Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव
प्रा. सौ. पद्मा किल्लेदार, नागपूर
[संस्कृतमध्ये एक सुभाषित प्रसिद्ध आहे. चिता-चिन्ता-समा नास्ति बिंदुमात्र विशेषता। सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता॥ अशा सजीवाला जाळणाऱ्या चिन्तेला कसे जाळायचे हाच ध्यानाचा प्रमुख उद्देश्य आहे. संसारी माणस उठतो ती चिंता घेऊनच. मग ती लाकडाची की मिठाची असो, की तेलाची. तो झोपतोही चिन्ता घेऊनच, त्याचा भूत भविष्य वर्तमान चिन्ताग्रस्त असतो. अशा ह्या जन्मापासून मरेपर्यंत ग्रस्त करणाऱ्या चिन्तेला कायमचे ग्रस्त करते ते ध्यान होय. ह्याच ध्यानाचा जैनागमात फार काळजीपूर्वक विचार केलेला आहे. कुन्दकुन्दामध्ये नामोल्लेख असणारे ध्यान उमास्वामीच्या तत्त्वार्थसूत्रात सूत्रबद्ध झाले. पूज्यपादांनी सर्वार्थसिद्धीत त्याला स्पष्ट अर्थ प्राप्त करून दिला. भट्टाकलंकाने राजवार्तिकात त्यावर साधकबाधक चर्चा केली. शुभचंद्रांनी ज्ञानार्णवात त्याचा सर्व बाजंनी व सर्व अंगोपागांचा विचार करून अतिशय सखोल विवरण प्रस्तुत केले. अशा दुःखदायक व सुखहारक ग्रंथाचा हा अल्प परिचय मुमुक्षु लोकांसाठी करून देण्याचा हा स्वल्प प्रयत्न आहे. ]
आचार्य शुभचंद्र हे आपणा सर्व धर्मबांधवांना त्यांच्या महान् कृतीमुळे व त्यांच्या ग्रंथाच्या अध्ययन परंपरेमुळे सुपरिचित आहेत. निरिच्छ वृत्तीने व साध प्रवत्तीने प्रसिद्धिपराङ्मुख अशी आपल्या मुमुक्ष आचार्यांची परंपराच आहे. त्यात शुभचंद्राचार्यांनी त्यांच्या कृतीत कोठेही नामोल्लेख देखील केला नाही तर जीवनविषयक माहिती दरच राहो. पण त्यांच्या ग्रंथात त्यांनी ज्या महान आचार्यांचा उल्लेख केला आहे त्यांत योगशुद्धि करणारे पूज्यपाद, कवीन्द्रसूर्य समन्तभद्र व स्याद्वाद विद्याधारी भट्टाकलंकदेव आचार्य जिनसेन ह्यांचे प्रामुख्याने स्मरण केले आहे. ह्या चारही आचार्यांत आचार्य जिनसेन हे इ. स. ८९८ च्या काही वर्ष आधीचे. व शुभचंद्र निश्चित त्यांच्या नंतरचे आहेत. त्यामुळे इ. स. ९ व्या शतकापूर्वी त्यांचा काळ मानू शकत नाही. पण त्यानंतरवा मर्यादाकाळ ऐतिहासिक पुराव्या अभावी सिद्ध करता येत नाही.
प्रत्यक्ष ग्रंथकारांनी प्रथम सर्गाच्या अकराव्या श्लोकात व ग्रंथ समाप्तीच्या शेवटच्या दोन श्लोकांत ह्या ग्रंथाचा नामोल्लेख केलेला आहे.
प्रथम सर्ग :अविद्या प्रसरोद्भूतग्रहनिग्रहकोविदम् । ज्ञानार्णवमिमं वक्ष्ये सतामानन्दमन्दिरम् ॥
२०४
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
२०५
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव
२०५ पं. स. १) ज्ञानार्णवस्य माहात्म्यं चित्ते को वेत्ति तत्त्वतः ।
यज्ज्ञानात्तीर्यते भव्यैर्दुस्तरोऽपि भवार्णवः ॥ इति जिनपतिसूत्रात्सारमुद्धत्य किंचित् । स्वमतिविभवयोग्यं ध्यानशास्त्रं प्रणीतम् ॥ विबुधमुनिमनीषाम्बोधिचन्द्रायमाणं ।
चरतु भुवि विभूत्यै यावदद्रीन्द्रचन्द्रः ॥ ग्रंथकारांनी स्वतःच ज्ञानार्णव व ध्यानशास्त्र ह्या दोन नावांनी ग्रंथाचा उल्लेख केलाच आहे. याशिवाय योगीजनांना आचरणीय व ज्ञेय सिद्धांताचे रहस्य ह्यात असल्यामुळे योगार्णव ह्या नावाने देखील लोकात प्रसिद्ध आहे. मन, वचन, काय ह्यांना शुद्ध करण्याची प्रक्रिया ह्यात सांगितली असल्यामुळे अथवा युज्ज म्हणजे जोडणे. मोक्षासाठी जो जोडतो तो योग व अशा मनवचनकायेचा परिशुद्ध धर्मव्यापार म्हणजे योग व त्याचे विस्तृत विवेचन ह्यात असल्यामुळे योगार्णव हे नाव प्रचलित झाले असावे.
ह्या नावावरून ज्ञानसाधना, योगसाधना वा ध्यानसाधना हा ह्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. प्रथम सर्गाच्या ९ व्या श्लोकात :
तत् श्रुतं तच्च विज्ञानं तद्व्यानं तत्परं तपः ।
अयमात्मा यदासाध्यस्वस्वरूपे लयं व्रजेत् ।। प्रथम नान्दीरूपात ध्यानव्याख्या केलेली आहे. व ज्ञानसाधनेद्वारा ध्यानसाधना साध्य करायला प्रेरणा दिली आहे.
