Book Title: Sutrakritangadharit Gunhegari Jagat aani Kriyasthan
Author(s): Anita Bothra
Publisher: Anita Bothra
Catalog link: https://jainqq.org/explore/229268/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ सूत्रकृतांगावरील लेख गुन्हेगारी जगत् आणि क्रियास्थान व्याख्यान : डॉ. सौ. नलिनी जोशी शब्दांकन : डॉ. सौ. अनीता बोथरा दूरदर्शनवर 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया', 'लक्ष्य' इ. कार्यक्रम बघताना मन अगदी खिन्न होतं, बेचैन होतं, दु:खी होतं आणि खोल मनात एक विचार तरंगतो की, 'खरंचच ! हा अवसर्पिणी कालचक्राचा ‘दुखमा आरा' आहे'. किडनॅपिंग, रेप, खून, चाइल्ड अॅब्जूजमेंट, बाबा भोंदूगिरी, ह्युमन ट्रफिक, सायबर कॅफे-क्राइम,खंडणी इ. अनेक गुन्ह्यांच्या दर्शनानं मन हादरून जाते. विचार येतो - अरेरे ! अनेक प्रकारच्या दुःखांनी हे जग गच्च भरलं आहे. लहान बालकापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकाराने शोषित होत आहे, पीडित होत आहे आणि चिंतन सुरू होते की - आपण भ. महावीरांच्या समयीच जन्माला आलो असतो तर किती बरे झाले असते ! अशा प्रकारचे क्राइम ना पहावयास मिळाले असते, ना लोक त्या क्राइमचे बळी झाले असते. 'सत्यं, शिवं, सुंदरं' अशा जगाचा आपणही आस्वाद घेतला असता. पण वास्तविकता अशी नाही - सूत्रकृतांगातील (सूत्रकृतांग श्रुतस्कंध २, अध्ययन २) १३ क्रियास्थानांचे वर्णन वाचताना, 'वर्तमानात चालू असलेली गुन्हेगारीची झळ कमी आहे की काय ?' असे वाटू लागते. उत्तराध्ययनसूत्र (३१.१२), आवश्यकसूत्र (तेहतीस बोल), तत्त्वार्थसूत्र (६.६) इ. ग्रंथातही अशा प्रकारच्या क्रियास्थानांचे वर्णन आहे. त्या सर्वांचे मूळ सूत्रकृतांग आगमात सापडते. याचाच अर्थ असा की भ. महावीरांच्या वेळी सुद्धा सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन, चांगल्या-वाईट प्रवृत्ती होत्या. त्यांनी यथाशक्य लोकांना सदुपदेश देण्याचा प्रयत्न केला. हिंसेच्या जगात भ. महावीरांनी प्रकाशाचा झोत टाकून, समाजापासून ते वैयक्तिक मनातल्या द्वंद्वापर्यंत दर्शन करविले. आपण आपल्या कल्पनाशक्तीनेही जितक्या हिंसक विषयांना स्पर्श करू शकलो नसतो त्याहून अधिक-सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, आर्थिक, धार्मिक, वैयक्तिक अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे, त्या काळी भ. महावीरांनी आपल्या उपदेशाच्या माध्यमातून, क्रियास्थानांच्या रूपाने, प्रत्यक्ष स्वरूपच आपल्यासमोर वर्णिले. हिंसेमागील प्रेरणा, त्यासाठी केली गेलेली प्रवृत्ती व त्याचे होत असलेले परिणाम अशा तीन मुद्यांना स्पर्श करणारा उपदेश त्यांनी दिला. अभ्यासातून असे लक्षात आले की त्यावेळचे गुन्हे आणि आत्ता होत असलेले गुन्हे, यात काही मोठा फरक नाही. वैयक्तिक दृष्ट्या