________________
(३१५)
आणि भित्रा सर्वांना तो समानरूपात ग्रासतो.७१
ह्या काळाच्या पंज्यातून सुटण्यासाठी पाताळामध्ये, ब्रह्मलोकात, इंद्रभवनामध्ये समद्रात, वनात, दिशेत, पर्वतांच्या शिखरावर, अग्नीत, पाण्यात हिमालयामध्ये बज्रनिर्मित स्थानामध्ये तलवारधारी, पहारेकरी जरी गढ आणि कोटमध्ये लपून राहिला तरी तो वाचू शकत नाही. असा हा काळ दुर्दात आणि दुर्निवार आहे.७२ मानवाला आपल्या सत्य स्थितीचा बोध करविण्यासाठी आचार्यांनी एकदम स्पष्ट शब्दात जे सांगितले आहे. त्याचे एक एक अक्षर प्रेरणेने परिपूर्ण आहे.
उपाध्याय विनयविजयजी लिहितात की जेव्हा मनुष्य यमराजाच्या वशीभूत होतो, मरू लागतो तेव्हा त्याचा प्रताप नष्ट होतो. उदित तेज नष्ट होते. धैर्य आणि पुरुषार्थाचा विलय होतो, परिपुष्ट शरीर शिथिल होते आणि त्याचे स्वजन त्याच्या संपत्तीला हडपण्यासाठी प्रयत्नशील होतात. मृत्यूच्या समोर मनुष्य एकदम नगण्य बनतो ही मनुष्याची घोर अशरणता आहे.७३
जसे कोळी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या माशांना पाहता पाहता पकडतात तसेच यमराज त्या राजा-महाराजांना, ज्यांच्याजवळ चतुरंगी सेनेचे अनुपम बळ आहे त्यांनाही पकडून नेतो. तर मग तुम्ही जरी दीर्घकाळापर्यंत प्राणायम करून श्वासनिरोध केला किंवा समुद्राच्या पलीकडे जाऊन बसला किंवा पर्वताच्या शिखरावर चढला तर एक दिवस हा देहरूपी पिंजरा जराजीर्ण होईल. सुंदर काळ्या केसांनी सुशोभित मस्तकाला पांढरे करणारी 'जरा-वृद्धावस्थेला थांबविण्यात कोणीच समर्थ नाही. राहूचा त्रास चंद्र एकटाच सहन करतो. आपला त्रास आपल्यालाच सहन करावा लागेल. कोणीही तो वाटून घेऊ शकणार नाही. हे आत्मन ! हे समजून दान, शील, तप, भावरूप धर्माची शरण स्वीकार. समतेने शत्रूचे ममत्व सोडून शिवसुखाचे निधानस्वरूप शांतसुधारसाचा आस्वाद घ्या. तो शाश्वत शांती देईल.७४
श्री जयसोममुनी यांनी अत्यंत स्पष्ट उदाहरण देऊन जीवाच्या अशरणतेचे दिग्दर्शन केले आहे.
सुभुम चक्रवर्ती चर्मरत्नाने निर्मित जहाजाबरोबर समुद्रात बुडून गेले. त्या जहाजाला उचलणारे सोळा हजार रक्षक देव पळून गेले. परंतु कोणीच त्यांना वाचवू शकले नाही. अतिलोभामुळे त्यांची इज्जत गेली आणि प्राणसुद्धा गेले. इतक्या विशाल परिवारामधून कोणीच शरणरूप झाले नाही.