संक्षिप्तरुचि शिष्याकरता प्रथम बारा अनुप्रेक्षेच्या रूपात पूर्व तयारी करून संक्षेपात ध्याता ध्यानव्याख्या व भेद सांगितले आहेत, १२ अनुप्रेक्षेचे वर्णन करताना वाचक क्षणभर भान विसरून आपला मूर्खपणा समजू शकतो. ह्या वर्णनात आपदास्पद संबंधी, रोगाक्रांत शरीर, विनाशान्त ऐश्वर्य, मरणान्त जीवितामुळे क्षणिकत्वाची प्रतीति आहे. आपत्ति व मृत्यूपासून वाचविण्यासाठी कोणी शरण नसल्याची जाणीव आहे. संसाराचे विडंबन व पंचपरिवर्तनामुळे भय आहे. भिन्नत्वाचे प्रतिपादन आहे. एकत्वाचे सूचन आहे. अनर्थ अपवित्र मंदिर असणाऱ्या शरीराचे चित्रण आहे. आगमाप्रमाणे आस्रव, संवर, निर्जरा भेदासह स्पष्ट केले आहे. विविध प्रकारचा धर्म त्रिलोक वर्णन व दुर्लभ असणाऱ्या धर्माचा उल्लेख आहे. कामभोगशरीरेच्छेचा त्याग, संवेगी-निवेगी अप्रमादी व इन्द्रियविषयपराङ्मुख अशी प्रथम भूमिका तयार झाल्यावर, अशुभ, शुभ व शुद्ध असे त्रिविध आशय, लेश्येचे अवलंबन व ध्येयविषय ह्यामुळे ध्यान देखील अप्रशस्त, प्रशस्त व शुद्ध असे तीन प्रकारचे सांगितले आहे. जिताक्ष, स्ववश, संवृत्त, धीर, मुमुक्षु मुनी ध्याते आहेत. गृहस्थावस्थेत मनाचे दोष, कामवासना, आतरौद्र परिणाम व प्रमाद ह्यामुळे ध्यानसिद्धि होत नाही असे स्पष्ट प्रतिपादन आहे. ध्यान अपात्रांच्या यादीत तत्कालीन अन्य मत नित्यवादी, सांख्य, नैय्यायिक, वेदांती मीमांसक, अनित्यवादी बौद्ध, क्रियावादी १८०, अक्रियावादी ८४, ज्ञानवादी ६७, विनयवादी ३२, अशा ३६७ मतांचा उल्लेख करून दोषदिग्दर्शन करून मिथ्यादृष्टीत त्यांचा समावेश केला आहे.
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
२०६
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ ध्यानपात्र मुनींचे वर्णन आहे. ज्ञानपिपासु, मैत्री, प्रमोद, कारुण्य व माध्यस्थ ह्या चतुर्भावनेने मनशुद्धी करणारा निस्पृह कषाय व इंद्रियविजयी ध्यान सिद्ध करू शकतात. रत्नत्रय शुद्धिपूर्वक ध्यान मानले असल्यामुळे तत्त्वरुची म्हणजे सम्यक्त्व, तत्त्वप्रख्यापक ज्ञान व पापक्रिया निवृत्ती चारित्र होय. त्यांच्या भेद प्रभेदांचे व गुणदोष विचारपूर्वक विवरण आहे. सम्यक्चारित्राचे वर्णन करताना पाच महाव्रताचे वर्णन आहे. अहिंसाणुव्रताचे तर फारच सूक्ष्म व विस्तृत विवेचन केले आहे. सत्यानुव्रतात, हित, मित, प्रिय, सदय धर्मरक्षक वचन हवे, पण, कठोर, बकवाद सदोष मर्मभेदक नको. ब्रम्हचर्य महाव्रताचे फार गहन व विस्तृत वर्णन आहे. मैथुन प्रकार, काम स्त्री दोष व गुणवर्णन, स्त्रीसंसर्ग व वृद्धसेवावर्णन आहे. परिग्रह त्यागात अन्तरंग बहिरंग परिग्रहाचा उल्लेख, २५ भावना, पाच समिति, तीन गुप्ति ह्यांचे संक्षिप्त वर्णन आहे. क्रोधादिक कषाय चारित्र व ध्यानघातक असल्यामुळे त्याचेही वर्णन आहे. ह्याप्रमाणे ध्यानाची पार्श्वभूमी तयार होण्याकरता आवश्यक त्या सर्व कर्मांची सिद्धि झाल्यावर आत्मतत्व जाणण्याची पात्रता येते. म्हणून त्या काळात प्रसिद्ध शिव, काम व गरुड ह्या ध्येयतत्त्वाचे नव्या अर्थाने आत्म्यातच अंतर्भाव करून वर्णन फारच सुंदर केले आहे. जनमनाला न दुखवित प्रच्छन्नपणे आघात करून नवीन मार्गदर्शन करून त्याच नावाखाली ध्येय तत्त्व बदलविले आहे. ध्यानसाधनेसाठी मनोरोध सांगून, मनोव्यापाराचे चित्रण करून अन्य मतांनी मानलेल्या आठ ध्यानांगाचा उल्लेख केला व निजरूपात स्थिरता हेच ध्यान सांगून मनाला वीतराग, वीतद्वेष व वीतमोह करण्याची प्रेरणा देऊन रागी व वीतरागीमुळे अनुक्रमे बंध मोक्ष पद्धति आहे हे सांगून साम्यभाव आचरायला सांगितला आहे.
साम्यभावपरं ध्यानं प्रणीतं विश्वदर्शिभिः ।
तस्यैव व्यक्तये नूनं मन्येयं शास्त्रविस्तरः ॥ साम्य भावामुळे अशुभांचा जसा हेयपणा तसाच शुभहि हेय ही बुद्धि निर्माण होऊन शुभातच धर्म समजणाऱ्या विचारातून व्यक्ति वर येते व त्यामुळे ध्यानसन्मुख अवस्था म्हणजेच साम्यभाव असे समजायला काही हरकत नाही. व हा साम्यभाव निश्चल व्हावा हाच ध्यानाचा हेतु आहे. ध्यान व समभाव दोन्हीही एकमेकांना आधार आहेत.
वास्तविक ज्ञान वा ध्यान प्रशस्तच आहेत. पण आमचे अज्ञान ज्ञानाला मोहाकरता व ध्यानाला नरकाकरता योजते म्हणून अप्रशस्त ध्यान हेय आहे असे सांगून मोक्षाकरिता प्रयोजनभूत असणारी ध्यानव्याख्या केली आहे. शिष्यांना उपदेश करताना प्रथम उत्कृष्ट तत्त्वाचाच उपदेश करायचा, पण शिष्याच्या बलहीनतेमुळे त्यातून मार्ग काढण्याकरता क्रमाक्रमाने खालून उत्कृष्ट तत्त्व सांगायचे ही जैनचार्यांची पद्धती शुभचंद्रांनीही स्वीकारली होती. उत्कृष्ट संहनन असणाऱ्या व्यक्तीचे एकाच अग्रावर मनाला जे निरूद्ध करणे ते ध्यान. त्याचा जास्तीत जास्त काल अन्तर्मुहूर्त आहे. एकाच ध्येयावर स्थिर असणारे ते ध्यान व अनेक अर्थाचा विचार म्हणजे अनुप्रेक्षा. ह्या ध्यानव्याख्येत सर्व प्रकारच्या ध्यानाचा व ध्यानस्वामींचा अंतर्भाव होऊ शकत नाही. फक्त बुद्धिपूर्वक ध्यानाचा व संज्ञी जिवांचा विचार ह्यात येतो पण अबुद्धिपूर्वक. (मनव्यतिरिक्त) प्रत्येक इन्द्रियांनी होणारे अप्रशस्त ध्यान एकेन्द्रियापासून असंज्ञी पंचेन्द्रियापर्यंत असणारे ध्यानस्वामी ह्यात समाविष्ट होऊ शकत
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव
२०७ नाही. पण ह्यात तपाच्या अनुषंगाने, मनुष्यगतीतूनच मोक्ष आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे मुनिअवस्थेपासून तो मोक्षसाधक ध्यानाचाच विचार आहे. त्यामुळे प्रसंगोचित अशी ही विशेष उत्कृष्ट ध्यानव्याख्या आहे. सर्व प्रकारच्या ध्यानांचा अंतर्भाव होणारी सामान्य व्याख्या नाही असे वाटते, पण उत्तम संहनन नसणाऱ्यालाही कमी कालमर्यादा असणारे ध्यान होऊ शकते. क्षायोपशमिक ज्ञानभावाच्या उपयोगाची एकाच अग्रावर असणारी स्थिरता म्हणजे ध्यान हा अर्थ ह्याच व्याख्येवरून निघतो. म्हणून मानली तर विशेष व मानली तर सामान्य ह्या दोन्ही व्याख्या ह्यात अंतर्भूत आहेत. प्रथम ध्यानाचे प्रशस्त अप्रशस्त भेद करून, अप्रशस्त ध्यान म्हणजे आर्त व रौद्र व प्रशस्त म्हणजे धर्म्य व शुक्ल ध्यान सांगितले आहे.
