________________ 4. जैन दर्शनातील ‘पुनर्जन्म' संकल्पना ('जैन-जागृति' मासिक पत्रिका, मे 2011) परंपरेने 'आस्तिक' मानलेल्या भारतीय दर्शनांनी ज्याप्रमाणे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या संकल्पना मांडल्या आहेत, त्याचप्रमाणे नास्तिक' समजलेल्या जैन दर्शनानेही या संकल्पना सर्वस्वी मान्य केल्या आहेत. जगत् अथवा विश्व अनादि-अनंत मानल्यामुळे आणि सृष्टिनियामक ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यामुळे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्माला जैन दर्शनात अनन्यसाधारण महत्त्व लाभले. जीव (soul) आणि अजीव (matter) अशी दोन स्वतंत्र तत्त्वे मानली तरी कर्मांना पुद्गल किंवा परमाणुरूप मानून जैनांनी 'कषाय' आणि 'लेश्या' यांच्या मदतीने त्यांच्यातील अनादि संपर्क मान्य केला. सत्ताशास्त्रीय दृष्टीने जीव (individual soul) हे एक गुण-पर्यायात्मक द्रव्य आहे. पुद्गलमय कर्म हेही गुणपर्यायात्मक द्रव्य आहे. यांच्या संपर्कामुळे जीवाला मिळणाऱ्या विविध गतींमधील शरीरे हे जीवाचे जणू पर्यायच आहेत. जन्म-मरणाचे अव्याहत चालू असलेले चक्र हे 'पुनर्जन्मा'चेच चक्र आहे. जैन दर्शनात शरीरांचे पाच प्रकार सांगितले आहेत. शरीर हे जीवाचे क्रिया करण्याचे साधन आहे. औदारिक, वैक्रिय, आहारक, तैजस आणि कार्मण अशी पाच प्रकारची शरीरे एकूण असतात. त्यापैकी तैजस आणि कार्मण ही शरीरे जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाशी अविनाभावाने संबद्ध आहेत. त्यातही कार्मण' शरीर हे वारंवार जन्म घेण्यास कारण ठरणारे मूलभूत शरीर आहे. ते अत्यंत सूक्ष्म आहे. पूर्वकृत कर्मांचा भोग (विपाक) आणि नवीन कर्मबंधंचे अर्जन - ही घटना प्रत्येक जीवात सतत घडत असते. 'उत्तराध्ययन' या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे राग (आसक्ती) आणि द्वेष हे सर्व कर्मांचे बीज आहे. ___आपली गति, जाति, लिंग, गोत्र आणि सर्व शारीरिक-मानसिक वैशिष्ट्ये पूर्वकृत कर्मानुसारच ठरत असतात. अनादि काळापासून एकेंद्रिय ते पंचेंद्रिय सृष्टीत भ्रमण करणारा जीव कर्मांचा पूर्ण क्षय करेपर्यंत सतत नवनवे जन्मधारण करीतच रहातो. कर्मांचे चक्र हे पुनर्जन्मांचेच चक्र आहे. जगातील प्रत्येक जीव अशा प्रकारे इतर अनंत जीवांच्य संपर्कात अनेकदा येऊन गेलेला आहे. जैन दर्शनाच्या दृष्टीने अनंत पुनर्जन्म ‘कविकल्पना' नसून वस्तुस्थिती अहे. पुनर्जन्माच्या वस्तुस्थितीला पुरावा आहे का ? अर्थातच आहे. जैन दर्शनानुसार ज्ञान पाच प्रकारचे आहे. मतिश्रुत-अवधि-मन:पर्याय आणि केवल. त्यापैकी मतिज्ञान' हे इंद्रिये व मनाच्या सहाय्याने होणारे ज्ञान आहे. गर्भजन्मो जन्मणाऱ्या, पंचेंद्रिय संज्ञी (मनसहित) जीवाला विशिष्ट परिस्थितीत 'जातिस्मरण' नावाचे ज्ञान होऊ शकते. लेश्या, अध्यवसाय आणि परिणाम यांच्या विशुद्धीमुळे, मतिज्ञानाला आवृत करणाऱ्या कर्मांचा क्षयोपशम झाल्यास जातिस्मरण' अर्थात् पूर्वजन्माचे स्मरण होते. मानवांना तर ते होऊ शकतेच पण पशुपक्ष्यांनाही होऊ शकते. पूर्वजन्म-पुनमांचा हा व्यक्तिनिष्ठ पुरावा आहे. ____ बौद्ध धर्मातील 'जातककथा' या देखील अशाच प्रकारच्या पूर्वजन्मावर आधारित वृत्तांतआहे. जैन साहित्यातील शेकडो कथांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कथांमधे पूर्वजन्म-पुनर्जन्मांचे कथन असते. पातंजल योगसूत्रातील.३९ (अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथान्त: संबोध:) आणि 3.18 (संस्कारसाक्षात्करणात्पूर्वजातिज्ञानम्) या सूत्रांमधे जातिस्मरणचे उल्लेख आहेत. ____ जैन अध्यात्मात, आध्यात्मिक विकासाच्या 14 पायऱ्या (श्रेणी) आहेत. त्यांना ‘गुणस्थान' म्हणतात. त्यापैकी 4 थ्या पायरीवरील व त्यापुढे प्रगती केलेल्या जीवांना पूर्वजन्मांचे स्मरण' खात्रीने होत असते. 'अवधि' आणि 'केवल' ज्ञानाच्या धारक व्यक्ती आपली एकाग्रता केंद्रित करून इतर व्यक्तींचे पूर्वजन्म व पुनर्जन्म जाणू शकतात. अशा प्रकारे पुनर्जन्माची सिद्धी दुसऱ्याकडूनही होऊ शकते. प्रत्येक गतीत (देव-मनुष्य-नरक-तिर्यंच) आणि जातीत (एकेंद्रिय ते पंचेंद्रिय) जन्मलेल्या जीवाची कायस्थिती