________________
(आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
२. जीव-विचार
विश्वातला कोणताही धर्म घ्या, त्याची दोन अंगे असतात. एक अंग तत्त्वज्ञानाचे असते तर दुसरे आचरणाचे. हा संबंध शरीर आणि चैतन्य यांच्या दृष्टांताने स्पष्ट करण्यात येतो. आचरण हे शरीर असले तर तत्त्वज्ञान हा प्राण. बाह्य आचरणात देश-काल-परिस्थितीनुसार काही ना काही बदल अपरिहार्य आहे. तत्त्वचिंतनाची धारा मात्र सतत अक्षुण्णच रहाते. प्रत्येक भारतीय दर्शनानं आपापल्या विशिष्ट तत्त्वप्रणाली निश्चित केल्या आहेत. तत्त्वांची अगर पदार्थांची गणना केली आहे. जैन धर्मानेही ७ अगर ९ तत्त्वांच्या रूपाने ही मीमांसा केली आहे.
___ मुख्यत: सर्व सृष्टी ही दोन विभागात विभागता येते. जीव व अजीव म्हणजेenergy & matter. नऊ तत्त्वांपैकी पहिले तत्त्व जीव अगर आत्मा आहे. अजीव अगर जीव यांना तत्त्वे म्हणून समान दर्जा दिला आहे. जीव हे अनंत आहेत. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. ज्ञानचेतना अगर बोधशक्ती हे जीवाचे असाधारण लक्षण आहे. त्याला उपयोग' हा पारिभाषिक शब्द दिला आहे. आज आपण जीवतत्त्वाचा अधिक विस्ताराने परामर्श घेऊ.
जीवांचे मुख्य प्रकार दोन. संसारी आणि मुक्त. संसारी म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात सरत जाणारे. मुक्त म्हणजे जन्म-मृत्यू चक्रातून सुटलेले. सिद्ध आणि अर्हत् दोन्ही मुक्त जीवच आहेत. परंतु त्यांच्या कार्यात फरक्आहे. अर्हत् किंवा तीर्थंकर हे जीवनकालात काही काळ तरी उपदेश व मार्गदर्शन करतात. संसारी जीवांचे त्रस व स्थावर म्हणजे हालचाल करू शकणारे (अर्थात् जागा सोडू शकणारे) व जागा सोडू न शकणारे असे दोन भेद असतात. शावर जीव पाच प्रकारचे असतात. पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक. याचा अर्थ आपण नीट समजून घेऊ. गैरसमज असा आहे की जलकायिक जीव म्हणजे पाण्यातील जंतू इ. होत. जैन धर्मातील हे पाण्यातले जीव नसून, ज्यांची शरीरे खुद्द पाणीच आहे असे जीव. हीच गोष्ट पृथ्वीकायिक इ. जीवांची आहे. या सर्वांना एकच इंद्रिय असते व ते म्हणजे स्पर्श. ज्यांना हिंदू दर्शने 'पंचमहाभूते' मानतात त्यांना जैन दर्शन एजेंयि जीव' संबोधतो.
त्रस म्हणजे जागा बदलू शकणाऱ्या जीवांचे दोन इंद्रियवाले, तीन इंद्रियवाले इ. भाग केले आहेत. गांडुळासारख्या प्राण्यांना स्पर्श व रसना ही दोनच इंद्रिये असतात. मुंगी, ढेकूण, कीटकांना स्पर्श, रसना व घ्राण ही तीन झंय असतात. डास, मधमाशी इ. जीवांना चक्षू इ. चार इंद्रिये असतात. गाय, घोडा इ. पृष्ठवंशीय प्राण्यांना श्रवण धरून पाच इंद्रिये असतात. मनुष्य, देव व अधोलोकातील जीवांना पाच इंद्रियांखेरीज मन व विचारशक्तीही असते. 'निगोद' हा सूक्ष्म जीवप्रकार असतो. सर्व जीवांच्या मिळून ८४ लक्ष योनी मानल्या आहेत. आत्मकल्याण करून घेण्याची सर्वात अधिक क्षमता अगर सामर्थ्य मनुष्य योनीत आहे. त्याचबरोबर हेही खरे आहे की संयम व विवेकाच्या अभावी जास्तीत जास्त क्रूर कर्मे करून अधोगतीला जाण्यासही मानवच उद्युक्त होतात. जैनांचा हा जीवविचार विज्ञानाच्या कसोटीवर कस उतरतो हा प्रश्न वेगळा पण चिंतनाला प्रेरक ठरणारा मात्र नक्कीच आहे !