(१) आर्त म्हणजे पीडा, दुःख त्यात जे उत्पन्न होते ते आर्त. अनिष्ट संयोग, इष्टवियोग, रोगादिकांच्या पीडेमुळे व चौथे भोगांत निदानामुळे होते. हे आर्तध्यान एक ते सहा गुणस्थानापर्यंत असते एक ते पाच पर्यंत पहिले चार व सहाव्यात निदानरहित तीन आत ध्यान असतात. कृष्ण, नील, कापोत ह्या अशुभ लेश्येच्या सामर्थ्याने होतात. निसर्गतः स्वयमेव उत्पन्न होते. काळ अंतर्मुहूर्त, त्यानंतर निश्चित ज्ञेयांतर असते. प्रमादि, भित्रे, उद्धांत, आळशी, कलहप्रिय असे आर्तध्यानी असतात. तिथंचगती हे फळ होय. रुद्र, क्रूर आशयापासून उत्पन्न होणारे रौद्रध्यान हिंसानंद, चौर्यानंद, मृषानंद व संरक्षणानंद हे चार प्रकार आहेत. प्रामुख्याने कृष्णलेश्या असते व नरकगती हे फल होय. सामान्यपणे कृष्ण, नील, कापोत ह्या तीन लेश्या असतात व तिर्यंचगती हेही फल असते. पाच गुणस्थानापर्यंत स्वामी असतात. पाचव्या गुणस्थानात अशुभ लेश्या व नरकायुचा बंध नाही. पण हे वर्णन मिथ्यादृष्टीच्या प्राधान्याने केलेले आहे. सम्यग्दृष्टीच्या अपेक्षेने एवढे रुद्र परिणाम नरकफलाला देणारे नाहीत. क्रूरता, कठोरता, फसवणूक हे रौद्रध्यानीचे बाह्य चिन्ह आहेत. काल अंतर्मुहूर्त आहे. स्वयमेव उत्पन्न होणारे आहेत. ही दोन्हीही ध्याने पूर्वकर्मामुळे मुनींना देखील होतात. तेव्हा हे दोन्हीही अप्रशस्त ध्यान हेय आहेत.
____ आर्तध्यानाचा विषय दुःखपीडा तर रौद्र ध्यानाचा पाच पापात हर्षरूप रुद्र विषय. दोन्ही ध्यान क्षायोपशमिक भाव आहेत. दोन्हींचा काल जास्तीत जास्त अन्तर्मुहूर्त आहे. आर्तध्यान स्वामीचे एक ते सहा गुणस्थानापर्यंत तर रौद्र स्वामी एक ते पाच पर्यंत. आर्तध्यानात कृष्ण, नील, कापोत ह्या ३ लेश्येचे अवलंबन तर रौद्र ध्यानात प्रामुख्याने फक्त कृष्ण लेश्येचे अवलंबन. आर्ताचे फल तिर्यंचगति तर रौद्राचे फल नरकगति आहेत. दोन्ही स्वयमेव अनादि संस्काराने उत्पन्न होतात. त्यानंतर धर्मध्यानाचे वर्णन आहे. धर्मध्यानापूर्वीची भूमिका तयार झाल्यावरच ते होऊ शकते. प्रशम भावांचे अवलम्बन, इन्द्रिय व मन स्ववश, कामभोगामध्ये निरिच्छ व विरक्त झाल्यावर धर्मध्यानाचा विचार. ह्या धर्मध्यानाचा ध्याता ज्ञानवैराग्यसंपन्न संवृत, स्थिराशयी, मुमुक्षु, उद्यमी, शांत व धैर्यवान असावा.
प्रथम धर्मध्यानाच्या पोषक चार भावना सांगितल्या आहेत. मित्राविषयी अनुरागाने सुरवात मैत्रीपोषक रस, चुका झाल्यावर दुरुस्ती, स्खलन झाल्यास तडजोड अशी हितैषी भावना असते. त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी समभावनेने अनुरागपूर्वक हितैषी भावना म्हणजे मैत्री. सहानुभूतीने वा दयेने, दुःखाने पीडित जिवांचे दुःख दूर करणारी बुद्धि करुणा, गुणीजनात प्रमोद व विपरीताचरण करणाऱ्यांच्या
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
२०८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ विषयी माध्यस्थ भाव ठेवावा. ह्यामुळे कषाय आटोक्यात राहतात. ह्या भावना व मोक्षमार्गाचा प्रकाश दाखविण्याकरिता दीपिकेप्रमाणे आहेत.
त्यानंतर ध्यान करण्यायोग्य व अयोग्य स्थानाचा निर्देश आहे. म्लेंच्छ पापी दुष्ट राज्याच्या अधिकारातील स्थान, पाखंडी ऋषी, रुद्रादिक देवतास्थान, गर्विष्ठ सावकाराचे क्षेत्र, व्यसनी अड्डयाचे स्थान, शिकारी हिंसक, समरांगण हे ध्यानाकरिता अस्थान आहेत. एकंदर क्षोभज, मोहज, विकारज स्थान नको.
सिद्ध क्षेत्र, महा क्षेत्र, कल्याणक स्थान, समुद्रकिनारा, वन, पर्वत, संगमस्थान, द्वीप, वन, गुंफा, जुने वन वा स्मशान, कृत्रिम वा अकृत्रिम चैत्यालय, शून्य घर, गांव, उपचन, संक्षेपाने ध्यान अविक्षेपक स्थाने असावीत.
