________________
संपादकीय मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा कोणाला नसते? पण प्राप्त करण्याचा मार्ग सापडणे कठीण आहे. मोक्ष मार्गाच्या ज्ञाताशिवाय त्या मार्गावर कोण घेऊन जाईल?
पूर्वी सुद्धा कित्येक ज्ञानीपुरुष आणि तीर्थंकर होऊन गेलेत आणि त्यांनी कितीतरी लोकांना मोक्षाचे ध्येय सिद्ध करवून दिले. वर्तमानात तरणतारण ज्ञानीपुरुष 'दादाश्री' मार्फत हा मार्ग मोकळा झाला आहे, अक्रम मार्गाच्या माध्यमाने! क्रमाक्रमाने पायऱ्या चढणे आणि अक्रम मार्गाने लिफ्टने चढणे, यात कोणता मार्ग सोपा आहे? पायऱ्या की लिफ्ट? या काळात तर सर्वांना लिफ्टच परवडेल ना!
'या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ती शक्य नाही' असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु दीर्घकाळापासून वाया महाविदेह क्षेत्र, श्री सीमंधर स्वामींच्या दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग तर चालूच आहे ना! संपूज्य दादाश्री त्याच मार्गाने मुमुहूंना मोक्षाला पोहोचविण्यात निमित्त आहेत, आणि मुमुहूंना ह्या मोक्षप्राप्तीची खात्री निश्चयाने प्रतीत होत असते. या काळात या क्षेत्रात तीर्थंकर नाहीत, पण या काळात महाविदेह क्षेत्रात वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवान विराजमान आहेत, आणि ते भरत क्षेत्रातील मोक्षार्थी जीवांना मोक्ष प्राप्त करविण्यासाठी प्रबळ निमित्त आहेत. ज्ञानीपुरुष स्वतः त्या मार्गाने प्राप्ती करुन इतरांना तो मार्ग दाखवितात. प्रत्यक्ष-प्रगट तीर्थंकरांची ओळख होणे, त्यांच्याविषयी भक्तिभाव जागृत होणे, आणि रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करुन शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास(मार्ग) आहे. असे ज्ञानींनी सांगितले आहे.
श्री सीमंधर स्वामींची आराधना जेवढी अधिक प्रमाणात होईल. तेवढेच त्यांच्याबरोबरचे अनुसंधान-सातत्य सविशेष रुपाने होईल. यामुळे त्यांच्याबरोबरचे अनुसंधान प्रगाढ होईल. शेवटी परम अवगाढपर्यंत पोहोचून त्यांच्या चरणकमळातच स्थान प्राप्तीची मोहोर लावली जाते!