________________
१७. जैन धर्मातील वैज्ञानिकता
(दशलक्षणपर्वानिमित्त विशेष व्याख्यान, बारामती, ऑगस्ट २००९)
प्रस्तावना :
जैन धर्मातील वैज्ञानिकता या विषयावर बोलण्याचा अधिकार वस्तुत: एखाद्या वैज्ञानिकाचा अथवा शास्त्रज्ञाचाच आहे. भाषा, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास असलेल्या माझ्यासारख्या सामान्य अभ्यासकाला हा अधिकार पोहोचत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तथापि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक संशोधक हे जैन धर्मतत्त्वांची माहिती असणारे मिळणे हे दुरापास्त आहे. याउलट धर्माच्या अभ्यासकाला वैज्ञानिक संशोधन पद्धती आणि वैज्ञानिक सूत्रे अचूक सांगता येणे फार अवघड आहे. तरीही संयोजकांनी दाखविलेल्या विश्वासाला मान देऊन जैन धर्मातील वैज्ञानिकता शोधण्याचा व त्याचे मूल्यमापन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
वैज्ञानिक असल्याचा दावा :
केवळ जैन परंपराच नव्हे तर वैदिक अथवा हिंदू परंपरा सुद्धा वेद, उपनिषदे, दर्शने, रामायण, महाभारत यांमध्ये अतिप्रगत वैज्ञानिकता आढळते असा दावा करते. त्यांच्या मते प्रगत अस्त्रे, शस्त्रे, विमानतळ, पुष्पक विमानासारखी विमाने, सागरी सेतू बांधण्याचे प्रगत तंत्रज्ञान, भूगोल, ज्योतिष, वास्तू यांसंबंधीचे सर्व प्रगत ज्ञान आमच्या प्राचीन ऋषिमुनींना होतेच. संस्कृतमध्ये असलेल्या विविध शास्त्रविषयक ग्रंथसंपत्तीवर नजर टाकली असता असे दिसते की एकेकाळी आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीत अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिष, खगोल, गणित, नाट्यशास्त्र, आयुर्वेद, योग या विषयांवर आधारित प्रमाणित ग्रंथांचा समावेश झालेला होता. या सर्व बाबतीत आपण एकेकाळी प्रगत होतो. परंतु मध्ययुगानंतर सामाजिक विषमता, परकीय आक्रमणे, युद्धे, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांनी ही शिक्षणपद्धती लोप पावत गेली. आज आता विविध शास्त्रे व कला यांची जी शिक्षणपद्धती आहे, ती सर्वस्वी पाश्चात्य शिक्षण-पद्धतीवरच बेतलेली आहे. आपण ज्या ज्या सुखसुविधा व उपकरणे वापरतो ती जवळजवळ सर्वच प्रथमतः विदेशी शास्त्रज्ञांनी बनविलेली आहेत. अशा परिस्थितीत आपला वैज्ञानिकतेचा दावा पुन्हा एकदा तपासून पाहाण्याची वेळ आली आहे. जी गोष्ट हिंदूंबाबत तीच गोष्ट जैनांच्या बाबतही खरी आहे.
निर्विवादपणे वैज्ञानिक असलेली जैन जीवनशैली : काही मुद्दे
मानवी आरोग्य उत्तम राखण्यासाठी जैन जीवनशैलीतील काही मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत. आज जगातील ९०% लोक मांसाहारी असले तरी शाकाहाराचे महत्त्व सर्वांनाच हळूहळू पटू लागले आहे. बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू आणि इतरही अनेक संसर्गजन्य रोग मांसाहारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातूनच मानवांपर्यंत पोहचत आहेत. प्राण्यांची कृत्रिम पैदास करण्यामुळे तयार झालेल्या नव्या प्रजाती, निसर्गातील प्राण्यांसारख्या रोगप्रतिकारक्षम नसतात. त्यामुळेच गायी-गुरे-मेंढ्या - कोंबड्या - डुक्करे इ. मध्ये नवनवीन रोग पसरतात. त्यानंतर संसर्गाने ते मानवापर्यंत पोहोचतात. संपूर्ण शाकाहारी भोजनशैली स्वीकारल्यास हे सर्व टळू शकते.
अर्थात् शाकाहारासंबंधी सुद्धा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. धान्याच्या विविध प्रकारांच्या संकरित जाती आणि भरपूर धान्य उत्पादनासाठी वापरण्यात येणारी हानिकारक रासायनिक खते यामुळे शाकाहार सुद्धा अनेक प्रकारे प्रदूषित झाला आहे. म्हणून आरोग्याची जाणीव असलेले शाकाहारी, नैसर्गिक खतांवर पोसलेले धान्य व भाजीपाल्याची निवड करू लागलेले आहेत.
रात्रिभोजनत्याग अर्थात् सूर्यास्तापूर्वी भोजन घेणे, आरोग्यविज्ञानाशी संपूर्णतः सुसंगत आहे. तरीही आपल्या व्यस्त शहरी जीवनशैलीत हे तत्त्व प्रत्यक्ष व्यवहारात पाळणे शक्य होत नाही. जी व्यक्ती रात्रीचे भोजन आणि