________________
त्रिमंत्र त्रिमंत्राच्या समन्वयाचे रहस्य प्रश्नकर्ता : या त्रिमंत्रात तीन प्रकारचे मंत्र आहेत, एक जैनाचा मंत्र, एक वैष्णवांचा मंत्र, एक शैवाचा मंत्र, ह्यांच्या समन्वयाचे तात्पर्य काय? त्याचे रहस्य काय आहे ?
दादाश्री : भगवंत निष्पक्ष असतात. भगवंताचा वैष्णव, शिव किंवा जैन यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. वीतरागांना पक्षपात नसतो. भेद करणारे 'हे तुमचे आणि हे आमचे' असा भेद करतात. 'आमचे' असे जे म्हणतो, ते दुसऱ्यांना 'तुमचे' असे म्हणतो. जेथे आमचे-तुमचे असते तेथे राग-द्वेषच असतो, तो वीतरागांचा मार्ग नाही. जेथे आमचा-तुमचा असा भेद असतो तो वीतरागांचा मार्ग नव्हे. वीतरागांचा मार्ग भेदभावरहित असतो, हे आपणास समजतय का?
त्रिमंत्रापासून पूर्ण फळप्राप्ती प्रश्नकर्ता : हा त्रिमंत्र सर्वांसाठी आहे का? आणि तो जर सर्वांसाठी असेल तर तो कसा काय?
दादाश्री : हा तर सर्वांसाठीच आहे. ज्यांना पापांचा क्षय करायचा असेल त्यांच्यासाठी हा चांगला आहे आणि ज्यांना पाप धुवायचे नसतील त्यांच्यासाठी नाही.
प्रश्नकर्ता : या त्रिमंत्रामध्ये नवकार मंत्र, वासुदेव आणि शिव या तीन मंत्राना एकत्र करण्याचे काय प्रयोजन आहे ?