________________
(३०१)
राहते, पुन्हा पुन्हा चेतनेमध्ये त्याची स्फुरणा होत असेल तर अहंकार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
___ व्यावहारिक जीवनामध्येही अनित्यतेच्या अनुचिंतनाचे महत्त्व आहे. ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये हे संस्कार पुष्ट होतात की सर्व पदार्थ अनित्य आहेत. मग त्या व्यक्तीच्या मनात विवाद वाढवणाऱ्या गोष्टी समाप्त होतात. तो घटनेला समजून घेतो परंतु त्यापासून अलिप्त राहतो. त्याचा उपभोग घेत नाही. अनित्य भावनेचे चिंतन करणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि न करणाऱ्या व्यक्तींमध्ये हेच अंतर आहे. चिंतनशील व्यक्ती घटनेला जाणते. परंतु उपभोग घेत नाही तर ध्यान, चिंतन, अनुभावन न करणारी व्यक्ती घटनेला जाणत नसल्याने भोग घेत राहते. घटनेला जाणणारे व्यवहाराला अमृतमय मधुर करतात आणि घटनेला भोगणारे स्वतः दुःखी होतात आणि संपूर्ण वातावरणात दुःखाचे परमाणू पसवून देतात संपूर्ण वातावरण दुःखी होऊन जाते.४४
प्रेक्षाध्यान प्रक्रियेमध्ये शरीर दर्शनाच्या अभ्यासात घडणाऱ्या अवस्था स्पष्ट होऊ लागतात. पुन्हा पुन्हा "इमं शरीरं अनिच्चं" याचा ध्वनी आणि भावना जितक्या शक्तिशाली होतील तितकेच याचे तरंग प्रबळ होतील. तरंग जर प्रबळ झाले तर त्या पूर्वगत संस्काराच्या तरंगांना समाप्त करतील. जर ही गोष्ट बरोबर ध्यानात आली तर “इमं शरीरं अनिच्चं" असे म्हणताना कोणालाही कंटाळा येण्याचे काहीच कारण नाही. बोलल्यामुळे प्रकंपने निर्माण होतात परंतु यांचा इतका उपयोग होत नाही म्हणून मनाला एकाग्र करून अनित्य भावनेशी जोडले पाहिजे. तन्मय व्हायला पाहिजे. केवल वाणीने अनित्यतेचे वर्णन करून चालणार नाही. त्याबरोबर भावनेचे प्रकंपन जोडले तर ते अधिक शक्तिशाली होतील. ते प्रकंपन पूर्वीची मोहासक्ती आणि पदार्थामधील नित्यतेची बुद्धी यांच्या प्रकंपनाला नष्ट करते.४५
अनित्य अनुप्रेक्षा हा एक 'श्रुतज्ञान' किंवा 'आत्मज्ञाना'चा प्रयोग आहे. जेव्हा श्रुतज्ञानाचा लगाम हातात असतो तेव्हा मनरूपी घोडा आपल्याला दुःख देऊ शकत नाही. जेव्हा श्रुतज्ञानाचा लगाम हातातून सुटतो तेव्हा, मनुष्य डोळे असतानासुद्धा आंधळा होतो. म्हणून मनरूपी घोड्याला सरळ रस्त्यावर चालविण्यासाठी आपल्या हातात मजबूत लगाम असावा लागतो. हा लगाम आहे अनुप्रेक्षेचा, भावनेचा, स्वतःविषयी जाणणे, स्वतःच्या विषयाचे चिंतन करणे, 'स्व' विषयी चिंतन करणे आणि खोलवर उतरून स्वतःचा अनुभव घेणे ही अनुप्रेक्षा आहे.