________________
आवाहन करून बाहेर काढले. पार्श्वनाथांच्या चरित्रकारांनुसार विवेकशून्य क्रियाकांडाला विरोध करणाऱ्या अनेक धर्मचर्चामध्ये पार्श्वनाथ त्यांच्या गृहस्थावस्थेपासूनच तत्पर होते. केवलज्ञानाच्या प्राप्तीनंतर पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह अशा चार महाव्रतांचा उपदेश केला. त्यांचा धर्म 'चातुर्यामधर्म' होता, असे बौद्धग्रांसही नमूद केलेले दिसते. महावीरांचे मातापिता पार्श्वनाथप्रणीत संप्रदायाचे अनुयायी होते. पार्श्वनाथ अनुयायी केशक्कुिमार
आणि महावीर शिष्य गौतम यांच्यातील वैचारिक आदान-प्रदान प्राचीन जैनग्रंथात नमूद केलेले दिसते. जैन परंपरेरील पार्श्वनाथांचा प्रभाव अतुलनीय आहे. पार्श्वनाथांच्या मूर्तीची आणि स्तोत्रांची संख्या महावीरांपेक्षाही विपुल असल्यो दिसते.
(४) महावीर :आजच्या जैन समाजावर ज्यांच्या उपदेशाचा, साहित्याचा आणि साधनेचा सखोल परिणाम झालेला दिसतो, ते चोविसावे म्हणजे अंतिम तीर्थंकर भ. महावीर होत. ते 'ज्ञातृवंशा'त जन्मले असा उल्लेख जैन व बौद्ध परंपरांनी नोंदविलेला दिसतो. त्यांच्या आयुष्यातील तीन प्रमुख अवस्था विशेष लक्षणीय आहेत. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत ते गृहस्थावस्थेत वर्धमान' या नावाने ओळखले जात होते. माता-पित्यांच्या मृत्यूनंतर राजम्मेवाचा त्याग करून त्यांनी श्रमण जीवनाचा अंगीकार केला. बारा वर्षे कठोर तपस्या करून ते ‘महावीर' बनले. केवलज्ञान प्राप्तीनंतर तीस वर्षे सतत विहार आणि धर्मोपदेशाचे काम केले. त्यांच्या प्रमुख शिष्यांनी अर्थात् गणधरांनी अर्धमाधी भाषेतील त्यांच्या उपदेशाचे संकलन अकरा ग्रंथांमध्ये केले. या अकरा ग्रंथांच्या अवलोकनातून असे दिसते की स्थळ, काळ व व्यक्तींच्या पात्रता बघून त्यांनी आपल्या उपदेशाचा आशय व शैली यात विविधता आणली. त्यानंतर होऊन गेलेल्या आचार्यांनी जैनधर्माच्या प्रसाराचे कार्य साहित्यनिर्मिती व प्रवचने यांच्याद्वारा केले. अतिमतः 'ज्ञातृपुत्र वर्धमान श्रमण भगवान महावीर' अशी त्यांची ओळख प्रचलित झाली.
महावीरांचे कार्यकर्तृत्व सारांशाने पुढीलप्रमाणे सांगता येईल -
* पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि वनस्पती यांची ‘सजीवता' आणि 'एकेंद्रियत्व' महावीरांनी विशेष अधोरेखित केले. त्यांच्या रक्षणावर आणि मर्यादित वापरावर भर दिला. त्यामुळे पशुपक्षी इ. तिर्यंचच नव्हे तर एकेंद्रियांच्या रक्षणाच्या उपदेशातून अहिंसेचा सूक्ष्मतम विचार केला. पर्यावरण रक्षणाच्या आधुनिक संकल्पनेचा उगम महावीरांच्या मूळ उपदेशात स्पष्टत: अनुस्यूत असलेला दिसतो.
___ * पार्श्वनाथप्रणीत धर्मात काळानुरूप बदल करून अपरिग्रह हे चौथे व्रत ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशा दोन महाव्रतात विभक्त केले. अशाप्रकारे साधुआचारात ब्रह्मचर्याला अनन्य स्थान दिले.
__ * ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण जन्मावर आधारित नसून व्यक्तींच्या गुणांवर आधारित आहेत हे स्पष्ट नोंदवून ठेवले. सामाजिक उच्चनीचतेचा निषेध केला. ___* यज्ञीय कर्मकांडाचा हिंसा-अहिंसेच्या दृष्टीने विचार केला आणि यज्ञाचा आध्यात्मिक दृष्टीने अहिंसक आणि सकारात्मक अर्थ स्पष्ट केला. ___* जैन परंपरेत आरंभीपासूनच साधूंच्या जोडीने साध्वींना आणि श्रावकांच्या जोडीने श्राविकांना स्थान होते. महावीरांचे वैशिष्ट्य असे की आर्या 'चंदनेला' स्वत: दीक्षा देऊन त्यांनी साध्वीसंघाचे प्रवर्तिनीपद देऊ केले. जयंती, अग्निमित्रा इ. श्राविकांशी महावीरांनी केलेल्या संवादावरून स्त्रियांचे जैनसंघातील महत्त्व विशेष स्पष्ट हेते. ___ अर्धमागधी आगम साहित्यात महावीरांशी संबंधित असलेल्या अनेक शहरे, गावे, नदी-नाले, पर्वत, अरण्ये, वस्त्या यांचा उल्लेख येतो. ही भौगोलिक सामग्री महावीरांच्या विहाराचा आणि कर्तृत्वाचा प्रमाणित आलेख तयार करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. प्राचीन बौद्ध वाङ्मयात नातपुत्त निग्गंथ' अशा शब्दात महावीरांचा उल्लेख अनेकदा आढळतो. परंतु तात्त्विक विचारधारा जपणाऱ्या उपनिषदांमध्ये अथवा पुराण साहित्यात वर्धमान महावीरांचा उल्लेख अपवादात्मक रीतीने सुद्धा आढळत नाही. याउलट 'ऋषिभाषिता'सारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथात मात्र वैदिक, वेदोत्तरकालीन आणि बौद्ध ऋषींच्या विचारांचा संग्रह केलेला दिसतो.