Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा
श्री विद्यावाचस्पति पं. वर्धमान पा. शास्त्री विद्यालंकार
कर्नाटक प्रांतातील प्राचीन विद्वानांनी जैन संस्कृती व साहित्य यांच्या रक्षणार्थ सतत योगदान व प्रयत्न केले आहेत. आजही पुरातत्त्व, साहित्य, स्थापत्य आदि प्रांतांमध्ये जैन लोक विपुल प्रमाणामध्ये आहेत. त्यांच्या दर्शनाने समस्त जग आश्चर्यकित होते.
भगवान् बाहुबलीची विशालकाय मूर्ती, बेलूर येथील कलामय सोमनाथ मंदिर, हळेबीड येथील दर्शनीय शांतिनाथ देवालय, मूडबिद्री येथील नवरत्न निर्मित प्रतिमा आणि त्रिभुवनतिलक चूडामणी बसदि आदि आजही या प्रांताची प्रेक्षणीय स्थळेच नव्हे तर या प्रांताचे वैशिष्ट्य व्यक्त करतात. जैन साहित्याचा प्रसार आणि संरक्षण करण्याचे श्रेय बह्वशाने या प्रांताला दिले पाहिजे. कारण, षट्खंडागम सदृश सिद्धांत ग्रंथाची सुरक्षा, केवळ या प्रांतातील श्रद्धावान् बांधवांच्या कृपेने होऊ शकली. हा एक स्वतंत्र विषय आहे. या लेखाचा विषय फक्त कर्नाटक जैन साहित्याच्या परंपरेचा परामर्श घेणे हा आहे.
कर्नाटक जैन साहित्याची परंपरा __कर्नाटक साहित्य परंपरेचा संबंध फार प्राचीन कालाशी जोडता येईल. भगवान् आदिप्रभूची कन्या ब्राह्मीने कन्नड लिपीची निर्मिती केली, हे कथन प्राचीन परंपरेपासून येत आहे. परंतु आज ऐतिहासिक दृष्टीने या साहित्याची परंपरा किती प्राचीन आहे याचा विचार करावयाचा आहे. अनेक ग्रंथांच्या अवलोकनाने हे ज्ञात झाले आहे की प्राचीन आचार्ययुगात कर्नाटक ग्रंथकर्त्यांचे अस्तित्व होते आणि कर्नाटक साहित्यनिर्मितीचे सर्वप्रथम श्रेय जैन ग्रंथकर्त्यांनाच मिळालेले आहे. या विषयात आजच्या साहित्य जगामध्ये कोणताही मतभेद नाही. केवळ प्राचीनतेबद्दलच नव्हे, तर विषयप्रतिपादन, सरस शैली आदि विषयीही आज कर्नाटक जैन साहित्यालाच प्रथम स्थान द्यावे लागेल, म्हणून आज अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात जैन साहित्यग्रंथच नियुक्त आहेत आणि जैनेतर विद्वानांनी या जैन साहित्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. या दृष्टीने कर्नाटक जैन साहित्यपरंपरा फार प्राचीन आणि महत्त्वाची आहे हे निर्विवाद सिद्ध होते.
प्राचीन काळात या साहित्यसेवी कवींना राजाश्रय मिळाला होता. गंग, पल्लव, राष्ट्रकूट, होयसळ, आदि राजवंशांच्या कारकिर्दीत या कवींना विशेष प्रोत्साहन मिळाले. या कवींद्वारा या राजेलोकांना राज्यशकट निर्वेधपणे चालविण्यासाठी बळ मिळाले होते, हे विविध प्रसंगांतील घटनांनी सिद्ध झाले आहे.
