत. पुरस्कृत्य वा पौरस्कृत्य या संस्कृत शब्दांची वर्णान्तरे प्राकृतमध्ये पोरेकत्त, पोरेकच्च आणि पोक्खच्च अशी होऊ शकतात. म्हणून येथे पोरेकच्च व पोक्खच्च ही एकाच कलेची नावे मानलेली आहेत. 'पारेकव्व' हा शब्द मात्र लेखक-प्रमाद किंवा मुद्रणदोष असावा.
पोरेकच्च शब्दाचे असे अर्थ दिलेले आहेत :- नगररक्षक२३ (बा), नगररक्षकाची२३ कर्तव्ये (?) (वै), नगररक्षणाचे२३ कर्तव्य अथवा नगररक्षक३-कर्तव्ये (उ), नगररक्षण (गु), या अर्थांमध्ये पौरकृत्य अशी संस्कृत छाया घेतलेली दिसते. परंतु ती घेऊनही पुढील अर्थ होऊ शकतो :- पौरकृत्य म्हणजे नागरिकांची कार्ये म्हणजे त्यांचे कज्जे, तक्रारी इत्यादि सोडविणे म्हणजे न्याय देण्याची कला असा अर्थ होतो (आ). पुरस्कृत्य अशी छाया घेतल्यास, सन्माननीय/माननीय व्यक्तीचा आदरसत्कार/मानसन्मान करण्याचे ज्ञान असा अर्थ होईल (आ).
(१४) दगमट्टिया (उदकमृत्तिका) :- मातीबरोबर पाणी मिसळणे (बा,वै), पाणी व माती यांच्या गुणांची