___ पर्यंक, अर्धपर्यंक, वज्रासन, वीरासन, सुखासन, कमलासन, कायोत्सर्ग ही ध्यान योग्य आसने आहेत. ध्यानसिद्धीकरता, स्थिरतेकरता स्थान व आसन वर्णन आहे.
उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ध्यान करावे. पण रत्नत्रयसहित मुनींसाठी हा नियम नाही. ह्या धर्मध्यानाचे स्वामी मुख्य व उपचार ह्या भेदाने प्रमत्तगुणस्थानी व अप्रमत्तगुणस्थानी आहेत. त्यात अप्रमत्तगुणस्थानी पूर्वधारी सातिशय अप्रमत्त होऊन श्रेणीला आरंभ करतो. म्हणून धर्मध्यानी होय. विकलश्रुत देखील धर्मध्यानाचे स्वामी आहेत. चवथ्या गुणस्थानापासून सातव्या गुणस्थानापर्यंत धर्मध्यानाचे स्वामी आहेत. जघन्य मध्यम उत्कृष्ट भेदाने ध्यान तीन प्रकारचे आहेत.
त्यानंतर ध्यानमुद्रेचे वर्णन आहे. आसन विजयी, विकसित कमलसदृश दोन हात, निर्विकार चेहरा, शरीर सरळ व ताठ, निश्चल व अविभ्रमी मुद्रा असावी.
बाकीच्या सांख्यादिकांनी आसनप्राणायामादि आठ ध्यानांग मानलेत. पण त्यांच्या मानण्यात लौकिक व शारीरिक निर्दोषता हे प्रयोजन आहे. त्यापाठीमागे तत्त्वज्ञानाची बैठक असायला पाहिजे. ती नाही.
आचार्य शुभचंद्राच्या आधी ध्यानाचा प्रसंगोपात्त उल्लेख आहे. पण एवढा सविस्तर दिगंबरमान्य ध्यानग्रंथ आज उपलब्ध ग्रंथसंग्रहात नाही. त्यांच्या आधीच्या कोणत्याही आगमग्रंथात वा पूज्यपादांच्या ग्रंथात ह्या ध्यानांगाचा विचार आढळत नाही. पण ह्या ज्ञानार्णवात तत्वज्ञानाच्या बैठकीच्या सुंदर कोंदणात ही ध्यानपरिकर बसविली असल्यामुळे ध्यानसाधना सुंदर नि तेजस्वी झाली आहे. त्या काळात जनमनावर हा बाकीच्या मान्यतेचा इतका प्रभाव असावा की तो न डावलता, सम्यक्त्वात व शुद्धीत बाधा न आणता त्यांचा प्रयोजनभूत तेवढा स्वीकार त्यांनी केला आहे.
साधारण ध्यानीकरता, मनाच्या अविक्षिप्त वा स्थिर अवस्थेकरिता ही ध्यानांग प्रयोजनभूत आहे. पण आत्मध्यानींना कसलाही आसनस्थानादिकांचा निर्बंध नाही. व ह्याच नव्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या अंगाचा विचार केला. त्याचप्रमाणे प्राणायामाचा देखील आगम व स्याद्वादाने निर्णय करून सिद्धी. मनाच्या एकाग्रतेपूर्वक आत्मस्वरूपात स्थैर्य ह्या दोन प्रयोजनाकरता प्राणायाम उपयुक्त होय. ह्यामुळे दृष्ट वा लौकिक प्रयोजन गौण करून सम्यक्त्वपूर्वक मुक्तीसाठी प्रयोजनभूत सांगितले आहे.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव पवनस्तंभन हे प्राणायामाचे लक्षण व ते स्तंभन, पूरण, कुंभक व रेचक असे ३ प्रकारचे आहे. ह्यामुळे वायुस्तंभनाबरोबर मन निष्प्रमादी व आत्म्यावर अवरुद्ध होते. व कक्षाय क्षीण होतात. त्या अनुषंगाने पवनमंडल चतुष्टयांचे वर्णन केले. पृथ्वी, आप, पवन व वन्हीमंडल आहेत व त्यांचे कार्यविशेषाने शुभाशुभ भेद सांगितले आहेत. त्यामुळे अनेक लौकिक सिद्धी सांगितल्या पण मन स्ववश होते. त्यामुळे विषयवासना नष्ट होते. निजस्वरूपांत लयप्रवत्ती व परंपरेने मोक्ष हे पारमार्थिक फल आहे.
प्रत्याहार-आपल्या इंद्रियाला व मनाला त्यांच्या त्यांच्या इंद्रियापासून परावृत्त करून स्वेच्छेनुसार ते लावतो हा प्रत्याहार. प्राणायामात विक्षेपाला प्राप्त झालेले मन स्वास्थ्याला प्राप्त होण्याकरता समाधिप्राप्तीकरता प्रत्याहाराचे प्रयोजन आहे. संसाररहित परामात्म्याचे वीर्यसहित ध्यान ते सवीर्यध्यान होय. ह्यात आत्मा परमात्म्याचे सूक्ष्म विवेचन आहे. त्यानंतर बहिरात्मा, अंतरात्मा व परमात्म्याचे वर्णन आहे. शरीरादिकांच्या ठिकाणी आत्मत्वाची बुद्धी असणारा बहिरात्मा, आत्म्यात आत्मत्वाची भावना करणारा अंतरात्मा व अत्यंत शुद्ध निर्मळ परमात्मा. (ह्यातील अनेक श्लोकांचे आचार्यांनी पूज्यपादांच्या समाधिशतकाच्या कितीतरी श्लोकांशी साम्य आहे.) बहिरात्मा हेय, अंतरात्मा साधन, व त्या साधनाने परमात्मा साध्य आहे. ५ ते १११९-२०-२२ इत्यादि जवळजवळ बत्तिसावा सर्ग म्हणजे पूज्यपादश्रींच्या समाधिशतकाशी बहुतांश श्लोकांच्या अर्थाशी मिळताजुळता आहे.
हे धर्म्यध्यान सातव्या गुणस्थानात परिपूर्ण होते. त्या ठिकाणी उत्कृष्ट धर्मध्यान आहे. ह्या ध्यानाने सातिशय अप्रमत्त गुणस्थानातून श्रेणी चढतो व त्यामुळे शुक्लध्यान प्राप्त करून त्यामुळे कर्मनाश व केवलज्ञानाची प्राप्ती होते. धर्म्य व शुक्ल ह्या दोन्ही ध्यानांचे ध्येय एकच आहे पण धर्मध्यानापेक्षा विशुद्धि शुक्लध्यानाची जास्त व गुणस्थानभेदाने स्वामिभेद आहे.