३२३
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
३२४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ राष्ट्रकूट शासक नृपतुंग नवव्या शतकात होवून गेला. त्याने कविराज मार्गाची रचना केली. कविराज मार्ग हा कर्नाटक साहित्याच्या दर्शनाकरिता दर्पणाप्रमाणे आहे. या ग्रंथाच्या अध्ययनाने असे अनुमान करता येईल की नृपतुंगाच्या पूर्वीही कर्नाटक साहित्याची रचना झाली आहे. त्याच्या पूर्वी जुनी कन्नड म्हणजे जिला हळे कन्नड म्हणतात, तीतून ग्रंथांची रचना होत असे. कविराज मार्गामध्ये नृपतुंगाने काही हळे कन्नड काव्यप्रकारांचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय ग्रंथकाराने काही प्राचीन कवींचाही निर्देश केला आहे.
श्रीविजय, कविपरमेश्वर, पंडितचंद्र आदि कवींचे ग्रंथकर्त्याने स्मरण केले आहे. महाकवि पंपनेही समंतभद्र, कवि परमेष्ठी, पूज्यपाद आदींचे स्मरण केले आहे.
समंतभद्र आणि पूज्यपाद यांचा काळ फार प्राचीन आहे. या आचार्यांची जन्मभूमि आणि कर्मभूमि कर्नाटकच आहे. म्हणून अनुमान करू शकतो की या आचार्यांनीही कर्नाटक भाषेत काही रचना केल्या असतील. परंतु सध्या काही उपलब्ध नाही. पूज्यपादांच्या अनेक ग्रंथांची कर्नाटक टीका उपलब्ध आहे. समंतभद्र यांच्या ग्रंथावरील जुन्या कनडमधील टीका मिळाली आहे. म्हणून त्या काळातही कर्नाटक साहित्याची सृष्टी होती या अनुमानाला फार प्रबळ जागा आहे.
नपतुंगाने उल्लेखिलेल्या श्रीविजयनेही काही कर्नाटक ग्रंथांची रचना केली असावी. काही उत्तरेकडील ग्रंथांतही काही ठिकाणी यांचा उल्लेख मिळतो.
__ या श्रीविजयाबरोबरच कवीश्वर किंवा कवि परमेष्ठीचा उल्लेख येतो. तेही एक प्राचीनतम कवि आहेत असे निस्संशय प्रतिपादन करता येईल. या कवीची रचना महापुराणकार भगवज्जिनसेन आणि गुणभद्रांच्याही आधी अस्तित्वात असावी असे सांगता येईल. कारण भगवज्जिनसेनांनीही आपल्या आदिपुराणामध्ये यांचा आदराने उल्लेख केला आहे.
सः पूज्यः कविभिलॊके कवीनां परमेश्वरः । वागर्थसंग्रहं कृत्स्नं पुराणं यः समग्रहीत् ।।
आदिपुराण पर्व, १, श्लोक ६० याचप्रमाणे उत्तरपुराणामध्येही आचार्य गुणभद्र यांनी वरील कवि परमेश्वरांचा उल्लेख केला आहे. या उल्लेखामुळे हा निष्कर्ष काढता येईल की जिनसेन आणि गुणभद्रांच्या आधीच त्रिषष्टि शलाका पुरुषांचे चरित्र कवि परमेष्ठीकडून रचले गेले होते. आणि तो ग्रंथ कर्नाटक भाषेतील होता. कदाचित् तो ग्रंथ संक्षिप्त असेल, परंतु भगवज्जिनसेनादिकांनी त्याचा विस्तार केला असावा.
___या सर्वांचा उल्लेख करण्याचा आमचा मुख्य हेतु हा की कर्नाटक जैन साहित्याची परंपरा फार प्राचीन आहे. जिनसेन गुणभद्रांच्या युगाच्या आधी कितीतरी शतकापूर्वीपासून कर्नाटक ग्रंथांची रचना होत आली आहे. यासंबंधीचे उल्लेख उत्तर काळातील ग्रंथांत आढळतात. त्यापूर्वीचे अनेक शिलालेखही उपलब्ध
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा
३२५ होतात. इकडच्या तिकडच्या या प्राचीन ग्रंथांचे नामोल्लेख मिळतात. दुर्दैव हे की ते ग्रंथ मात्र आज उपलब्ध होत नाहीत. काळाच्या उदरात गडप झाले आहेत. यासंबंधी आम्ही फक्त दिग्दर्शनच केले आहे. विशेष विस्तार केल्यास स्वतंत्र ग्रंथच तयार होईल.