माणूस निराशेत जाऊन कशी आत्महत्या करतो इथपासून ते थेट समाजात राहन नाती-परिवारासाठी इतरांचीही कशी पिळवणुक करतो येथपर्यंत-अशा सर्व प्रकारच्या विचारांनी भरलेली ही क्रियास्थाने आहेत र सुद्धा जितकी विषयांची विविधता नसेल तितकी विविधता भ. महावीरांन क्रियास्थानांच्या द्वारे निदर्शनास आणून दिली आहे. स्वत:च अधिक सुखात असावे, मी सर्वांवर सत्ता चालवावी. माझ्या कामवासनेची पूर्ती व्हावी, खूप पैसे मिळवावेत ही त्या सर्व क्रियास्थानांमागची प्रेरणा आहे व त्यासाठी अवलंबिलेले खालील वेगवेगळे हिंसक मार्ग आहेत. * पारिवारिक कुशलतेसाठी, नाती-गोती-परिवार-मित्रमंडळी यांच्या भल्यासाठी, भरभराटीसाठी, देवीदेवतांसठि - अनेक प्रकारच्या जीवांची हिंसा म्हणजे 'अर्थदंड व परिणामस्वरूप पापकर्मांचा बंध. * स्वत:साठी व दुसऱ्यासाठी, कोणतेही प्रयोजन नसताना विनाकारण - म्हणजे ना ही शरीरासाठी, ना ही उपजीविका म्हणून, ना ही पुत्र-पत्नी-पशु इ. च्या पोषणासाठी, ना घराच्या संरक्षणासाठी, ना प्राण्याच्या रक्षणासाठी पण तरीही वनस्पतींचे छेदन-भेदन करणे, आग लावणे, प्राण्यांची चामडी काढणे, डोळे उखडणे, उपद्रव करणे इ. द्वारा जीवांना विना प्रयोजन शिक्षा देणे म्हणजे 'अनर्थदंड' व परिणामस्वरूप वैराचा बंध. Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ * आपण मारले जाऊ किंवा आपले संबंधी मारले जातील या भीतीने विषारी सर्प, व्याघ्र, सिंह, विंचू इ. प्राण्यांना तसेच क्रूर, हिंसक वृत्तीच्या माणसांनाही, त्यांची काहीही चूक नसताना तो हिंसक आहे', असे समजून व स्वत:ला भीती वाटते' म्हणून त्यांना दंड देणे, मारणे म्हणजे 'हिंसादंड' व परिणामस्वरूप पापकर्माचा बंध. * आपल्या उपजीविकेसाठी जर कोणी शिकार करत असेल, व तो मृगाच्या शिकारीसाठी गेला असताना, जाता-जाता वाटेत दिसणारे कबूतर, चिमणी, माकड इ. प्राण्यांना विनाकारण मारणे किंवा जर शेती करत असेल तर शेती करताना इतर वनस्पतींचे अचानक छेदन-भेदन होणे म्हणजे 'अकस्मात्दंड' व परिणामस्वरूप पापकर्मांचा बंध. या अकस्मात्दंडाचे वर्तमानस्वरूप असे आहे की एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा करताना कोणी पाहिल्यास, तो साक्ष देऊ नये म्हणून त्याला मारणे किंवा एखाद्याला मारताना त्याच्या वाटेत जे-जे येतील त्यांना उडविणे. ___* आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी-पुत्र-कन्या असे सर्वांनी मिळून एकत्र कुटुंबात राहणे व आपल्याच कुटुंबातील लोकांना शत्रू समजून मारणे. अथवा गावात, नगरात, शहरात लूट, चोरी होत असताना जो लुटारू अथवा चोर नसतो त्याला तसे समजून मारणे म्हणजेच संशयित हाच गुन्हेगार किंवा एक संपूर्ण जातच गुन्हेगारीसाठी बदनाम (जशी पारधी जमात-चोर जमात म्हणून बदनाम) हा 'दृष्टिविपर्यास दंड' व परिणामस्वरूप पापकर्मांचा