अनादिविभ्रमवासना, मोहोदय, अनभ्यास, तत्त्वसंग्रह अभाव व अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिर करण्याकरता, ध्यानविघ्न दूर करण्याकरता समस्त वस्तूंचा निश्चय करण्याकरता वस्तूच्या धर्मामध्ये स्थिर होण्याकरता धर्म्यध्यान आहे. ह्यात छद्मस्थाच्या क्षायोपशमिक वा दृष्ट ज्ञानाने सर्वज्ञांच्या आगमावरून परमात्म्याचा निश्चय करून परमात्म्याचे ध्यान करावे.
आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय व संस्थान विचय हे धर्मध्यानाचे भेद आहेत. आगमात सांगितलेल्या वस्तुतत्त्वाला सर्वज्ञांची आज्ञा म्हणून चितवन आज्ञा विचय, त्यात प्रमाणनय निक्षेपाने उत्पाद व्यय ध्रौव्य रूप चेतन अचेतन रूप तत्त्वसमूहाचे चितवन, शब्दात्मक व अर्थात्मक श्रुतज्ञानाचे चितवन, हा ह्या ध्यानाचा विषय आहे. अनुषंगाने श्रुतज्ञानाचे विस्तृत विवेचन आहे.
__अपायामध्ये, मोक्षसाधनेमध्ये अपायभूत असणाऱ्या तत्त्वाचा विचार आहे. व त्यापासून परावृत्त होण्याची व सावधानतेची प्रेरणा आहे. मोक्षपाया व मोक्षाच्या निर्णयाचा विचार आहे. विपाक विचयात कर्म, कर्मोदय, ८ कर्मे त्यांचे भेद, त्यांच्या उदयादिक अवस्थांचे चितवन आहे.
२७
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
२१०
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ संस्थान विचयात त्रिलोक स्वरूपाचा विस्तृत विचार आहे. चार गतींचे वर्णन. देवगतीचे वैभव विस्तृत चितारले आहे. व ह्याच संस्थान विचयात पिंडस्थ, पदस्थ, रूपरस्थ व रूपातीत ह्या चार प्रकारच्या ध्यानाचा अंतर्भाव केला आहे. आज उपलब्ध ग्रंथांत ह्या चार प्रकारच्या ध्यानाचा उल्लेख फक्त ह्याच ग्रंथात प्रथम सापडतो. म्हणून जैन योगसाधनेत ही एक नवी देन म्हणायला काही हरकत नाही.
पिंडस्थ ध्यानात पाच धारणांचे वर्णन आहे. पार्थिवी, आग्नेयी, श्वसना, वारुणी, तत्त्वरूपवती ह्या त्या धारणा होत.
पिंडस्थ धारणेत पार्थिवी धारणात प्रथम तिर्यकलोकसदृश निःशब्द कल्लोलरहित व बर्फसदृश क्षीर समुद्राचे चितवन, नंतर त्यात दीप्तिमान सहस्रदल कमळाचे चितवन, त्यानंतर कमळाचे मध्यभागी दशदिशा व्यापणाऱ्या पीतवर्ण कर्णिकेचे ध्यान, त्या कर्णिकेत श्वेतवर्ण सिंहासन व त्यात सुखशान्तस्वरूप, क्षोभरहित आत्म्याचे चितवन आहे.
त्यानंतर आपल्या नभोमंडलात सोळा पाकळ्यांच्या कमळाचे व त्या कमळाच्या कर्णिकेत हूँ ह्या मंत्राची स्थापना व चितवन व त्या सोळा पानांवर अ, आ, ते अः पर्यंत सोळा अक्षरांचे ध्यान, त्यानंतर धूम, स्फुल्लिग, ज्वाला त्यांच्यामुळे जळणाऱ्या हृदयस्थ कमळाचे चितवन. हृदयस्थ कमळ अधोमुख व आठ पाकळ्यांचे आहे. त्या आठ पाकळ्यांवर आठ कर्म स्थिर आहेत. व अशा कमळाला दूं ह्या महामंत्रापासून उठणाऱ्या ज्वाला जाळतात. तेव्हा अष्टकर्म जळतात. ते कमल जळल्यानंतर अग्नीचे चितवन करावे व ह्या अग्नीच्या ज्वाला समूहाने जळणाऱ्या वडवानलाप्रमाणे ध्यान करावे. अग्नी बीजाक्षरव्याप्त, अन्ति सह चिन्हाने युक्त व वर वायुमंडलाने उत्पन्न धमरहित असे चितवन करावे. ह्याप्रमाणे हे बाहेरचे अग्निमंडल अंतरंगाच्या मंत्राग्नीला दग्ध करते, त्यानंतर नाभिस्थ कमळाला जाळून दाह्य पदार्थाच्या अभावामुळे शांत होते.
___ त्यानंतर श्वसना धारणेत आकाशात पूर्ण होऊन संचार करणाऱ्या, वेगवान व महाबलवान वायुमंडलाचे चिंतन करावे. तो वारा जगात पसरून पृथ्वीतलात प्रवेश करून त्या दग्ध शरीरादिकाच्या भस्माला उडवून देतो व त्यानंतर तो शांत होतो.
वारुणी धारणा, गर्जना, विजा, इंद्रधनुष्यादि चमत्कारयुक्त मेघव्याप्त आकाशाचे ध्यान, त्यानंतर जलबिंदु धारा, त्यानंतर अर्धचन्द्राकार आकाशातला वाहून नेणाऱ्या वरुण मंडलाचे ध्यान व ह्या दिव्य ध्यानाने भस्मप्रक्षालन करतो असे चिंतवन करावे.
व त्यानंतर तत्त्वरूपवती धारणेत सप्तधातुरहित निर्मल सर्वत्र समान आत्म्याचे ध्यान करावे. त्यानंतर अतिशय युक्त सिंहासनावर आरूढ, कल्याणिक महिमायुक्त व पूज्य अशा आत्म्याचे चितवन व त्यानंतर अष्टकर्मरहित अतिनिर्मळ आत्म्याचे चितवन करावे. पिंडस्थ ध्यानामुळे विद्या मंडळ, मंत्र, यन्त्र, इन्द्रजाल क्रूर क्रियादिकांचा उपद्रव होत नाही.