जैन कवींनी कर्नाटक भाषेत गद्यकाव्य आणि पद्यकाव्यांची रचना केली आहे. आदिकवि पंप याने चंपूकाव्यानेच आपल्या साहित्यकलेचा श्रीगणेश केला आहे. चंपूकाव्यामध्ये गद्य आणि पद्याचे मिश्रण असते, चाचकांना वाचतांना कंटाळा येत नाही. विभिन्न प्रतिपादन, विभिन्न रसास्वादन, आदि या चंपूकाव्यामध्ये अनुभवात येत असल्यामुळे साहित्यभोग्यांना विशेष आनंदच येत असतो.
पंप महाकवि महाकवीने क्रि. शक ९४१ मध्ये आदिपुराण आणि पंप-भारताची रचना केली आहे. सदर रचना चंपू काव्यामध्ये आहे. चंपू काव्याचा पंपकविच आद्यजनक होता असे सांगता येईल. पंपाच्या या चंपू काव्याला कर्नाटक साहित्यात विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
पंप मूळचा वैदिक ब्राह्मण, अर्थात् त्याचे पूर्वज वैदिक होते. परंतु त्याचे वडील अभिराम हे जैनधर्माच्या महत्तेने प्रभावित होऊन जैन बनले. म्हणून पंपाच्या जीवनावर जैनधर्माचे संस्कार बिंबले हे साहजिकच आहे.
___ सर्वप्रथम महाकवीने आदिपुराणाची रचना केली आहे. आदिपुराणाची रचना मुख्यतः भगवज्जिनसेन आचार्यविरचित आदिपुराणाची कथावस्तु समोर ठेवून कवीने केली आहे. तथापि त्याची शैली स्वतंत्र आहे. मूल संस्कृत महापुराणामध्ये आचार्यांनी केवळ कथासाहित्याची निर्मिती केली नाही, तर वेळप्रसंगी धर्मबोध, आचार व तत्त्वप्रतिपादनाचीही दृष्टि ठेवली आहे. त्याप्रमाणे पंप महाकवीने आपल्या ग्रंथात साहित्य आणि धर्मबोध, या उद्देशांना साधले आहे. आदिपुराणामध्ये भगवान् आदिप्रभूचे चरित्र मोठ्या सरस शैलीने चित्रित केले आहे. भोग आणि योगाची सुंदर तुलना करीत कवीने ग्रंथात सर्वत्र भोगविरक्तीचा उपदेश दिला आहे.
पंपाची दुसरी रचना पंपभारत आहे. याचा विषय भारत महाकाव्य आहे. तत्कालीन राजा प्रभु अरिकेसरीला अर्जुन मानून त्याची ठिकठिकाणी प्रशंसा केली आहे. अर्जुनाबरोबर आपल्या राजाची तुलना करण्याच्या तंद्रीत असता कोठे कोठे कथावस्तूमध्ये किंचित् फरकही कवीला करावा लागला आहे. तरीही काव्याची महत्ता काही कमी झालेली नाही. या काव्यामध्ये कवीचे काव्यनैपुण्य उठून दिसते. हा कवि कर्नाटकातील आद्य साहित्यकार म्हणून संबोधला जातो. जैन जैनेतर सर्व साहित्यक्षेत्रामध्ये पंपाच्या साहित्याला फार उच्चस्तरीय आदराचे स्थान आहे. म्हणूनच प्रायः नंतरच्या ग्रंथकारांनी पंपाचे स्मरण आदराने केले आहे. त्यानंतरच्या कवि नागचंद्रांनी रामायणाची रचना करून स्वतःचा अभिनव पंप म्हणून उल्लेख केला आहे. यावरूनही पंपाचे ज्येष्ठ व्यक्तित्व कळून येण्यासारखे आहे.
