________________
* लौकिक व तात्कालिक सुखात न अडकता, पारलौकिक व आध्यात्मिक प्रगतीत विघ्ने न येण्यासाठी या पापश्रुताचा निषेध असावा.
अर्थातच जैनांनी तत्त्वज्ञानाची विशिष्ट बैठक व शुद्ध आचाराच्या उपदेशातून वामाचाराकडे झुकण्याच्या प्रवृत्तीला यशस्वीपणे आवर घातला. बौद्धांमध्ये वामाचार व शिथिलाचार यांचे प्रमाण जसजसे वाढत गेले तसतसा दहाव्या शतकाच्या आसपास भारतातून बौद्धधर्म जवळजवळ हद्दपार झाला. हिंदूंच्या बाबतीत काही वेगळेच घडले. जैन आणि बौद्ध धर्मामध्ये जाऊ पाहणाऱ्या स्त्रियांना व शूद्रांना व्रतवैकल्याचे व भक्तीचे मार्गदर्शन करून त्यांना हिंदुधर्मात रोखून ठेवले.
सर्व धर्मांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरी अशा विद्यांचा पगडा कायम आहे. आजच्या घडीला संपूर्ण समाजाच्या परिप्रेक्ष्येत असाच दुहेरीपणा चालू आहे. प्रगतशील विज्ञानयुगात एकीकडे आपण विज्ञानाद्वारे ग्रहांवर पोहचत आहोत. वेगवेगळ्या ज्ञानशाखा उदयाला येत आहेत. निसर्गाचा तसेच मनुष्यवस्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न चालू आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम चालू आहे. पण तरीही अंधश्रद्धेच्या आहारी जाणारा फार मोठा वर्ग आजही दिसतो आहे. म्हणजेच जैनग्रंथातच अशी दुहेरी व परस्पविरोधी वचने नाहीत तर प्रत्यक्ष समाजातही तेच चालू आहे किंबहुना वाढत आहे. मनुष्यप्राण्याचा 'मानसिक कमकुवतपणा' व 'दुसऱ्याच्या आहारी जाण्याची वृत्ती' या दोन गोष्टींचा फायदा सर्व प्रसारमाध्यमे घेत आहेत. त्याला यथेच्छ खतपाणी घालून, अंधश्रद्धेचा वृक्ष अधिकाधिक फोफावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तरीही काळीजादू, व्यभिचार, हिंसा यावर आधारित ज्या विद्या आहेत त्यांच्या अतिरेकावर लगाम लागेल, असा आशावाद नक्कीच ठेवू या !!!
१६५