बंध * स्वत:च्या सुखसुविधेसाठी व सर्व काही स्वत:ला प्राप्त व्हावे या वृत्तीने - दुसऱ्याच्या जमिनी, घरे बळकावणे, सरकारच्या पैशावर डल्ला मारणे, जनतेच्या हितासाठी जमा केलेले पैसे स्वत: लुबाडणे, परवानगीशिवाय जास्तखाणी खोदणे, मोठमोठ्या शिक्षणसंस्था उभारून मोठमोठाले डोनेशन्स घेणे, मिनरल वॉटर बनविण्यासाठी पाणी उसणे अशा अनेक प्रकारे सर्वच देशात, वेगवेगळ्या स्तरावर कृत्रिम व नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या चोऱ्या व खोटारडेपणा चलू असतो. अदत्तादान व मृषाप्रत्ययाची हे नव्याने सुरू झालेले सर्व प्रकार तेथे सहज जोडता येतील. हुकूमशाही व राजेशाही सोडून सर्वांच्या हितासाठी लोकशाही आणली तरी पापाचरणाला लगाम नाही. कर्जमाफी, शिक्षण, बचतगट इ. चांगल्या सोयीतही चोऱ्यामाऱ्या चालूच. आजच्या परिप्रेक्ष्येत चालू असलेले हे सर्व गुन्हेगारीचे प्रकार मृषाप्रत्ययिक' (झूठ) व अदत्तादानप्रत्ययिक' (चोरी) आहेत व परिणाम स्वरूप पापकर्मांचा बंध. * भ. महावीरांची दृष्टी म्हणजे प्रकाशझोत. जिकडे वळवू तिकडे प्रकाश. हा प्रकाशाचा झोत त्यांनी सामाजिकतेकडून वैयक्तिक आयुष्याकडे फिरविला. बॅटरी स्वत:वर आणली. आपल्या अंतरात्म्यात डोकावून पहिले. मनातील संक्लेश, खिन्नता, नकारात्मक विचार, चांगल्या-वाईट गोष्टी, सर्व खळबळी इ. मुळे आपले चित्त विनाकाण हीन-दीन-दुर्मनस्क होते. हे 'अध्यात्मप्रत्ययिक' (आत्म्यासंबंधी) क्रियास्थान आहे. त्याचा परिणाम क्रोध-मानमाया-लोभ वाढत जातात, वाईट-दुष्ट विचार वाढतात, निराशा येते व मजल आत्महत्येपर्यंत पोहोचते. * अभिमानाने, मदाने, अहंगंड बाळगल्याने - दुसऱ्यांना कमी लेखणे, निंदा करणे, अवहेलना करणे इ. वृत्ती बळावतात. काहीही असताना किंवा काहीही नसताना सुद्धा आपण कशाकशाचा माज करत असतो - श्रीमंतीचा, राजकारणाचा, सत्तेचा, घराणेशाहीचा, रूपाचा, शक्तीचा, त्यातून गुंडगिरीचा, उच्चनीचतेचा, हे सर्व मानप्रत्ययिक आहेत. अहंगंडाचे आजचे स्वरूप आपल्याला पुढील शब्दात व्यक्त करता येईल. थोडा-अधिक ज्ञानाचा स्वाद जरी घेतला तरी साहित्य संमेलनात, शास्त्रज्ञांच्या समाजात किंबहुना नोबल पारितोषिक मिळविण्यासाठी अनेक ‘पुल' लावले जातात व एकमेकांचे पाय ओढले जातात. क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक ठिकाणी मीच पुढे असावे. क्रीडा असो की साहित्य असो की कला असो - 'अहंसेटुं' (मी श्रेष्ठ) 'दुइयं कणि8 (दुसरा कनिष्ठ) ही वृत्ती व परिणामस्वरूप जन्म-मरण चक्रात भ्रमण व विशेषत: नरकगमन. * आपले प्रभुत्व व आपले स्वामित्व स्थापन करण्यासाठी छोट्यातल्या छोट्या अपराधासाठी मोठ्यातली मोठी Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ शिक्षा. कुटुंबात सर्वांनी माझे ऐकावे, संपूर्ण घरादारावर माझाच हुकूम असावा, प्रत्येकाने माझ्याच आज्ञेत