वास्तविक ज्ञानानन्दरूप आत्माच ध्येय आहे, पण ह्या पाच धारणादिका कल्यना करून कां ध्यान सांगितले हा प्रश्न आचार्यांनीच उभा करून उत्तर दिले की शरीर पृथ्थ्यादिक धातुमय आहे. व पुद्गल कर्म
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव
२११ द्वारा उपन्न आहे. त्याचा आत्म्याशी सम्बन्ध आहे. त्यामुळे आत्मा द्रव्य भाव कलंकाने मलीन आहे. त्यामुळे अनेक विकल्प उत्पन्न होतात. त्यामुळे परिणाम निश्चल होत नाही. त्या चित्ताला स्वाधीन चितवनाने वश करायला पाहिजे. आलंबनाशिवाय चित्तस्थैर्य नाही म्हणून पाच धारणांची कल्पना केल्या गेली. ह्याप्रमाणे प्रत्येक विक्षेपजन्य वस्तूवर मनाला अवरुद्ध करून क्रमाने उत्तम तत्त्वावर अवरुद्ध करण्याच्या अभ्यासाने ध्यानाची दृढ ध्यानसाधना होते. बाकीच्या सांप्रदायाने ह्या धारणा मानल्यात पण त्यामुळे काही लौकिक चमत्कारसिद्धी होते. पण मोक्षसाधक ध्यान यथार्थ आत्मतत्त्वनिरूपणाशिवाय होत नाही. गाभ्याशिवाय चोथा त्याप्रमाणे ते ध्यान आहे.
पदस्थ ध्यान-पवित्र मंत्राच्या अक्षरस्वरूप पदांचा अवलंबन करून चितवन करतात. ते पदस्थ ध्यान होय. ह्यात वर्णमातृका (स्वर व्यंजन) ध्यान, प्रथम स्वरावली, नंतर अनुक्रमे पंचवीस व्यंजन, नंतर आठ वर्ण, नंतर हूँ बीजाक्षर तत्वरूप असणारे मंत्रराज, हे मंत्रराज अक्षर विविध लोकांनी विविध रूपात मानले आहे. पण हे अक्षर म्हणजे साक्षात जिनेन्द्र भगवान मंत्रमूर्तीला धारण करून विराजमान आहेत. प्रथम अहँ अक्षराचे सर्व अवयवासहित ध्यान, नंतर अवयवरहित, नंतर वर्णमात्र चितवन करावे. त्यानंतर बिंदुरहित, कलारहित, रेफरहित, अक्षररहित, उच्चार करण्याला योग्य न होईल अशा क्रमाने चितवन करावे. नंतर अनाहत देवस्मरण. ह्या ध्यानामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यानंतर प्रणवमंत्रा चे (ओंकार ) ध्यान. पंचनमस्कार मंत्र, षोडशाक्षरी महाविद्या, (अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः) अरहंत, सिद्ध, व पंचाक्षरमयी विद्या (हाँ ह्रीं हूँ ह्रों व्हः अ सि आ उ सा न मः) मंगल उत्तम व सरण ह्या तीनही पदसमूहाचे स्मरण, त्रयोदशाक्षर विद्या (अर्हसिद्धसयोगकेवली स्वाहा) व्हीं श्रीं नमः ‘णमो सिद्धाणं' (अक्षर पंक्तीने विराजमान मंत्र ), अष्टाक्षरी मंत्र (णमो अरहंताणं ) मायावर्ण ह्रीं, सिद्धविद्या (झ्वीं) सात अक्षरी मंत्र, सर्वज्ञमुखविद्या, इत्यादी मंत्रविद्येचा उल्लेख विधी व फल सविस्तर सांगितले आहे.
क्रूरजंतू उपसर्ग व्यंतरादिक उपशमाकरता असणाऱ्या ध्यानाचे विशेष वर्णन आहे. त्यात एक मंत्र पद, पापभक्षिणी विद्या, सिद्धचक्र मंत्र, सर्वकल्याणबीज मंत्र सांगितला आहे. ग्रंथकारांनी वीतरागी योगी वीतरागीपणाने वीतराग समस्त पदार्थ समूह ध्येयाचे ध्यान करतो असे सांगितले. वरील सर्व मंत्राचा सूक्ष्मार्थ पाहिला तर कोणत्याही मंत्रात वीतरागता ध्येय आहे. हा सर्वांत सामान्य भाव आहे. पण त्यामुळे लौकिक सिद्धी व पारमार्थिक साध्य प्राप्त होते ह्यात संशय नाही. या ध्यानाने विशुद्धी, एकाग्रता, स्थैर्य वाढते. लौकिक प्रयोजनाकरता ध्मान करण्याचा मोक्षमार्गात निषेध आहे.
रूपस्थ ध्यान-या ध्यानात अरहंत भगवानच ध्येय आहेत. व त्या अनुषंगाने सर्वज्ञांचा निश्चय करून निर्दोष सर्वज्ञ अरहंत जिनदेवांचे ध्यान करायला सांगितले आहे.
रूपातीत ध्यान-ह्या ध्यानाच्या वर्णनापूर्वी असमीचीन ध्यानाचा स्वप्नात देखील विचार करायला नको. म्हणूनच रूपस्थ ध्यानात स्थिरचित्त असणाऱ्याने अमूर्त इन्द्रिय अगोचर अशा परमात्म्याच्या ध्यानाला प्रारंभ करावा. 'चित्तमेवमनाकूलं ध्यानं ' अनाकूल चित्तच ध्यान आहे. प्रथम परमात्म्याच्या गुणसमूहाचे पृथक् पृथक् चितवन करावे. नंतर गुणसमुदाय रूप चितवन करावे. गुणगुणीच्या अभिन्नभावाने स्मरण व नंतर
|
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
२१२
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ अन्यसहायनिरपेक्ष होऊन परमात्म्यातच लीन व्हावे. या ध्यानात सुरुवात पृथक् विचाराने पण अन्ती ध्येय व ध्याता एकरूप होतात. त्यानंतर स्वतःच्या आत्म्याला परमात्म्यामध्ये योजतो. कर्मरहित आत्मा व्यक्तिरूपाने परमात्मा व कर्मसहित आत्मा शक्तिरूपाने परमात्मा आहे. अमूर्त अनाकार अशा परमात्म्याचे ध्यान या ध्यानात करावे. याप्रमाणे सिद्धपरमेष्टीच्या ध्यानाने त्यांच्याप्रमाणे व्यक्त रूप होण्याकरता त्याच्यात लीन होतो.
ह्याप्रमाणे बाह्य व अभ्यंतर सामग्रीने म्हणजे प्रथम तीन संहनन व वैराग्यभाव असणारा योगी शुक्लध्यानपात्र होतो. ह्या धर्मध्यानाने कर्मक्षय, क्षायिक सम्यग्दृष्टीपासून अप्रमत्तगुणस्थानपर्यंत असंख्यातगुणी निर्जरा होते. ह्याचा उत्कृष्ट काल अंतर्मुहूर्त आहे. भाव व क्षायोपशमिक लेश्या शुक्ल, प्रसन्नचित्त, कांतिमान, सहृदय, सौम्य व शांत प्रवृत्ती ही ह्याची चिन्हे आहेत. नवप्रैवेयक, नवअनुत्तर व सर्वार्थसिद्धीमध्ये उत्तम देव होतात. व शुक्लध्यान प्राप्त करून मोक्ष मिळवितात.
