________________ 16. जैन धर्मग्रंथांत स्त्रीचे स्थान (दशलक्षणपर्वानिमित्त विशेष व्याख्यान, कोपरगाव, सप्टेंबर 2008) गेली 50 वर्षे संपूर्ण जगात आणि गेली 10 वर्षे भारतात, स्त्रीमुक्तीच्या चळवळीने फारच जोर धरलेला दिसतो. गेल्या काही दशकात विचारवंतांनी या विषयावर इतके काही लिखाण केले आहे की, स्त्रीमुक्तीसंबंधीच्या साहियाचे एक स्वतंत्र ग्रंथालय होऊ शकते. पुण्यासारख्या शहरात अशी स्वतंत्र ग्रंथालये आहेत. अलिकडे समाजातील प्रत्येक घटक कधी नव्हे एवढा जागृत झाला आहे, अशा परिस्थितीत महिला सुद्धा आपापल्या संघटना मजबूत करू लागल्या आहेत. मुंबईत-महागाई प्रतिकार समिती, भारतीय महिला फेडरेशन, पुण्यात-समाजवादी महिला सभा, महिला संपर्क समिती, नारी समता मंच, दिल्लीत-महिला सभा, महिला दक्षता समिती, जनवादी महिला सभा, इंडियन कौन्सिल फॉर फॅमिली वेल्फेअर, तसेच विविध छोट्या मोठ्या राज्यात ग्रामीण पातळीवरही महिला संस्था कार्यरत आहेत. आपल्या परीने या संस्था हुंडा-बेकारी-बलात्कार इत्यादि अनेक अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत आहेत. समाजातील पुरुषप्रधानता हे काही केवळ भारतीयांचे वैशिष्ट्य नाही. इतिहासात डोकावले तर एखादा अपवाद वगळता, संपूर्ण जगभरातच अशी पुरुषप्रधानता दिसते. स्त्रीमुक्तीचा लढा पुरुषांच्या विरुद्ध उभारलेले बंड आहे का ? पुरुषांपासून मुक्ती मिळविण्याच्या नादात भरकटलेले, एकाकी जीवन आपण जगू इच्छितो का ? सर्व देशांच्या बहासात असे दिसते की, स्त्री-जागृतीच्या कार्याला आरंभ पुरुषांच्या पुढाकाराने झाला आहे. गुलामगिरीविरुद्धचा लढा गुलाम नसलेल्यांनीच आरंभिला. कामगार लढ्याबाबतही हेच झाले. स्त्रीमुक्ती ही पुरुषांपासून पळ काढण्यासाठी नसून त्यांच्या सहकार्याने व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याची एक संथगतीची क्रिया आहे. असे सतत जाणवते. स्त्रीमुक्तीच्या चळवळीला योग्य ते अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी भारताच्या गत इतिहासात स्त्रीचे कोणते स्थान होते ते प्रथम पाहू. वैदिक व बौद्ध परंपरेतील स्थान संक्षेपाने पाहू व त्यानंतर जैन धर्मग्रंथांत विशेषत: 11 आग्रंथांत प्रतिबिंबित झालेले स्थान पाहू. वैदिक धर्मात स्त्री : वेदकाळात आरंभी, धर्माचे स्वरूप कर्मकांडात्मक व गुंतागुंतीचे नव्हते. वैदिक सूक्ते रचणे, उपनयन, यज्ञ अश प्रसंगी स्त्रियांचा बरोबरीचा सहभाग असावा असे दिसते. काही मोजक्या उल्लेखांवरून स्त्रियांच्या उच्चस्थानाविषयी निर्विवाद विधाने करणे शक्य नाही. वेद व ब्राह्मणकाळात संन्यासाची व मोक्षाची चर्चा आढळत नाही. उपनिषदात आत्मविद्येची चर्चा येते. परंतु स्त्रियांच्या संदर्भात मोक्षाची चर्चा आढळत नाही. स्त्रियांच्या धार्मिक व सामाजिक स्थानात यानंतर झपाट्याने व्हास सुरू झालेला दिसतो. बहुपत्नीत्वाची चाल, स्त्रियांचे विवाहाचे वय घटणे, उपनयन इ. संस्कारांचा व मंत्रोच्चारणाचा हळूहळू नष्ट झालेला हक्क या सर्वांचा परिणाम म्हणून, इ.स.पू.५०० च्या सुमारस धर्माची द्वारे स्त्रियांसाठी बंद झाल्याचे आपणास दिसते. विविध स्मृतींमध्ये याचे पडसाद उमटलेले दिसतात. जैन व बौद्ध धर्माचा झपाट्याने प्रसार होऊ लागल्यावर व इतरही काही सामाजिक कारणांनी विविध पौराणिक पंथ व भक्मिार्गाचा उदय होऊ लागला. या व्रत-उपासना-भक्तीवर आधारित धर्मात आता हिंदू स्त्रीला पुन्हा स्थान प्राप्त होऊ लागले. स्त्रियांचा संन्यास व स्त्रियांना मोक्षप्राप्ती या संकल्पना हिंदू धर्माने संपूर्णपणे दुर्लक्षिलेल्या दिसतात. आताची धर्मिक हिंदू स्त्री रामायण-महाभारत व पुराणे वाचते, विशिष्ट व्रतवैकल्ये करते, पूजा, नैवेद्य इ. करून विविध सण-वासाजरे करते. गीता, अथर्वशीर्ष, रामरक्षा इ. म्हणते व राम, कृष्ण, शंकर, गणपती अशा अनेकविध देवतांची उपासना करते आजही तिच्या मनात निवृत्ती, संन्यासधर्माचा स्वीकार अथवा मोक्षप्राप्ती हे विचारही येत नाहीत.