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
३२६
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
कवि पोन महाकवि पंपानंतर पोन्न नावाचा कवी झाला. इतिहासज्ञ विद्वानांच्या मते याचा काळ इ. स. ९५० मानला जातो. यानही पंपाप्रमाणे दोन धार्मिक आणि एक लौकिक अशा ग्रंथांची रचना केली आहे. या कवीच्या रचनेमध्ये मुख्यतः शांतिनाथ पुराणाचा उल्लेख करता येईल. यात पंचमचक्रवर्ती भगवान् शांतिनाथ तीर्थंकराचे चरित्र अत्यंत सरस शैलीने वर्णित आहे. या कवीचा दुसरा लौकिक ग्रंथ भुवनैक रामाभ्युदय आहे. तो उपलब्ध नाही. याशिवाय जिनाक्षरमाला नामक स्तोत्रग्रंथाचीही या कवीने रचना केली आहे. याचेही कर्नाटक साहित्यक्षेत्रात उच्चतर स्थान आहे. यास कवि-चक्रवर्ती, उभयभाषा--कवि-चक्रवर्ती, आदि पदव्या होत्या. नंतरच्या कवींनी याचे समादरपूर्वक स्मरण केले आहे.
कवि रन पोन्नानंतर महाकवि रन्नाचा नामोल्लेख करणे उचित आहे. तो इ. स. ९९३ मध्ये झाला. हा जैन वैश्य होता. मुधोळ येथे सामान्य कासार कुलात उत्पन्न होऊनही संस्कृत आणि कन्नड भाषेमध्ये गंभीर पांडित्य मिळविले होते. या कवीने अनेक सुंदर ग्रंथांची रचना करून कर्नाटक साहित्याची कीर्ती जगभर पसरविली होती. साहित्यजगावर महान् उपकार केले होते. याच्या काही रचना उपलब्ध आहेत. अजितपुराण हे याचे सुंदर कलापूर्ण साहित्य आहे. या ग्रंथाची महत्ता जाणून त्या वेळच्या राणी अत्तिमव्वे यांनी या ग्रंथाच्या एक हजार प्रती ताडपत्रावर लिहून घेऊन वितरण केल्या आहेत. यावरून तिचे साहित्यप्रेम आणि रन-साहित्याची उच्चता सहज कळून येईल. याचे परशुरामचरित, चक्रेश्वर पुराण आदि ग्रंथ उपलब्ध नाहीत. हाही कवी कर्नाटक साहित्यातील कविशिरोमणी आहे. पंप, रन्न आणि पोन्न हे कविरत्नत्रय म्हणून कर्नाटक साहित्यक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. यावरूनही यांची महत्ता कळून येईल.
कवि चामुंडराय याच वेळचा एक कवि चामुंडराय हा इ. स. ९६१ ते ९९४ पर्यंत गंगवाडीचे राजा मारसिंह राचमल्लचा सेनापति होता. याने चामुंडराय पुराणाची रचना केली आहे. हा चतुर्विंशती तीर्थंकरांचे वर्णन करणारा गद्य ग्रंथ आहे. कदाचित् शुद्ध गद्य ग्रंथाची निर्मिती करण्याची प्रथा या कवीनेच पाडली असावी. याप्रमाणे शिवकोटीनेही वड्डाराधने नावाच्या गद्य ग्रंथाची रचना केली आहे.