शुक्ल ध्यान-धर्मध्यानपूर्वकच शुक्लध्यान होते. जे क्रियारहित, इंद्रियातीत ध्यानधारणेने रहित स्वरूपसंमुख आहे ते शुक्लध्यान. वज्र-वृषभ-नाराच-संहनन, ११ अंग चौदा पूर्वधारी शुद्ध चरित्रवान् मुनी शुक्लध्यानयोग्य ध्याता होय. कषाय मलाचा क्षय किंवा उपशम होत असल्यामुळे हे शुक्लध्यान होय. पृथक्त्ववितर्क विचार, एकत्ववितर्क अविचार, सूक्ष्मक्रियाप्रतिपाती व व्युपरताक्रियानिवर्ती हे चार प्रकार आहेत. पहिले दोन शुक्लध्यान छमस्थाला, अर्थसंबंधाने, श्रुतज्ञानाच्या अवलंबनाने होतात. पहिले पृथक्त्ववितर्कविचार हे ध्यान पृथक्त्व, वितर्क व विचारसहित आहे. पृथक् पृथक् रूपाने श्रुताचे संक्रमण होते म्हणजे वेगवेगळे श्रुतज्ञान बदलते म्हणून सपृथक सवितर्क व सविचार रूप आहे.
__ ज्या ध्यानात श्रुतज्ञानाचा विचार होत नाही. एक-रूप राहते ते एकत्ववितर्क अविचार ध्यान होय. ह्यात अनेकपणा म्हणजे पृथक्त्व श्रुतज्ञान म्हणजे वितर्क व अर्थ, व्यंजन व योगाचे संक्रमण म्हणजे विचार होय. एका अर्थावरून दुसऱ्या अर्थावर ती अर्थसंक्रांतीने एका व्यंजनाहून दुसऱ्या व्यंजनावर व व्यंजनसंक्रांति एका योगाहून दुसऱ्या योगावर स्थिर होणे ही योगसंक्रांती होय. ह्या दुसऱ्या ध्यानामध्ये स्थिर असणारा योगी क्षणात कर्माचा उपशम किंवा क्षय करतो. व हे ध्यान पृथक्त्वध्यानपूर्वकच होते. ह्याचा ध्येय विषय, एक द्रव्य वा एक पर्याय वा एक अणु व एकाच योगाने चितवन करतो. व जेव्हा ह्या ध्यानात संक्रमण होत नाही तेव्हा बाकी राहिलेल्या घातिया कर्मांचा मूलतः नाश करतो. तिसरे शुक्लध्यान सूक्ष्मक्रिया प्रतिपाती. ह्यांत उपयोगाची क्रिया नाही पण काययोग विद्यमान आहे. व ह्या काययोगाची क्रिया कमी कमी होऊन सूक्ष्म राहते तेव्हा हे ध्यान होते. हे ध्यान सयोगकेवलींना होते.
अरहताचे अन्तमुहूर्त आयुष्य शिल्लक असतांना बाकीच्या तीन कर्मांची स्थिती कमी अधिक असल्यास समुद्धात विधि करतात. उत्कृष्ट सहा महिने आयुष्य कमी असताना जे केवली होतात ते अवश्य समुद्धात करतात. व सहा महिन्यापेक्षा जास्त काळ शिल्लक असतांना केवल समुद्धात विकल्पाने करतात. व अंतमुहूर्त आयुष्य शिल्लक असतांना आयुकाएवढी वेदनीय, नाम, गोत्र ह्या कर्माची स्थिती जेव्हा होते तेव्हा सर्व वचनयोग, मनोयोग, व बादर काययोग सुटतो व फक्त सूक्ष्म काययोगाच्या अवलंबनाने परिस्पंदन होते, म्हणून सूक्ष्मक्रिया-प्रतिपाती ध्यान होते. आयुकर्माची स्थिती बाकी कर्मापेक्षा जास्त असल्यास आत्म
.
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव
२१३ प्रदेश तीन समयांत व दण्ड कपाट प्रखर रूप होऊन चौथ्या समयांत लोकपूरण होतात. व बाकी कर्माची स्थिती समान करून बादरकाययोगात स्थिर राहून बादर वचनयोग व बादर मनोयोग सूक्ष्म करतात व पुनः काययोग सोडून त्याची स्थिती कमी करून काययोग सूक्ष्म करतात. नंतर वचनयोग मनोयोगाचा क्षणात निग्रह करतात. ह्या प्रक्रियेला सूक्ष्मक्रिया प्रतिपाती म्हणतात. व समुच्छिन्न क्रिया हे चौथे शुक्लध्यान, ह्यांत काययोगाच्याही सूक्ष्म राहिलेल्या क्रिया मिटतात. हे ध्यान अयोगी जिनांना होते. ह्या दोन गुणस्थानांत ध्यान उपचारमात्र आहे. योग आहे पण सूक्ष्म वा काहीही योगक्रिया नाही. व अयोगी गुणस्थानात बाकीच्या १३ अघाती कर्मप्रकृतींचा नाश होतो. व ह्या १४ व्या गुणस्थानातून फक्त पाच लघुअक्षरांचे उच्चारण होईपर्यंत थांबतात व स्वभावानेच कर्मबन्धरहित शुद्धात्मा ऊर्ध्वगमन करतात व सिद्धात्मा होतात. अतीन्द्रिय अव्याबाध, व स्वाभाविक सुख मिळवितात. व मोक्ष हे शुक्लध्यानाचे फळ आहे.
ह्याप्रमाणे ह्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय मधुर मोक्षफलाने संपवितात.
