________________
शतकापासून आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ. खंडातील देशांमध्ये जैनधर्मीय श्रावक व्यापारानिमित्त जाऊ लागले. त्यांनी त्या त्या देशात आपला जैनधर्म बऱ्याच प्रमाणात अबाधित ठेवला. आज जगभरात शाकाहार हे जैनांचे वैशिष्ट्य मानले जाते. २० व्या शतकात अगदी अपवादाने का होईना जैन साधु-साध्वीवर्ग परदेशगमन करू लागला. इतर धर्मातून धर्मांतरित होऊन जैनधर्मीय होण्याची प्रक्रिया मात्र १२ - १३ व्या शतकानंतर पूर्णत: कुंठित झालेली दिसते. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहता जैनधर्मीयांची संख्या, शीखधर्मीयांपेक्षाही कमी आहे. अल्पसंख्याक असलेला जैन समाज भारतातल्या कोठल्याही एका विशिष्ट प्रांतात एकवटलेला नसून सर्वत्र विखुरलेला आहे. छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत पोहोचलेला जैन समाज, स्थानिकांच्या भाषा, वेष, चालीरिती सहजतेने आत्मसात करूनही आपल्या धार्मिक प्रथा कसाशीने पाळतात.
(१२) उपसंहार :
अनेक कारणांनी हिंदू धर्माची शाखा मानला गेलेला जैन धर्म वस्तुत: अवैदिक श्रमण परंपरेचे प्रतिनिधित्व करतो. जैनधर्मीय लोक आरंभापासूनच अल्पसंख्याक आहेत. दृढ धर्मश्रद्धा आणि कडक आचरण यामुळे हिंदूधर्मीयांबरोबर मिसळून गेले तरी हरवून गेले नाहीत. स्वतंत्र प्राचीन इतिहास, पृथक् तत्त्वज्ञान, बोली भाषेतले अमाप साहित्य, कठोर चारित्रपालन आणि अनुपमेय कलाविष्कार - या वैशिष्ट्यांमुळे आज जगभरातल्या प्रमुख विद्यापीठांमध्ये 'जैनविद्या' (Jainology) एक स्वतंत्र अभ्यासशाखा बनली आहे.
अर्थहीन क्रियाकांड आणि अतिरिक्त अवडंबर यापासून मुक्त होऊन जैन धर्मातील शाश्वत मूल्ये उजागर करण्यासाठी जैन युवक-युवती अग्रेसर होऊ लागले आहेत. ही एक मोठीच आशादायी घटना मानली पाहिजे.
संदर्भ-ग्रंथ-सूची
१) भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान : डॉ. हीरालाल जैन, मध्यप्रदेश शासन साहित्य परिषद, १९६२ २) दर्शन और चिन्तन (खण्ड १, २) : पं. सुखलालजी संघवी, गुजरात विद्यासभा, अहमदाबाद
३) तत्त्वार्थसूत्र : पं. सुखलाल संघवी, पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९७६
४) जैनधर्म : राजेन्द्रमुनि शास्त्री, संजय साहित्य संगम, आगर, १९७१
५) प्राकृत साहित्य का इतिहास : डॉ. जगदीशचन्द्र जैन, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, १९८५ ६) जैन विचारधारा : डॉ. नलिनी जोशी, सन्मति - तीर्थ प्रकाशन, पुणे, २०१०
७) जैन तत्त्वज्ञान : डॉ. के.वा. आपटे, जैन अध्यासन, फिरोदिया प्रकाशन, पुणे विद्यापीठ, २०११
**********