काही अन्य कविगण यानंतर जवळ जवळ अकराव्या शतकात धर्मामृताचा कर्ता कवि नयसेन, लीलावती प्रबंधाचा कर्ता नेमिचंद्र, कब्विगर काव्य निर्माता अंडय्या यांचा उल्लेख करता येईल. या कवींनी धर्मोपदेश देण्याच्या निमित्ताने विविध प्रमेये निवडून ग्रंथ निर्माण केला आहे. कथासाहित्याच्या रूपाने अहिंसादि धर्मांचे पोषण या ग्रंथामुळे होते. याच काळात इतर अनेक कवि होवून गेले. त्यांनी आपल्या जीवनातील पुण्यमय काळाला चतुर्विंशती तीर्थंकरांचे चरित्रनिर्मितीमध्ये घालविला. त्यांपैकी काही कवींचा नामोल्लेख मात्र येथे आम्ही
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा
३२७ करतो. परिचय दिल्यास लेख वाढेल. त्यातील उल्लेखनीय कवि खालील प्रमाणे आहेत. नेमिनाथ पुराणाचा कर्ता कवि कर्णपार्य (११४०), चंद्रप्रभ पुराणाचा कर्ता अग्गलदेव (१९८९), वर्धमान चरित्राचा कर्ता कवि आचण्णा (११९५), पुष्पदंत पुराणाचा निर्माता कवि गुणवर्म (१२३५), शांतीश्वर पुराणाचा रचयिता कवि कमलभव (१२३५), नेमिनाथ पुराणाचा रचयिता कवि महाबल (१२५४), धर्मनाथ पुराणाचा कर्ता मधुर कवि ( १३८५) यांचा खास उल्लेख करता येईल. या सर्वांच्या रचना महत्त्वपूर्ण आहेत.
कविचक्रवर्ती जन्न इ. स. ११७० ते १२३५ पर्यंत जन्न महाकवी होवून गेला. त्यांनी आपल्या कृतीने कर्नाटक साहित्यामध्ये मोठी भर घातली आहे. जन्न महाकवी विरचित यशोधरचरित प्रसिद्ध आहे. त्यात काव्यमाधुर्याबरोबर कवीने रचनाकौशल्य व्यक्त केले आहे.
___या ग्रंथाचे प्रमेय यशस्तिलक चंपू महाकाव्य हे आहे. राजा यशोधराच्या रहस्यमय जीवनाचे चित्रण करून जीवदयाष्टमी कथेचा सूत्रपात या काव्याने केला आहे. संस्कृत साहित्यामध्ये सोमदेबाच्या यशस्तिलकाला जे स्थान आहे तेच स्थान कर्नाटक साहित्यामध्ये जन्नाच्या यशोधरचरिताला आहे. हा कवि कविचक्रवर्ती उपाधीने विभूषित होता.
याच बेळी हस्तिमल्ल झाला. तो उभयभाषाचक्रवर्ती होता. त्याने गद्यमय आदिपुराणाची रचना केली होती. हा कवि १२९० मध्ये होवून गेला. या कवीचे काही संस्कृत ग्रंथही आहेत.
अभिनव पंप कवि नागचंद्र बाराव्या शतकात नागचंद्र नावाचा विद्वान् कवि होवून गेला. त्याने रामायणाची रचना केली आहे. त्याची ही रचना फार सुंदर आहे. त्याने स्वतःला अभिनव पंप या नावाने संबोधित केले आहे. या कवीने विजयपुरात मल्लिनाथ भगवंताच्या जिनालयाची निर्मिती करविली आणि त्याच्या स्मरणार्थ मल्लिनाथ पुराणाची रचना केली असावी.
यानंतर १४ व्या शतकात भास्कर कवीने जीवंधरचरित काव्याची रचना भामिनी षट्पदी छंदामध्ये सुंदर शैलीने केली आहे. कवि बोम्मरस यांनी सनत्कुमार चरित्र आणि जीवंधर चरित्राची रचना केली याचाही उल्लेख करणे जरूर आहे.
तसेच १६ व्या शतकाच्या प्रारंभी मंगरस कवीने सम्यक्त्व-कौमुदी, जयनूप काव्य, नेमिजिनेश संगति, श्रीपाल चरित्र, प्रभंजन चरित्र आणि सूप शास्त्र आदि ग्रंथांची रचना केली आहे. याचप्रमाणे साळ्व कवीने भारत आणि कवि दोड्डय्याने चंद्रप्रभ चरित्र याचे निर्माण याच काळात केले आहे.