ह्या ग्रंथात आचार्यांना मोक्षसाधनेला साधकतम कारण जे संवर व निर्जरा अहे, त्यात ध्यान हे अधिकच साधकतम कारण आहे. म्हणून संवरनिर्जरेला व परंपरेने मोक्षाला कारणीभूत असणाऱ्या ध्यानांचे त्यांनी विस्तृत पण कंटाळवाणे नव्हे तर काव्यशैलीने अतिशय रोचक वर्णन केले आहे. ध्यान म्हणजे कष्टसाध्य दुष्कर अशी योगसाधना नसून दुर्लभ असणाऱ्या ज्ञानसाधनेने विशुद्ध ध्यानसाधनेत विशुद्धिपूर्वक स्वच्छता वा एकाग्रता वा क्षयोपशमिक ज्ञानभावाची उपयोगात स्थिरता म्हणजे ध्यान होय. म्हणून ध्यानसाधनेची पूर्वपीठिका म्हणून ज्ञानसाधना, वैराग्य भाव, संवेगी निर्वेगी कामभागनिर्विणा अशी अशुभ व हेय असणाऱ्या आर्त रौद्र ध्यानापासून परावृत्त करणारी, नंतर शुभ ध्यान धर्मध्यानात प्रवृत्ती करण्याची प्रेरणा भव्य जीवाला दिली आहे. ह्या खंडात ह्या काळात धर्म्यध्यानच प्रामुख्याने होऊ शकते. शुक्लध्यानाची शक्यता नाही म्हणून वा शुक्लध्यानाचे साधकतम साधन म्हणून धर्म्यध्यानाचे विस्तृत व विविध प्रकाराने वर्णन केले आहे. खरोखर धर्म्यध्यानाचे वर्णन वाचताना वाचकाला एकाग्र, तन्मय होऊन ध्यानी बनूनच रस घ्यावा लागतो. त्याशिवाय क्षिप्त मताला त्याची अवीट गोडी, निरलस अखंड माधुर्य चाखता यायचे नाही. ज्ञानसाधनेनेच ध्यानसाधना व ध्यानसाधनेने परंपरेने मोक्षसाधना हेच तत्त्व आचार्यांना निर्विवादपणे आपणा मुमुक्षु वाचकासमोर प्रवाही अर्थगतीने, सुबोध भाषाशैलीने, अलंकारिक रचनेने, लालित्यपूर्ण पदरचनेने एकमेव अनुपम रसाने सजवून विविध प्रकारच्या रसिकांसमोर मांडायचे होते. व त्याबरोबरच अन्य सांप्रदायाचे ध्येयविषय, ध्यानांग, ध्यान, परिकर धारणादिक मान्यतेचे संपूर्णपणे उच्चाटन न करता जैन रूपात म्हणजे जैन तत्त्वज्ञानाच्या भरभक्कम तत्त्वाच्या बैठकीत बसवून आपले तत्त्व न सोडता जनमनाला जणू त्यांनी काबीज केले. तत्कालीन मान्य असणाऱ्या काम, गरुड व शिव तत्त्वाचे आत्मरूपात विसर्जन करून विशाल पण सखोल दृष्टिकोन स्वीकारून नव्या रूपात स्पष्टीकरण दिले आहे व पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ व रूपातीत ही चार प्रकारच्या ध्यानाची जणू नवी दालने आपणासारख्या ध्यानप्रेमी रसिकांकरिता खुली केलीत. जैन योगसाधनेत तर ही अत्यंत नवी प्रभावी परिणामकारक देन होय. पिण्डस्थ ध्यानात पाच धारणांनी स्वाधीन चितवनाने चित्ताला वश करण्याचा उपाय आहे.
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________ 214 आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ आचार्यांनी मंत्रसाधनेचा ध्यानसाधनेत अंतर्भाव करून घेतला. पदस्थ ध्यानात अनेक विविध बीजाक्षराने, मंत्राने, उत्तम व परमात्म पदाचेच ध्यान आहे. लौकिक दृष्टी वा सिद्धीसाठी किंवा दुर्ध्यानासाठी मंत्र नाहीत. रूपस्थ ध्यानात सगुण साकार उपासना, तर रूपातीत ध्यानात निराकार गुणोपासनेने ध्येयोपासना आहे. वीतरागता व विज्ञानता ह्या मूल बीजाला न सोडता इष्ट ध्येय बिंदू वा केंद्र बिंदू धरून साऱ्या योगसाधनेचा प्रपंच आहे. बाह्य जगाला भूल पाडणारी ही अगणित साधने त्यांनी ध्येय बिंदूशी केंद्रित करून तिळभरही विचलित न होण्याची क्षमता आम्हाला नवे ध्यान-सामर्थ्य प्रदान करतो. आचार्यांना कोणत्याही जैन सिद्धांताचे विषय अज्ञात नव्हते तर सर्व विषय संक्षिप्त रूपांत सर्व प्रकरणवश आलेच आहेत. आचार्य शेकडो विषयांवरून उड्डाण करीत करीत गेले तरी आपल्या ध्येयाशिवाय ते कोठेही विसावले नाहीत. कोठे घसरले वा पडले नाहीत. ध्यानी आत्म्याशिवाय का हे शक्य आहे ? आपणाला ओढ्याच्या रूपांत परिचित असणाऱ्या ध्यानाला त्यांनी सागराच्या रूपात आपणासमोर मांडले आहे. व शेवटी सूर्यचंद्र व मेरु जोवर पृथ्वीवर प्रकाशमान व विद्यमान आहेत तोवर हा ग्रंथही ज्ञानाच्या भरतीसाठी चंद्राप्रमाणे प्रकाशमान व ज्ञानाच्या स्थैर्यासाठी मेरूप्रमाणे स्थिर राहो ही सद्भावना पण केवढ्या आत्मविश्वासाने मांडली आहे. ___ग्रंथकारांची शैली कवी भर्तृहरीचे अनुसरण करते. कवींनी ध्याताच्या रूपांत वीर रस, विशुद्धीच्या रूपांत शांत रस, स्त्रीवर्णनाने बीभत्स व शृंगार रस, आर्तध्यानाने व अहिंसा महाव्रताने करुण रस, ध्यानाच्या अद्भुत विधीने व फलाने अद्भुत रस, रौद्र ध्यानाने व संसार भावनेने रौद्र रसाचे पोषण केले आहे. ह्याप्रमाणे नवरसाने रसरसलेला, काव्यगुणाने भरलेला, मुमुक्षु रसिकांना तन्मय करणारा लयी ध्यानी बनविण्याची प्रेरणा देणारा. असा हा जैन योगसाधनेचा ग्रंथराज आहे. __ जैन बंधूंच्या निष्ठा वाढविणारे, जैन सिद्धांताचे रहस्य साठविणारे, सुप्त शक्तींचा विकास घडविणारे विशाल व विस्तृत दृष्टिकोन ठेवणारे आचार्य शुभचंद्र व त्यांचा योगग्रंथराज 'ज्ञानार्णव' अत्यंत अगाध गंभीर घेण्याचे हे धाडस, धैर्य, त्यांच्याच महान भक्तिप्रभावाने मी केले. हा माझा व्यर्थ खटाटोप आहे. पण घरोघरी जनमनात ह्या ग्रंथाची आवड, आकर्षण निर्माण होऊन अध्ययनाचा विषय व्हावा, व त्यांच्याप्रमाणे आम्हीही परंपरेने मोक्षाचे भागीदार व्हावे ह्याच सद्भावनेतून हा अल्पसा प्रयत्न वाचकांनी गोड करून घ्यावा. ह्यातील सदाशयाला दिगंबर जैन मुनींची अखंड ज्ञानसाधना कारणीभूत आहे. ह्यातील दोषाला सर्वस्वी मी. जबाबदार आहे.