________________ अपत्याचे स्वागत करतात. अपत्यप्राप्तीसाठी नवस करतात. दत्तकाची पद्धत तुरळक आढळते. डोहाळे कोणत्याही प्रकारचे असले तरी, पती व कुटुंबीय ते पुरविण्यात तत्पर आहेत. मातेचे संबंध पुत्राशी, तर पित्याचे कन्येशी,अधिक जवळकीचे आहेत. अपत्यांविषयीच्या जबाबदाऱ्या पति-पत्नी दोघे मिळून पार पाडतात. दास-दासी ठेवण्याची पद्धत आहे. धात्रींचा दर्जा बराच चांगला आहे. दास्यत्वातून क्वचितच सुटका होते. दासींची आर्थिक, सामाजिक, धार्मिक व कामजीवनविषयक स्थिती अत्यंत अनुकंपनीय आहे. भारताच्या प्राचीन इतिहासातील ते अंधकारमय पर्व आहे. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे सामाजिक स्थान : व्यक्ती कुटुंबात जन्मलेली असली तरी वावरत असते ती समाजात ! व्यक्तीच्या जडणघडणीत समाजाचा मोठाच वाटा असतो. कर्मपरिणाम व पुरुषार्थवादाला प्राधान्य देणाऱ्या जैन धर्मात, रूढीनुसार केलेल्या जन्मापसून मृत्युसंस्कारापर्यंतच्या संस्कारांना, खरे तर खास स्थान नाही. संस्कृत मंत्र व विविध विधानांनी भरलेले कर्मकहप्रधान संस्कार आगमांत दिसत नसले तरी, समाजाच्या रेट्याने या संस्कारांना पूर्णविराम मिळू शकलेला दिसत नाही. मग्न नियम-अपवादांनी भरलेले क्लिष्ट संस्कार काहीसे सुलभ झालेले दिसतात. आगमकालीन स्त्री खऱ्याखुऱ्या अर्थाने समृद्ध व कलात्मक आयुष्य जगते ती विविध सामाजिक उत्सवात भाग घेऊनच ! स्त्री-पुरुष, कुमार-कुमारी, बालक-बालिका या उत्सवप्रसंगी समाजात मोकळेपणाने वावरताना दिसतात. त्यातील काही उत्सव धार्मिक स्वरूपाचे तर काही निव्वळ आमोद-प्रमोदासाठी दिसून येतात. खाद्य-पेय, नृत्य-गीतनाटक, माल्य-पुष्पे यांची रेलचेल असलेल्या या उत्सवांमध्ये, समाजाच्या सर्व स्तरातील स्त्रिया सहभागी होताना दिसतात. 'संखडी' या आधुनिक काळातील 'फूड फेस्टिव्हल'सारख्या आहेत. फक्त तेथे अन्नाचा क्रयविक्रय होत नाही. रूढी, अंधविश्वास, अपसमज, शकुन-अपशकुन यांच्या जोखडातून, कोणताही समाज कोणत्याही काळी सुटू शकत नाही. आगमकालीन जैन समाज देखील वैदिक देवता व स्थानिक देवतांच्या पगड्याखालून सुटलेला दिसत नाही. डोहाळे, नवस, अपत्यप्राप्ती या संदर्भात स्त्रिया यक्ष, भूत, पिशाच, तंत्र-मंत्र, जादूटोणा यांना आश्रय देतान दिसतात. काम, वासना, विषय-भोग, स्त्रीपुरुष-आकर्षण यांचा विचार आगमांत वारंवार केलेला दिसतो. अर्थात् तो वर्जनाच्या, निषेधाच्या स्वरूपात व निंदेच्या सुरातच केलेला दिसतो. विविध गुन्ह्यांचा व विशेषत: अनैतिक संबंधया उगम, अनेक ठिकाणी स्त्रियांच्या अतृप्त कामजीवनात दिसतो. बहुपत्नीत्वपद्धतीमुळे अंतर्गत हेवेदावे, मत्सर व वधापर्यंतही मजल गेलेली दिसते. वेश्या व गणिका या प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या संस्था, आगमकाळी चांगल्याच स्थिरावलेल्या व प्रतिष्ठाप्राप्त दिसतात. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र व समृद्ध, अद्वितीय सौंदर्याच्या सम्राज्ञी, विविध विद्या व कलांत प्रवीण व शृंगाररसाचे आगर असलेल्या कामध्वजा व आम्रपालीसारख्या गणिकांचे, जैन व बौद्ध आगमात वर्णिलेले स्थान, हे आगमकालीन सुदृढ कामजीवनाचे प्रतीक आहे. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे धार्मिक स्थान : जैन धर्मग्रंथांत, साध्वीधर्म स्वतंत्रपणे प्रतिपादन केलेला दिसत नाही. साधुधर्माच्या आधारेच तो समजून घ्यावा लागतो. साध्वींच्या दीक्षेची कारणे, दीक्षेस अनुमती, दीक्षामहोत्सव यांचा विचार विस्ताराने केलेला दिसतो. सांछ्या दीक्षाविधीइतक्याच गौरवपूर्ण रितीने साध्वींचे दीक्षाविधी झालेले दिसतात. आचारात साधू व साध्वी यांच्याबाबत जो फरक केलेला दिसतो, जे अपवाद केलेले दिसतात, ते साध्वींना गौण लेखण्यासाठी केलेले नसून, त्यांची सुचतिता व शीलरक्षण केले असावेत, असा तर्कसंगत निष्कर्ष काढावा लागतो. संघाचे सर्वोच्च पद देताना मात्र, पुन्हा एकदा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दिसून येतो. उपाध्यायिनी अगर स्त्री गणधर आपणास आगमकालीन जैन संघात आढळत नाहीत. साधुवंदनेबाबतही स्त्रियांचे स्थान गौण दिसते. साध्वींच्या संकटमय जीवनाचे चित्र आगमात दृष्टोत्पत्तीस यो.