गढे - असा धाक, अशी हिटलरशाही व तशी प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण करणे हा भ. महावीरांच्या शब्दात 'मित्रदोषप्रत्यय' होय. कौटुंबिक हिंसाचाराचे आजचे स्वरूप पुढील शब्दात व्यक्त करता येईल. नवरा कितीही दारूड्या असला व अजिबात कर्तृत्ववान नसला, बायकोच चार घरची कामे करून पोट भरत असली तरी नवऱ्याने बायकोला बडविणे व 'मीच तुझा स्वामी' ही भावना निर्माण करणे. ___ सासूने-नणंदने सुनेशी भांडण करणे, रॉकेल ओतणे, काड्या टाकणे, वांझ म्हणून एखादीचा अपमान करणे, विधवा म्हणून तिला हिणविणे, ती समोर आल्यास अपशकुन मानणे, घटस्फोट, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या हे सर्व कौटुंबिक दोष आहेत. अशा प्रकारे स्त्रियांना शिक्षा देण्यात स्त्रियांचाच पुढाकार असतो. आईवडिलांना जीव नकोसा वाटणे इथपासून ते सुनेच्या छळापर्यंत. परिणामस्वरूप पारिवारिक क्लेश, दौर्मनस्य व दुर्भावना निर्माण होतात. ___ * अध्यात्माच्या नावाखाली बुवाबाजी, गंडे-दोरे-ताईत, हिप्नॉटिझम, हातचलाखी इ. द्वारे भक्ताच्या खऱ्याखोट्या श्रद्धेचा फायदा घेऊन स्वत:ची गैरमार्गाने आजीविका करणे, पैसे कमावणे व त्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक, लूट, लबाडी, गळा कापणे, आर्थिक व लैंगिक पिळवणूक करणे, हा ‘मायाप्रत्ययिकदंड' आहे. असे वागताना त्यंना त्याचा कधीही पश्चात्ताप होत नाही. पापभीरू माणूस थोडा तरी घाबरतो पण अशी फसवेगिरी करणारी माणसे दुसयाला चुकीचे पटवून देण्यात यशस्वी होतात. कोडगे, निगरगट्ट, निर्दावलेले, हाताबाहेर गेलेले असतात. जे करतातत्यात त्यांना चूक वाटतच नाही. ना पश्चात्तापाची भावना, ना सुधार, ना शल्य. अशाही मानसशास्त्रीय भावनांचा आविष्कार येथे दाखविला आहे. परिणामस्वरूप अशी माणसे कपटाकडून अधिकाधिक कपटाकडे वळून दुर्गतिगमन करतात. * प्रबळ लोभाच्या आहारी जाऊन मंत्र-तंत्र, जारण-मारण विद्या, विविध प्रयोगांचा वापर, करणी, पुत्रप्राप्तीसाठी बळी, लिंगपूजा, जादूटोणा, भानामती, काळीजादू अशा अनेक देवीदेवतांच्या व धर्माच्या नावाखाली अघोरी साधना करणे व आपण गैरकृत्य करत आहोत असे मनातही येऊ न देणे. काहीही करून पुत्र हवा, धनाचा हंडा हवा, शत्रूचे वाटोळे व्हायलाच हवे व अशा चुकीच्या गोष्टी साध्य करण्यासाठी कितीही जीवहिंसा करावी लागली तरी चालेल, कोणत्याही रहस्यमय साधनांचा आश्रय घ्यावा लागला तरी चालेल, लैंगिक कामवासना भोगण्यासाठी कितीही निंदनीय काम करावे लागले तरी चालेल. हा लोभप्रत्ययिक आहे. अशा वृत्तींनी वारंवार आंधळे, मुके, बहिरे होण्याची संभावना. * आता भ. महावीरांनी कॅमेराचा फोकस एकदम बदलला. अरे बंधूंनो ! घाबरू नका. सर्व जग फक्त गुन्हेगारीनेच भरलेले नाही. या जगात चांगले लोक सुद्धा आहेत. आत्मकल्याण करणारेही आहेत. आत्मज्ञानाने