________________
३. जैन तत्त्व चिंतन (१ ते ४ )
(आकाशवाणी - पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
१. तीर्थंकरप्रणीत धर्म
आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून तीन धर्म प्रचलित आहेत. हिंदु किंवा वैदिक धर्म. जैन धर्म आणि बौद्ध धर्म. जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे की हिंदू धर्माची शाखा आहे, या वादविवादात आज आपल्याला शिरायचं नाही. हिंदू परंपरेपेक्षा आपल्या वेगळ्या तत्त्वज्ञानानं आणि आचरणानं उठून दिसणारी जैन परंपरा, श्रमण परंपरेतील एक मुख्य विचारधारा आहे. जी मनुष्य म्हणून जन्मली, राग-द्वेष इत्यादी विकारांवर ताबा मिळवला आणि शुद्ध आचरणानं श्रेष्ठ आध्यात्मिक सामर्थ्यानं भूषित झाली, त्या व्यक्तीस 'जिन' म्हणतात. अशा जिन भगवंतांनी सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाच्या इच्छेनं प्ररित होऊन, जो उपदेश दिला, जी आचारसंहिता घालून दिली व जे तत्त्वज्ञान सांगितले, ते सर्व जैन धर्माच्या अंतर्गत येते.
जैन परंपरेनुसार, जैन धर्म अनादि आहे. जैन धर्माच्या प्रवर्तक पुरुषांना 'तीर्थंकर' म्हणतात. ऋषभदेव पहिले तीर्थंकर असून भ. महावीर हे २४ वे तीर्थंकर आहेत. तीर्थंकर हे हिंदू संकल्पनेत असलेल्या अवतारांपेक्षा वेगळे म्हेत. महावीरांचा सर्वमान्य काळ इ.स.पू. ५०० आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रभावी आचार्यांनी हा धर्म आपल्यापर्यंत पोहोचविला. वेगवेगळे जैन आचार्य आपल्या ग्रंथात 'धर्म म्हणजे काय ?' हे अनेक प्रकारे समजावून सांगतात.
धर्म हा मंगल व उत्कृष्ट आहे कारण अहिंसा, संयम व तप ही प्रमुख तत्त्वे समजावून सांगतो. जो धर्माला सदैव मनात ठेवतो, त्याला देवही वंदन करतात. वस्तूच्या मूळ स्वभावाला धर्म म्हणतात. क्षमा, मार्दव, ऋजुता, सत्य, शुचिता, संयम, तप, इ. १० प्रकारच्या गुणांनाही आत्म्याचे गुण मानतात. हे गुण धार्मिक व्यक्तीत सहजच प्रकट होतात. जीवांच्या रक्षणालाही धर्म म्हणतात. धर्म दयाप्रदान असतो. धर्म, देव अगर गुरू यांच्या नावाखाली केलेल्या हिंसेला धर्मात कधीच थारा नसतो. जास्त काय सांगावे ? जे आपल्याला प्रतिकूल आहे ते दुसऱ्यांच्या बाबतीत चुकूनसुद्धा न करणे हाच धर्म. गाजावाजा, अवडंबर न करता धर्माचरण शांततेने व सतत करीत रहावे. धर्मरूपी मा ‘विनय' हे मूळ असून, ‘मोक्ष' हे फळ आहे. धर्माचा पाया श्रद्धा आहे. ती श्रद्धा नीट पारखून ठेवलेली असेल तरच ‘सम्यक्’ बनते. धर्मपालनासाठी व्रते ग्रहण करणे आवश्यक आहे. व्रतांचे पूर्ण पालन केले की ती 'महाव्रते' होतात. 'अहिंसा' हे सर्वात प्रमुख महाव्रत आहे. इतर व्रते त्याच्या रक्षणासाठी सांगितली आहेत. जैन आचार्य आत्मचिंतनाला नवीनच खाद्य देतात. ते म्हणतात, “जीववध हा आत्मवध असून जीवदया ही वस्तुत: आपल्यावरच केलेली दया आहे. "
*************