महाकवि रत्नाकर वर्णी यानंतर महाकवि रत्नाकर वर्णी यांचा उल्लेख मोठ्या आदराने साहित्यजगात करावा लागेल. त्यांनी भरतेश वैभव नामक मोठ्या आध्यात्मिक सरस ग्रंथाची रचना केली आहे. यात सुमारे १०००० सांगत्य
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
३२८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ श्लोक आहेत. कवीचे वर्णनचातुर्य, पदलालित्य, भोगयोगाचे प्रभावक वर्णन आदि उल्लेखनीय आहे. या ग्रंथाला कवीने भोगविजय, दिग्विजय, योगविजय, मोक्षविजय आणि अर्ककीर्तिविजयच्या नावाने विभक्त करून पंचकल्याणाचे रूप दिले आहे. याचा काळ इ. स. १५५७ चा आहे. या महाकाव्यात आदिप्रभूचा पुत्र भरतेश्वरास आपला कथानायक निवडून त्याच्या दिनचर्येचे वृत्त अत्यंत आकर्षक शैलीने वर्णिले आहे. हे महाकाव्य म्हणजे आध्यात्मिक सरस कथा आहे. या ग्रंथाचा समग्र हिंदी अनुवाद या लेखाच्या लेखकाने केला आहे आणि अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या सरस काव्याचा मराठी, गुजराती अनुवादही झाला आहे. इंग्रजी अनुवादही होत आहे. भारत सरकारने या ग्रंथास भारतीय गौरव ग्रंथाच्या रूपाने स्वीकृत केला आहे. यावरून या ग्रंथाची महत्ता सहज कळून येईल.
या महाकवीने या बृहद्ग्रंथाशिवाय रत्नाकर शतक, अपराजित शतक आणि त्रिलोक शतक नामक शतकत्रय ग्रंथांची रचना करून आध्यात्मिक जगावर मोठा उपकार केला आहे. त्याचप्रमाणे सुमारे २००० चे ही वर आध्यात्मिक पदांची रचना या कवीने केली आहे.
सांगत्य युगातील अन्य कवि यानंतर सांगत्य छंदामध्ये अनेक कवींनी ग्रंथरचना केली आहे. बाहुबली कवीने (१५६०) नागकुमार चरिते, पायण्ण व्रतीने (१६०६) सम्यक्त्व कौमुदी, पंचवात (१६१४) भुजबलि चरिते, चंद्रभ कवीने (१६४६) कारकल गोम्मटेश चरिते, धरणी पंडितने (१६५०) विजणराय चरिते, नेमि पंडिताने (१६५०) सुविचार चरित्र, चिदानंद कवीने (१६८०) मुनिवंशाभ्युदय काव्य, पद्मनाभ पंडिताने (१६८०) जिनदत्तराय चरिते, पायण कवीने (१७५०) रामचंद्र चरिते, अनंत कवीने (१७८०) श्रवण बेळगुळ गोम्मटेश चरिते, धरणी पंडिताने वरांगचरित्र, जिनभारत, चंद्रसागर वर्णीने (१८१०) रामायण या ग्रंथाची रचना केली आहे. याच सुमारास चारू पंडिताने भव्यजन चिंतामणि आणि देवचंद्र कवीने राजाबली कथाकोष नामक ऐतिहासिक ग्रंथांची रचना केली आहे.
पंप महाकवीच्या युगाला चंपूयुग म्हणता येईल तर रत्नाकर वर्णीच्या युगाला सांगत्य युग म्हणता येईल. हे दोघेही महाकवी निस्संदेह युगपुरुष आहेत.
