________________ 22. जैनांच्या आगमग्रंथांतील बहात्तर कला (विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, 1986) प्राचीन भारतात अध्ययनाचे विषय म्हणून अनेक विद्या, कला, इत्यादींचा उल्लेख वाङ्मयात सापडतो. हिंदूंच्या ग्रंथात चौसष्ट कलांचा निर्देश येतो. या कलांचे परिगणन व अर्थ यांबाबत मतभेद दिसतो. तसेच कधी 64 पेक्षा अधिक कलाही सांगितल्या गेल्या आहेत. बौद्धांच्या ललितविस्तर नामक ग्रंथात बोधिसत्त्व म्हणजे बद्ध हा 90 पेक्षा अधिक कलांमध्ये पारंगत होता', असे म्हटले आहे. जैन धर्मीयांच्या ग्रंथात 72 कला असा उल्लेख येतो. या 72 कलांच्या सूची जैनांच्या आगमग्रंथात आढळतात. जैनांच्या आगमेतर ग्रंथात प्राय: अशा सूची नाहीत. तथापि उद्योतनसूरिकृत कुवलयमाला या प्राकृत भाषेतील ग्रंथात 72 कलांचे परिगणन आहे. पण त्या कला आगमग्रंथांतील कलांपेक्षा वेगळ्या आहेत. प्रस्तुत लेखात जैनांच्या आगम ग्रंथातील 72 कलांचा विचार केला आहे. कला म्हणजे काय ? कला या शब्दाचे अनेक व्युत्पत्त्यर्थ तसेच प्रचलित अर्थ दिले जातात. त्यांमध्ये एखाद्या कामातील अपेक्षित अथवा आवश्यक चातुर्य, प्रावीण्य' असा एक अर्थ आहे. जैनांच्या आगमग्रंथावरील टीकाकार' अभयदेव हा 'कला' म्हणजे 'विज्ञानानि' असा अर्थ देतो. त्याच्या मते, एखाद्या ज्ञेय विषयाचे विशेष ज्ञान म्हणजे कला होय आणि म्हणून 'कलनीयभेदाद् द्विसप्ततिः कला:' असे तो सांगतो. जैन आगमग्रंथातील 72 कला जैनांच्या आगमग्रंथांपैकी समवायांगसूत्र, ज्ञातृधर्मकथा (नायाधम्मकहाओ), औपपातिकसूत्र आणि राजप्रश्नीयसूत्र (रायपसेणइयसुत्त किंवा पएसिकहाणय) या चार ग्रंथात 72 कला दिलेल्या आहेत. या कलांमध्ये काही कला समान आहेत तर काही कला वेगळ्या आहेत. तसेच लक्षणीय गोष्ट अशी की काही ग्रंथात या कला 72 पेक्षा जास्तच आहेत. एके ठिकाणी तर 72 ही संख्या साधण्यास, अनेक कला एकाच क्रमांकाखाली दिलेल्या आहेत. हा सर्व तपशील पुढीलप्रमाणे सांगता येईल. (अ) नायाधम्मकहाओ या ग्रंथात कला बरोबर 72 आहेत. (आ) समवायांगसूत्र-येथे क्रमांक देऊन 72 कला दिलेल्या आहेत. परंतु कला क्रमांक 67 खाली एकूण 3 कला, क्रमांक 68 खाली एकूण 7 कला, क्रमांक 69 खाली एकूण 5 कला, क्रमांक 70 खाली एकंदर 2 कला, आणि क्रमांक 71 खाली एकूण 2 कला आहेत. आता, त्या त्या क्रमांकाखाली जर एकच कला ठेवली, तर एकूण चौदा कला - (3+7+5+2+2 = 19 ; 19-5 = 14) जास्त होतात. म्हणजे समवायांगसूत्रात एकूण कला 86 (72+14) होतात. समवायांगसूत्रातील कलांच्या संदर्भात पुढील गोष्ट सांगणे आवश्यक आहे. भ.महावीर 2500 महानिर्वाण महोत्सव याप्रसंगी, पंडिता सुमतिबाई शहा यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेल्या 'पूर्णार्घ्य' या ज्ञानकोशात्मक ग्रंथात, 'समवायांगसूत्रामध्ये 72 कलांची नामावली आहे.' (पृ.७८५) असे म्हणून पुढे यादी देताना मात्र प्रत्यक्षात 85 कला दिलेल्या आहेत. आणि कलांची 85 संख्या होण्याचे कारण असे की ‘पोक्खच्च' ही कला या यादीतून गळली आहे ; ती धरली की समवायांगसूत्रातील कला 86 होतात. म्हणजे 72 म्हणून आपण 85-86 कला देत आहोत, हे या कलांबद्दल लिहिणाऱ्या लेखकाच्या लक्षात आलेले दिसत नाही. (तसेच, पूर्णार्घ्य मधील या यादीत