________________
१. जैन परंपरा ('संस्कृति-दर्शन' या संस्कृतिकोषासाठी प्रदीर्घ लेख, मे २०११)
(१) प्राक्कथन :
जैनधर्म हा केवळ तत्त्वज्ञान अथवा आचारपद्धतीपुरता मर्यादित नाही. जीवन जगण्याची ती एक पूर्ण स्वतंत्र शैली आहे. ब्राह्मण अथवा वैदिक परंपरेइतकी किंबहुना त्याच्याही पूर्वी प्रचलित असलेल्या श्रमण परंपरेची ही एक शाखा आहे. जैन परंपरेला स्वत:चा स्वतंत्र असा एक इतिहास आहे. दार्शनिक दृष्ट्या जैनधर्म हा निरीश्वरवादी, बहुतत्त्ववादी आणि वास्तववादी आहे. अहिंसा, कर्मसिद्धांत आणि अनेकांतवाद हे जैन तत्त्वज्ञानाचे आधार आहेत. जैन आचार्यांनी विविध प्रकारच्या प्राकृत बोलीभाषांमध्ये लेखन करून भारतीय साहित्याला अनमोल योगदान केले आहे. आचाराच्या दृष्टीने साधुआचार आणि गृहस्थांचा आचार अशी नियमबद्ध आखीव-रेखीव आचारपद्धती जैन समाजात प्राचीन काळापासून चालत आली आहे. आजही बऱ्याच अंशाने ती जशीच्या तशी पाळली जात आहे.
सामान्यतः निवृत्तिगामी अथवा मोक्षलक्षी मानल्या गेलेल्या या जैन परंपरेने धर्मप्रभावनेसाठी म्हणून कलेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गुंफा, चैत्य, स्तूप, मूर्ती, मंदिरे, चित्रकला, स्तंभलेख आणि शिलालेख व शिल्पे यांच्या रूपाने भारतीय कलेला जैनांनी मोठेच योगदान दिलेले आहे. गेल्या काही दशकामध्ये जैनॉलॉजी अर्थात जैनविद्या ही अभ्यासशाखा देशात व परदेशात झपाट्याने वृद्धिंगत होत आहे. आरंभापासून आतापर्यंत अल्पसंख्यांक असूनही या समाजाने एकाचवेळी आपली पृथगात्मकताही जपली आहे आणि भारतीय संस्कृतीशी एकात्मकताही साधली आहे.
(२) 'जैन' शब्दाचा अर्थ :
'जैन' हा शब्द 'जिन' शब्दावरून साधलेला आहे आणि जिन हा शब्द संस्कृतमधील 'जि' या क्रियापदापासून बनलेला आहे. जिन म्हणजे जेता, जिंकणारा. राग अथवा आसक्ति जिंकतो तो जिन. जिन हा शब्द चोवीसही तीर्थंकरांचे बाबतीत समानपणे वापरला जातो. या जिनांनी प्रणीत केलेले ते 'जैनदर्शन' होय. जिनांनी सांगितलेल्या मार्गामध्ये रत असणारा, जिनप्रणीत मार्गाचे आचरण करणारा तो 'जैन' होय. जिनांनी प्रणीत केलेले मत अथवा तत्त्वज्ञान म्हणजे 'आर्हत मत' अथवा 'आर्हत दर्शन' होय.
(३) जैनधर्माची उत्पत्ती व प्रारंभिक विकास :
जैनधर्माची उत्पत्ती आणि विकास पाहण्यासाठी प्रथम जैन तत्त्वज्ञानातील कालचक्र ही संकल्पना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विश्वाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने विचार केला तर ते अनादि-अनंत आहे. व्यावहारिक दृष्टीने २० कोडा-कोडी (२० कोटी X २० कोटी) सागरोपम वर्षे हा प्रदीर्घ काळ कालचक्राच्या एका परिवर्तनाचा आहे. ज्या संख्यांची गणती करता येत नाही अशा संख्यांना जैनशास्त्रात उपमेच्या द्वारे (सागरोपम, पल्योपम) स्पष्ट करण्याचा प्रघात आहे. कालचक्राची अशी अनंत आवर्तने होऊन गेली आहेत व पुढेही होणार आहेत.
प्रत्येक कालचक्राचे अवसर्पिणी (वरून खाली येणारा) व उत्सर्पिणी (खालून वर जाणारा) असे दोन अर्धभाग असतात. प्रत्येक अर्धभागामध्ये समान असे सहा-सहा आरे असतात. वर्तमान कालचक्राच्या अवसर्पिणी भागाच्या तिसऱ्या आऱ्याच्या शेवटी प्रथम तीर्थंकर ऋषभदेव' अथवा 'आदिनाथ' हे होऊन गेले. चौथ्या आऱ्याच्या प्रारंभी चावीसावे तीर्थंकर भ. महावीर होऊन गेले. या दोन काळांच्या दरम्यान मधील बावीस तीर्थंकर होऊन गेले.
२४ तीर्थंकरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) ऋषभदेव (२) अजितनाथ (३) संभवनाथ (४) अभिनंदन (५) सुमतिनाथ (६) पद्मप्रभ (७) सुपार्श्वनाथ (८) चन्द्रप्रभ (९) सुविधिनाथ (१०) शीतलनाथ (११) श्रेयांसनाथ (१२) वासुपूज्य (१३) विमलनाथ