________________ कर्मग्रंथी यांचा उल्लेख असून स्पष्ट केले आहे की प्रत्येक जीव स्व-कृत पाप-पुण्याचाच भागीदार असतो. पार्श्वयांच्या तुलनेने वर्धमानांचे विचार त्रोटक आहेत. 'आचारांग' आणि 'उत्तराध्ययन' नावांच्या ग्रंथातील अनेक विषयवस्तूंचे शाब्दिक रूपांतरण यात दिसते. म्हणूनच प्रो. शूबिंग म्हणतात की या ग्रंथाच्या रचनेचा आरंभ पार्श्वनाथांच्या कार्यकाळात (महावीरांपूर्वी 250 वर्षे) झाला असावा. आता इतर ऋषींचे विचार पाहू. इंद्रनाग' ऋषी तपोबलाचे प्रदर्शन करण्यास विरोध दर्शवितात. द्वैपायन ऋषी इच्छेला (वासनेला) अनिच्छेत परावर्तित करण्यास सांगतात. सुख-दुःखांची मीमांसा ‘सारिपुत्त' ऋषी करतात. 'श्रीगिरि' म्हणतात, 'विश्वाला माया म्हणू नका. ते सत्य आहे. अनादि-अनंत आहे'. 'तारायण' ऋषी क्रोधाचे दुष्परिणाम काव्यमयतेने रंगवितात. 'सदैव जागृत रहा, जागृत रहा, सुप्तावस्थेत जाऊ नका'-असा प्रेरक संदेश उद्दालक ऋषी देतात. क्षमा, तितिक्षा आणि मधुरवचनांचे महत्त्व 'ऋषिगिरि' स्पष्ट करतात. दुर्वचन-दुष्कर्म, सुवचन-सुकर्म आणि सत्संगती-कुसंगतीचा विचार 'अरुण' ऋषी परिणामकारकतेने मांडतात. आध्यात्मिक कृषीचे (शेतीचे) रूपक ‘पिंग' ऋषी रंगवतात.आत्मा हे क्षेत्र, तप हे बीज, संयम हा नांगर आणि अहिंसा-समिति ही बैलजोडी आहे. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र - कोणीही ही उत्कृष्ट शेती करू शकतो. 'मातंग' ऋषी देखील अशाच आध्यात्मिक शेतीचा उपदेश करतात. 'नारद ऋषी श्रवणाचे आणि आंतरिक शुद्धीचे महत्त्व सांगतात. ___जैनांनी उदार दृष्टिकोणातून जपलेल्या या ग्रंथातील विचारधन हा सर्व भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. संप्रदायभेद दूर करून आपण तो ग्रंथ वाचू या.