________________
हृदगत
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पुष्कळ शाळा आणि महाविद्यालये यामध्ये संस्कृत भाषेच्या पेपरला विकल्प म्हणून अर्धमागधी ही भाषा शिकविली जात असे. साहजिकच त्यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सोयीसाठी त्यांना उपयोगी पडावी या उद्देशाने लिहिलेली अर्धमागधीच्या व्याकरणावर लिहिलेली काही पुस्तके उपलब्ध होती. त्या सर्व पुस्तकात मला काही ना काही त्रुटी आढळल्या. तसेच त्यापैकी काही ग्रंथात ‘भाषांतरासाठी उतारे' या शीर्षकाखाली अनेक उतारे देऊन पुस्तकांची पृष्ठसंख्या वाढविण्यात आलेली होती. या त्रुटी दूर करुन आणि भाषांतरासाठीचे उतारे काढून टाकून, व्याकरण तसेच वाक्यरचना यासाठी उपयोगी पडेल असे पुस्तक आपण लिहावे, असे मला वाटले. त्याचे दृश्य फल म्हणजे प्रस्तुतचे ‘विस्तृत अर्धमागधी व्याकरण' हे पुस्तक होय.
या 'विस्तृत अर्धमागधी व्याकरणा'ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील: १) शक्य तेथे मराठीशी संबंध दाखविलेला आहे. २) जागोजागी प्राकृत वैकरणाची सूत्रे आवर्जून दिलेली आहेत. ३) सर्व ठिकाणी भरपूर उदाहरणे दिली आहेत. ४) प्रयोग बदलातील काही उदाहरणे सोडून इतर सर्व उदाहरणे इ. मूळ ग्रंथातून
(स्वत: तयार न करता) घेतलेली आहेत. ५) एका संस्कृत शब्दाची होऊ शकणारी अनेक प्राकृत रूपे व ६) एकाच प्राकृत शब्दाबद्दल येऊ शकणारे अनेक संस्कृत शब्द मुद्दाम दिले
आहेत. (हे शब्द सुमारे ६१ व ६६ आहेत.) ७) धातुसाधनिकेत वापरात आढळणारे बहुतेक धातू (सुमारे ३३३) घेतले
आहेत व त्यांच्याच जोडीला ८) नेहमी वापरात आढळणारे धात्वादेश (सुमारे ३००) हे सुद्धा घेतले आहेत. ९) अव्ययविचारात अर्धमागधीतील जवळजवळ सर्व अव्ययांचाच अंतर्भाव
केला आहे. १०) पुष्कळदा माहाराष्ट्री प्राकृतमधून आलेली रूपे अर्धमागधीत आढळतात.
त्यांची यथायोग्य माहिती व्हावी म्हणून पुरवणीच्या रूपात माहाराष्ट्रातील