चाले आचरण करणारे लोकही आहेत. अशी माणसे अजिबात बेफिकिरीने वागत नाहीत. दुर्लक्ष करत नाहीत. अप्रमादाने राहतात. निष्पाप क्रिया करतात. काळजीपूर्वक करतात. कशातही त्यांचा अतिरेक नसतो. खाण्यात-पिण्यातबोलण्यात-झोपण्यात-उठण्यात-बसण्यात सावधानता असते. मर्यादा असते. पापण्यांची सूक्ष्म उघडझाप सुद्धा अगदी होशपूर्वक करतात. ही 'ईर्यापथिक' क्रिया होय व परिणामस्वरूप त्यांच्या पापकर्मांचा बंध होत नाही. भ. महावीरांनी त्या काळच्या समाजाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेले हे चित्र, तिन्ही काळात लागू होईल असे आहे. यात वाढत्या गुन्हेगारीचे १२ आयाम असून प्रत्येक अपप्रवृत्तीचा फोकस हा वेगळा आहे. जणूकाही हे 'सत्यमेव जयते'चेच १३ एपिसोड आहेत. सामाजिक वातावरणात जा, राजकारणात जा, असंस्कृत समाजात जा, घरात जा, मित्रमंडळीत जा किंवा अध्यात्मात जा - निष्पाप सूक्ष्म क्रियेपासून ते जन्मजन्मांतरीच्या तीव्र बंधापर्यंत, वरपासून ते खालपर्यंत, सर्व स्तराचे चांगले-वाईट दर्शन करविले. आदर्शवाद कसा असावा हे महावीरांना माहीत आहे पण पूर्ण आदर्शवाद' जगात असणार नाही, हेही त्यांना माहीत आहे. सर्व जगत् आर्य, सुसंस्कृत असावे', अशा भोळ्याभाबड्या आदर्शवादात किंवा चुकीच्या धारणेत भ. महावीर मुळीच नाहीत. जैनांचे कोणतेही तीर्थंकर अशा भ्रमात मुळीच नाहीत की आम्ही उपदेश दिला की जगात जादच्या कांडीसारखे सर्वत्र सुखद, शांततामय वातावरण निर्माण Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ होईल, व तसे असतेच तर देव-मनुष्य या दोनच गती असत्या. नरक-तिर्यंच या दुर्गति अस्तित्वातच नसत्या. अनादिकाळापासून मोक्ष जेवढा सत्य आहे तेवढीच गुन्हेगारीचे हे 12 आयामही आधी, आता व नंतरसुद्धा सत्यच राहणार आहेत. सद्विचार जेवढे खरे तेवढेच दुर्विचारसुद्धा. ___गौतम बुद्धासारखे सर्वं दुःखं' अशा दृष्टीने जगाकडे पाहणे ठीक नाही. चार्वाकासारखे 'ऋणं कृत्वा घृतंपवित्' असेही जगाकडे पाहणे योग्य नाही, वैदिकांप्रमाणे, 'दुष्ट खूप झाले म्हणून अवतार घेऊन त्यांचे निवारण करपही शक्य नाही.' जैन परंपरेनुसार जग हे सुख-दुःखांचे संमिश्रण आहे व राहणार. चांगल्या-वाईट प्रवृत्ती आधी होत्या मंतरही राहणार. अशा जगाचे जसे आहे तसे वास्तविक स्वरूप तीर्थंकर प्रकट करतात, हे त्यांचे ‘सर्वज्ञत्व' आहे. सर्वांना उपदेश देण्याचे कामही तीर्थंकर करतात. पण तरीही काही जीव स्वत:मध्ये काहीही बदल करत नाहीत. अशा व्यक्तींना लगाम घालणेही शक्य नाही. त्यांनाच जैन परिभाषेत 'अभवी जीव' म्हटले आहे. गुन्ह्यांची एकापेक्षा एक वरचढ रूपे सूत्रकृतांगातील या अध्ययनात नोंदवली आहेत. सत्प्रवृत्तींचे मार्गदर्शनही केले आहे. कोणता मार्ग चोखाळायचा ते व्यक्तीच्या विवेकशक्तीवर सोपवले आहे. त्यांच्या त्रिकालदर्शी प्रज्ञेला प्रणाम !!!