विभिन्न विषयांतील कर्नाटक साहित्य नृपतुंगविरचित कविराजमार्ग हा लक्षण ग्रंथ आहे. यात कवींना राजमार्गच दाखविला आहे. त्याचप्रमाणे नागवर्माचे छंदोदधि नामक ग्रंथात छंदविषयक आणि दुसरे नागवर्माच्या भाषाभूषणामध्ये व्याकरणविषयक प्रतिपादन आहे. काव्यावलोकन (काव्यालंकार ), वस्तुकोष (कोष), भट्टाकलंकाचे शब्दानुशासन (व्याकरण), केशीराजचे शब्दमणिदर्पण, साळ्व विरचित रसरत्नाकर, देवोत्तम रचित नानार्थ रत्नाकर (कोष), शृंगार कवीचे कर्नाटक संजीवन, (कोष) आदि ग्रंथ आपआपल्या विषयाचे समीचीन ज्ञान देणारे आहेत. यावरून कर्नाटक साहित्यकारांच्या विविध विभागाच्या सेवा व्यक्त होतात.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________ कर्नाटक जैन साहित्याची प्राचीन परंपरा 329 ___ याचप्रमाणे वैद्यक, ज्योतिष आणि सामुद्रिकादि विषयांवरही कर्नाटकातील कवींनी ग्रंथरचना केली आहे. यांतील अनेक ग्रंथ उपलब्ध नाहीत. काही उपलब्ध आहेत. कल्याणकारक वैद्यक (सोमनाथ ), हस्त्यायुर्वेद (शिवमारदेव ), बालग्रहचिकित्सा ( देवेंद्रमुनि ), मदनतिलक (चंद्रराज ), स्मरतंत्र (जन्न ) आदि ग्रंथही उल्लेखनीय आहेत. याशिवाय ध्यानसारसमुच्चय आदि योगविषयक ग्रंथांची रचनाही झाली आहे. याचप्रमाणे ज्योतिषासंबंधी ग्रंथांमध्ये श्रीधराचार्य विरचित जातकतिलक (1049), चाउण्डरायाचे लोकोपकारक (सामुद्रिक), जगबंधुनंदनचे सूप शास्त्र, राजादित्याचे गणितशास्त्र, अर्हद्दास कवीचे शकुनशास्त्र आदि ग्रंथांचाही उल्लेख येथे नमूद करणे जरूर आहे. अनेक ग्रंथकारांची नावे येथे स्थलाभावी आम्ही व्यक्त करू शकलो नाही. एवढयावरूनच या भाषेतील ग्रंथसंपत्तीची कल्पना येईल. उपसंहार यावरून स्पष्ट होते की कर्नाटक प्रांतीय प्राचीन जैन कवींनी फार प्राचीन काळापासूनच साहित्यपरंपरेची जोपासना केली आहे आणि साहित्याच्या माध्यमाने जगाच्या विविध अंगांची सेवा केली आहे. पुष्कळसे साहित्य नष्टभ्रष्ट झाले, विकृत झाले. उरलेले साहित्यही अल्पप्रमाणात नाही. कोणत्याही समाजास अभिमान वाटावा, आणि साहित्यिक समाजाने आदराने स्मरण करावे या प्रमाणात आज कर्नाटक जैन साहित्य उपलब्ध आहे. ही परंपरा कर्नाटक जैन कवींनी निर्माण केली आहे. खरोखर जैन समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट मानली जाईल. परंतु या पावन परंपरेचे रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. ती पार पाडण्यास आपण समर्थ ठरलो तर भूषणावह आहे. नाही तर फक्त पूर्वजांचे नाव घेऊन जगणाऱ्या पुरुषार्थहीन संततीचेच स्थान आमचे आहे. आम्ही त्या परंपरेकरिता काय करीत आहोत ? प्रकाशनाची आवश्यकता या भाषेतील उत्तम साहित्याचा अनुवाद होऊन इतर भाषेमध्ये प्रकाशित होणे जरूर आहे. त्यामुळे वाचक वर्गास विशेष लाभ होईल, इकडे समाजामधील श्रीमंत वर्गाचे लक्ष्य जाणे जरूर आहे. इत्यलम् !